गझल ‘तो’ की ‘ती’?
गझल हा शब्द स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी? विंदा करंदीकरांसारखे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी ‘साठीचा गझल’ असे पुल्लिंगी संबोधतात. तर खावर सारखे उर्दूचे मातब्बर कवी माझिया गझला मराठी’ असे स्त्रीलिंगी शीर्षक आपल्या गझलसंग्रहाला देतात. एकूण काय तर गझल ‘ती’ आहे की ‘तो’ इथ पासूनच हया काव्यप्रकारविषयी सुरू असलेला वाद उत्तरोत्तर चढत्या क्रमानेच प्रवास करताना दिसतो. मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकरांच्या रचना हया गझलच नव्हेत इथपर्यंत या वादाची मजल गेली. नवोदित गझलकार तर स्वत: आपण जे लिहितो तीच फक्त गझल असे एकमेकांना स्पष्ट सांगून स्वयंघोषित ‘गालिब’ झालेले आहेत. सगळयांना ‘गालिब’च व्हायला पाहिजे आहे. कुणालाही जौक, इकबाल, साहीर, दुष्यंतकुमार असं होणे कमी पणाचं वाटते. इथे मराठीचिये नगरी संकुचित वृत्ती दुसरं काय?
वृत्तीवरून बरं आठवलं गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे हे वाचून चोथा झालेलं एकच वाक्य आम्ही चघळत असतो आणि पु. लं. च्या हया वाक्याचा उत्तरार्ध सोयीस्कर विसरतो. ‘गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे. एवढेच नव्हे तर तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृत्तीही आहे.’ पु. लं. च्या या वाक्यातील ‘सूक्ष्म आणि सुंदर निवृत्ती’ अंगी बाणविणे म्हणजे ‘लोखंडाचे चणे खाण्याचं’ काम सोडून आम्ही आमच्या गझलेला गझल न मानण्या-यांवर दातओठ खात असतो. आमच्या समकालिनांपैकी एखाद्याचं मोठेपण कबूल करण्याइतकही आमचं हृदय मोठं नाही. तर ‘सूक्ष्म आणि सुंदर निवृत्ती’ तर फार दुरच्या गोष्टी. ज्ञानेश्वरांचं नाव दिवसातून शंभरवेळा घेऊ पण त्यांची ‘एक तरी ओवी अनुभवणं’ आम्हाला सोयीचं नाही .परवा काव्यचर्चेच्या वेळी पुरूषोत्तम पाटीलांशी गप्पा मारतांना ते फार मार्मिक बोलले. म्हणाले, "आजकालच्या कवींची प्रसिद्धी जास्त पण सिद्धी कमी.
गझल दशक
१९८० ते १९९० हे दशक मराठी कवितेत ख-या अर्थाने ‘गझल दशक’ होते. असं म्हणावयाला हरकत नाही. मेनका, लोकमत, लोकसत्ता इ. नियतकालिकात गझलची चालविलेली सदरे, सुरेश भटांचे ’रंग माझा वेगळा’, ’एल्गार’ हे कार्यक्रम, अमरावतीच्या साहित्य संमेलनात त्यांचीच प्रगट मुलाखत, ठाण्याच्या साहित्य संमेलनात ’गझलचे मराठी कवितेवर आक्रमण’ असा परिसंवाद, लोकमतची १९८५ दिवाळी अंकातली ‘गझलस्पर्धा’ सुधाकर कदम,भीमराव पांचाळे यांच्या गझल- गायनाच्या मैफिली, सुरेश भट, मंगेश पाडगावकर, खावर, श्रीकृष्ण राऊत इत्यादी कवींचे गझलसंग्रह असे भरगच्च उपक्रम या दशकात पार पडले.
गोंडस भ्रम
पण एवढं सगळं होऊनही मिळवले काय तर स्वत:ची ओळ्ख गमावणांर आंधळ अनुकरण. उदाहरणार्थ गझलची व्याख्या ‘गझलेतील एका शेराचा दुस-या ‘शेराशी संबंध असतोच असे नाही.’ अशी गझलची मूळ व्याख्या. पण तिची आग्रही मांडणी ‘एका शेराचा दुस-या शेराशी संबंध नसलाच पाहिजे’ अशी संपूर्ण नकारात्मक करण्यात आली. आणि असा संबध असेल तर ती ‘गझल’ नव्हे तर गझलच्या फॉर्ममधली ‘कविता’ अशी पुस्तीही त्या व्याख्येला जोडण्यात आली. गझलची क्रेझ असल्यानं आपण ’गझल’ लिहून ’गझलकार’च व्हावे. असे प्रत्येक कवीला वाटे. सहजपणे अनेक शेर एकाच विषयावर सुचले तर ती गझलच्या फॉर्ममधील कविता होईल. असे नव्याने लिहिणा-य़ांच्या ‘जमिनीत’ रुजवण्यात आले.ज्ञानपीठ पुरस्कार विजेते फ़िराक गोरखपुरी म्हणतात. ‘पुराने जमाने में गजल का एक और रूप प्रचलीत था, जिसे ‘गजले-मुसलसल्’ कहते है. इस में शेर अलग-अलग स्वतंत्र विषयों पर नही होते बल्की एकही विषय पर कहे हुए होते है बल्की उनमें परस्पर संबंध भी होता है. वर्तमान समय में नज्मों (कविता) के कारण इस प्रकार की गजल की जरूरत ही नही रहीं’ पूर्वीच्या काळी एकाच विषयावरची ’मुसलसल् गझल’ अस्तित्वात होती. या गझलेत एकच विषय सर्व शेरांमध्ये असायचा. आता ’नज्म’ मध्ये एकच विषय मांडता येत असल्यानं ’मुसलसल्’ म्हणजे एकाच विषयावरच्या गझलची आवश्यकता राहिली नाही. असा फ़िराकसाहेबांच्या वरील विधानाचा अर्थ.फ़िराक गोरखपुरींबद्दल आदर असूनही त्यांच्या या मताशी मला सहमत होता येत नाही. कारण ‘गझल’ आणि ‘नज्म’ हे दोन कवितेचे प्रकार एकमेकांचे पर्याय ठरविणे कसे शक्य आहे? आणि काव्यप्रकार हे त्या काव्यात वर्णन केलेल्या विषयानुसार ठरतात की आकृतीबंधातील घटकांनुसार हे आधी स्पष्ट व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याकडे भक्तिगीतात भक्ती हा विषय येत असल्याने आता ओवी, अभंग, गौळण, भारूड इ. भक्ती विषयाच्या काव्यप्रकाराची आता आपल्याला काही आवश्यकता राहिली नाही असं कुणी म्हटलं तर आपल्याला चालेल का? आणि त्याहीपुढे जाऊन असे म्हणता येईल की संतांनी त्यांच्या भक्तिरचना ओवी आणि अभंगात केल्या म्हणून ओवी आणि अभंग केवळ भक्तिरचनांचीच मक्तेदारी असलेले काव्यप्रकार आहेत. असा आपण आग्रह धरला तर मर्ढेकरांच्या ओव्या या ओव्याच्या फार्ममधील कविता आणि फ. मु.शिंदे यांचे अभंग हे अभंगाच्या फॉर्ममधील कविता असे आपण म्हणणार आहोत काय? तर कोणताही काव्यप्रकार म्हणजेच कवितेचा आकृतीबंध हा एकमेकांचा पर्याय होऊ शकत नाही. आकृतीबंध हा त्यातील चरण संख्या, चरणातील अक्षरसंख्या, यमक-स्थान इत्यादी घटकांवरून ठरत असतो.
शेवटी कविता महत्त्वाची
डॉ. इकबाल यांची ‘सारे जहॉं से अच्छा हिंदोस्ता हमारा’ ही प्रसिध्द रचना किंवा हसरत मोहानी यांची ’चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद है’ ही प्रख्यात रचना, किंवा मोमिन ह्यांची ‘वो जो हम मे तुम मे करार था’हया रचनात गझलच्या आकृतीबंधाचे सर्व घटक पूर्ण असूनही केवळ एकाच विषयावरच्या त्या असल्याने आपण त्यांना गझल न म्हणता ‘नज्म’ (कविता) म्हटले काय! काय फरक पडणार? रसिकांच्या हृदयात या रचनांनी केलेले घर पाडणे आपल्याला शक्य आहे काय? आणि आपण अट्टाहासाने आपला अनुभव नसतांनाही बळेबळेच विविध विषयावरचे शेर लिहून ’तथाकथित’ गझल लिहिली तरी रसिकांच्या हृदयात आपल्याला भाडयानं तरी घर मिळेल काय? अर्थातच नाही. कारण रसिकांना पुन: प्रत्ययाचा आनंद देईल ती रचना त्याच्या हृदयात कायम घर करेल मग तो अभंग असो की लावणी, ओवी असो की भारूड, गीत असो की सुनीत, गझल असो की,मुक्तछंद, पोवाडा असो की हायकू याच्याशी रसिकाला काही देणंघेणं नाही. रसिक सौंदर्याचा चाहता आहे, मग ते नऊवारीत असो की पाचवारीत, पंजाबीत असो की मिडीत, त्याच्या काळजाचा ठोका जिथे चुकतो तिथे तो उत्स्फूर्त दाद देईल. वा! क्या बात है! एरवी मेकअपची पुटांवर पुटं चढवलेले फॅशनेबल चेहरे त्याला दाखवून त्याच्याकडून दाद हिसकावून घेणे म्हणजे कवीने रसिकतेवर केलेला बलात्कारच होय.
शेरांचा एकमेकांशी संबंध का नसतो?
गझल हा यमकप्रधान काव्यप्रकार आहे. त्यातला काफिया म्हणजे यमकांनी सर्व शेर एकमेकांशी स्वरानुकारी अंगाने बांधलेले असतात. काही यमकांची प्रकृती, अर्थछटा अशा असतात की त्या अगोदरच्या शेरामध्ये वर्णन केलेल्या विषयाशी सुतराम संबंध ठेवत नाहीत. उदा. ‘गो-या तुझ्या रुपाने भलती कमाल केली; बघण्यास आरला दृष्टी बहाल केली’ अशा ‘प्रिये’ संबंधीचा मतल्याने गझलचा आरंभ झाला. पुढे ‘कमाल’, ‘बहाल’ या यमकांच्या स्वरानुकारी यादीतील ‘मशाल’ हा काफिया घेउन मला शेर लिहावयाचा आहे. पण ‘मशाल’ या शब्दाची प्रकृतीच अशी आहे की, ती प्रेयसी सारख्या ‘नाजुक’ विषयाच्या दूरच राहील. प्रेयसीच्या कोणत्या विभ्रमाचं वर्णन मी मशाल या शब्दानं करू? शक्यच नाही. क्रांतिदर्शी, अंधार दूर करणारी अशी मशाल या शब्दाची अर्थछटा आहे. ‘जीवनाच्या अंधार वाटेवर तूच एक मशाली सारखी भेटलीस’ अशा आशयाचा शेर प्रेयसीला ‘चढवून’ देण्यासाठी लिहिल्या जाऊ शकेल; पण त्यासाठी प्रेयसीला मशालीच्या रूपात जाळावं लागेल. स्वत:साठी आपल्या प्रेयसीला जळायला लावण्याचा तो एक जळतुकडा हिंस्र विचार होईल. प्रेयसीला ‘शमा’ वगैरे म्हणण्या पर्यंत ठीक पण ‘शमा’ ला एकदम सेव्हंटी एम. एम. मध्ये एनलार्ज करून मशाल करणं म्हणजे त्या ठिकाणी बादरायण संबंधही जरासा अनैतिकच वाटावा. जराशा वेगळया पध्दतीनं ’‘मशाल’ या काफियाचा शेर सुचला -
‘अंधार जीवनाचा तेव्हा प्रसन्न झाला
जाळून जीव माझा जेव्हा मशाल केली’
असा शेर लिहून झाल्यावर त्याला गझलच्या बाहेर काढवत नव्हते आणि ठेवला तर तो ’प्रेयसी’ या विषयाशी फटकून वागत होता. मी त्याला गझलमध्ये ठेवला. आणि मग त्या शेरचा मागच्या-पुढच्या कोणत्याच शेराशी अर्थाअर्थी संबंध राहिला नाही. नेमके असेच उर्दू गझलांमध्ये देखील झाले. व अशा अनेक गझला लिहिल्या गेल्यानंतर‘प्रत्येक शेरचा दुस-या शेरशी संबंध असलाच पाहिजे असे नाही’.अशी व्याख्या कालांतराने करावी लागली. तेव्हा एकाच विषयावरची देखील गझल आणि विविध विषय हाताळणारीही गझलच अशी सर्वसमावेशक व्याख्या स्वीकारली नाही तर सहजतेचा बळी तर जाईलच आणि बळेबळेच एका शेरचा दुस-या शेरशी संबंध तोडला तर आपल्या गझला अधिक कृत्रिम झाल्याशिवाय राहणार नाहीत.
शेर कहना
सुरेश भट म्हणतात,‘गझलचे शेर अगदी सहज बोलण्यासारखे आले पाहिजेत’ ’रंग माझा वेगळा’ च्या प्रस्तावनेत पु. ल. ही म्हणतात, ‘गझलमध्ये नाट्याचा अंश असतो. तसे हया गीत प्रकारचे नाकातल्या स्वगताशी फार जवळचे नाते आहे.’ही दोन्ही विधाने गझलच्या संदर्भात फार महत्वाची आहेत. परंतु ती नीट समजून घेतली पाहिजेत. सुरेश भट जेव्हा, शेर आपण नेहमी जसे बोलतो तसे आले पाहिजेत असं म्हणतात, तेव्हा गझलची अभिव्यक्ती ही इतकी सहज असावी जसं आपण एकमेकांशी बोलतो आहोत. हया ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गझलची अभिव्यक्ती रोजच्या दैनंदिन बोलण्यासारखी असावी. यात‘सारखी’ हा शब्द फार महत्वाचा आहे. अभिव्यक्ती ‘बोलण्यासारखी’ असावी. पण आपण रोजच्या दैनंदिन बोलण्यालाच जर गझलमध्ये मांडू लागलो तर त्यातील काव्य हरवून जाईल आणि ते वृत्तात लिहिलेले केवळ संवाद म्हणूनच शिल्लक राहतील. त्यासाठी ह्याचं मूळच समजून घेतलं पाहिजे. उर्दूमध्ये ‘शेर लिखना’ असं म्हणत नाहीत ‘शेर कहना’ असं म्हणतात. हे जे ‘शेर कहना’ आहे. यात ती अभिव्यक्तीची सहजता व तिची संवाद-शैली दडलेली आहे. कवीने आपल्या अभ्यासिकेत बसून गझल लिहित (की पाडत?) बसण्यापेक्षा दैनंदिन कामं करतांना जिथे कुठे असेल तिथे त्याची अभिव्यक्ती अत्कटतेनं, उत्स्फूर्तपणे शेरांचं रूप घेऊन त्यांच्या मुखातून बाहेर पडते ते म्हणजे ‘शेर कहना’ त्यासाठी वृत्तांवर विलक्षण प्रभुत्व असावं लागतं. नाहीतर आपल्या गझलकारांच्या लेखनप्रपंचात लघू-गुरू क्रम सांभाळता सांभाळता त्याच्या कागदावर नझूलचं तीस वर्षाचं खाडाखोडीचं रेकॉर्ड तयार होऊन जातं. आणि या चकमकीत त्याच्या अभिव्यक्तीची सहजता केव्हा धारातिर्थी पडली याची त्यालाही कल्पना येत नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की अभ्यासिकेत बसून लघू-गुरू क्रम सांभाळत सांभाळत ‘सहज बोलण्यासारखी’ अभिव्यक्ती येणं अशक्य. त्यासाठी वृत्तांवर विलक्षण प्रभुत्व तर लागेलच पण तुम्हाला उत्कटतेनं काही सांगावसं वाटलंही पाहिजे. ते मनात खदखदत असलं पाहिजे. सलत असलं पाहिजे. झोंबत असलं पाहिजे. सांगितल्याशिवाय आपल्याला हलकं वाटणार नाही. ही अपरिहार्यता त्यात असली पाहिजे आणि या सांगण्यातील काव्य आपल्या म्हणीसारखं, वाक्प्रचारासारखं, लोकगीतांसारखं साधसुधं पण मर्मभेदी असलं पाहिजे. त्यासाठी जीवन समजून घ्यावं लागेल. माणसामाणसांचे बदलणारे नातेसंबध लक्षात घ्यावे लागतील. शृंगारापासून तर अध्यात्मापर्यंतचे विविध अनुभव पचवावे लागतील. भाषेचे सजग भान आपल्याला लागेल आणि सगळयात महत्वाचं म्हणजे झटपट प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता गझलसाधना करण्यासाठी संयमाने थांबण्याची तयारी लागेल.
अंदाजे बयॉं आणि गझलेतील नावीन्य
उर्दूतील नव्वद टक्के गझला हया तेच तेच विषय, त्याच त्याच कल्पना, तीच तीच यमके घेऊन आलेल्या असल्यानेत्यात नावीन्य आढळत नाही. प्रत्येक शायरचा ‘बयान’ करण्याचा ‘अंदाज’ तेवढा लक्षात घ्या असं म्हटलं जातं. ‘कहते है के ग़ालिब का है अंदाजे बयॉं और’ असे ’ग़ालिब’ देखील आपल्या अभिव्यक्ती शैलीबद्दल म्हणतो. मराठी गझलातही तोच तोपणा येताना दिसतो आहे. गझलकार स्वत:लाच पुनरावृत्त करीत आहेत. कधी इतर गझलकारांनी मांडलेल्या कल्पना चोरून आपल्या नावावर थोडासा बदल करून ठोकत आहेत. नवीन यमक शोधणंही उमेदवारी करणा-या गझलकारांच्या जीवावर येऊ लागलं आहे. उघडलं सुरेश भटांचं पुस्तक की काढली त्यातली यमकं आणि यमकांना ओळींची शेपटं फुटवली की झाली गझल तयार! मराठी भाषेतील यमकं काही कोणाच्या बापाची नाहीत, हे जरी खरे असलं तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की, गझलेत आधी यमकं निश्चित होतात आणि त्या यमकांचा धागा पकडून कल्पनेने शेर तयार होतो.सुरेश भटांसारख्या सिद्धहस्त कवीचं वृत्तांवरचं प्रभुत्व,व्यासंग,सराव आणि अभिव्यक्ती-शैली एखाद्या यमकाचा धागा पकडून शेराचा ताजमहल उभारू शकते. तर त्याच यमकाचा धागा पकडून नव्याने लिहिणा-या गझलकाराला तेवढया उंचीला पोहोचणे शक्य नसते. आणि मग त्याच्या शेरची चंद्रमौळी झोपडी तयार झालेली आपल्याला बरेचदा दिसते.अपवादात्मक एखादा प्रति ताजही बांधू शकेल.पण सर्वसाधारणपणे हे टाळण्यासाठी नवी यमके शोधली पाहिजेत. मराठी भाषा काही वांझ नाही. पण त्यासाठी मेहनत पाहिजे. भाषेचा अभ्यास पाहिजे. शब्दांच्या अर्थछटेबद्दल जागरूकता पाहिजे आणि हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मराठी गझलेतील शेरच्या चंद्रमौळी झोपडयांची झोपडपट्टीच मराठी कवितेच्या बाजुने वाढत असलेली आपल्याला दिसेल.
वृत्तांची विविधता
नव्याने लिहिणा-या गझलकाराने एकाचवेळी अनेक प्रकारच्या वृत्तात लिहिण्याच्या भानगडीत पडू नये. सुरूवातीला कोणत्याही एकाच वृत्तात लिहिण्याचा सराव करावा. तेच वृत्त पूर्णपणे शब्दवळणी पडल्याशिवाय दुस-या वृत्ताच्या वाटेला जाउ नये. ‘आनंदकंद’ हे त्यासाठी अगदी सहज व गझलकारांचे आवडते वृत्त आहे. कारण ते लवकर शब्दवळणी पडते. सुरेश भटांच्या ‘एल्गार’मधील १७ गझला ‘आनंदकंद’ तर १९ गझला ‘तुंगभद्रा’ या वृत्तात आढळतात. एकाच वृत्तात लिहिलेल्या गझला मोठयाने वाचतांना कानाला एकसुरीपणा जाणवतो.पण तो दोष पत्करूनही सहजता येण्यासाठी मात्र ते आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण वेगवेगळी वृत्ते वापरण्यासाठी गझल लिहित नसतो. तर आपल्या अभिव्यक्तीसाठी विविध वृत्ते वापरीत असतो. संगीतासाठी जसा रोज रियाज आवश्यक असतो. तसेच वृत्तांसाठी रियाज आवश्यक आहे. रियाज करता- करता जेव्हा एकेका वृत्तांवर प्रभुत्व येत जाईल. तेव्हा या वृत्तात सहज आणि ‘बोलल्यासारखी’ अभिव्यक्ती येईल. आणि तेव्हाच ‘शेर कहना’ ही गोष्ट गझलकारांसाठी सहज साध्य होईल. मुक्तछंदात अधिक मोकळीचाकळी आणि ऐसपैस होताना गद्यावतरण झालेल्या मराठी कवितेच्या पार्श्वभूमिवर मग अभ्यासपूर्ण, सराईत,गोळीबंद गझलेची अभिव्यक्ती उठून दिसल्याशिवाय राहणार नाही; एवढे मात्र नक्की. तोपर्यंत मराठी गझलची लाट पूर्णपणे ओसरली तर मराठी रसिक मराठी गझलच्या काव्यानंदाला पारखा झालेला असेल की कृत्रिम मराठी गझलातून मुक्त झाल्याच्या आनंदात असेल हे काळच सांगू शकेल.
तोवर -
तुका म्हणे उगे रहा।
जे जे होईल ते ते पहा॥

सूक्ष्म आणि सुंदर निवृत्ती

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा