१३ मार्च, २००९

खंत एका कलंदर झंझावाताची : सुरेशकुमार वैराळकर




१४ मार्च २००३ रात्री साडेदहा - अकरा वाजताच्या सुमारास फोन वाजला. मंत्र्याचा स्वीय सहायक असल्यामुळे रात्री-बेरात्री येणा-या फोनची घरातल्या सर्वांना सवय झालेली होती. त्यामानाने साडेदहा-अकरा वाजता म्हणजे फोन ब-यापैकी बिफोर टाइम होता. फोन उचलला... पलीकडल्या बाजूला भीमरावजी... ‘‘सुरेश!’’... ‘‘बोला!’’ ‘‘सुरेशच बोलतोय ना?’’ ‘‘हां... हां... बोला दादा’’ ... अरे भटसाहेब गेले रे’ ... ‘‘काय बोलतोस?’’ ‘‘केव्हा?’’ ‘‘आत्ता... अर्ध्या तासापूर्वी. इ टीव्हीकडून फोन होता...’’ क्षणभर मी सुन्न झालो. काहीतरी वेगळेच घडलेय याची एव्हाना बायकोला कल्पना आली होती. फोन ठेवल्या ठेवल्या तिने अधीरपणे प्रश्न केला... ‘‘काय भटबाबा गेलेत...’’ (घरातील सर्वजण त्यांना बाबा म्हणायचे.) प्रभा एकदम रडायलाच लागली.
मी लगेच फोन उचलून नागपूरला भटांच्या घरी फोन लावला. सारखा एंगेज लागणारा फोन एकदाचा मिळाला... पलीकडल्या बाजूला चित्तरंजन... ‘‘हार्ट अटॅक होता. मॅसिव्ह... उद्या दुपारी १२ वाजता अंत्यविधी... तुम्ही या...’’ तो काय बोलत होता ते काहीही कळत नव्हते. एव्हाना रात्रीचे १२ वाजत आलेले... बारा तासात आठशे कि. मी. पोचणे शक्यच नव्हते.
परत फोन वाजला. लोकसत्ताचे सुनील माळी... “शाहीर मघापासून एंगेज लागतोय! बातमी कळली ना? माझ्या माहितीनुसार तुम्ही भटांचे सर्वात निकटचे... थोडा वेळ फोन चालू ठेवा. लोकसत्तामधून फोन येईल. डायरेक्ट डीटीपीवर बसवून ठेवलाय एकाला... तुम्ही सुचेल ते बोला. लगेच छपाईला जाईल.
लोकसत्तामधून फोन आला... सुचेल ते सांगत गेलो. ‘पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी... पासून. मेल्यावरी जगाचे आभार मानले मी... पर्यंत जे जे जसजसे जमले तसे... फोन ठेवल्यानंतर रात्रभर झोप येणे शक्यच नव्हते. उण्यापु-या २४-२५ वर्षांच्या काळातील भटांच्या आठवणी अवतीभवती फेर धरत होत्या.
तुम्ही भटांचे सर्वात निकटचे हे सुनील माळींचे वाक्य वारंवार कानात घुमत होते. खरोखरच मी भटांचा सर्वात निकटचा होतो का? अगदी निकटचा तरी होतो का?
आज भटांना जाऊन जवळजवळ अडीच वर्षे होत आलीत. आम्हीच भटांचे पट्ट्शिष्य! आम्ही भटांचे खरे स्नेही! इथपासून ते भटांचे माझ्याशिवाय पान हलत नव्हते असे छातीठोकपणे सांगणारे अनेक तोतये, हौसे, गवसे, नवसे याकाळात पुढे आलेत. शोकसभांपासून माध्यमांच्या कॅमे-यासमोर निर्लज्जपणे नाचून गेलेत. माणसांचा बेशरमपणा मी समजू शकतो. खोटारडेपणा एकवेळ समजू शका्तो, पण जो हलकट कोडगेपणा काही मंडळींनी दाखवला तो अक्षरश: किळसवाणा होता. हा सर्व प्रकार पाहून,

‘धन्य ती श्रद्धांजली वाहिली मारेक-यांनी 
संत हो ! आता बळीचा न्याय निर्वाळा कशाला!’

ह्या भटांच्या ओळी समस्त भटप्रेमींना आठवल्या असतील. अर्थात,

‘काही भलतेच लोक मागुनी करतील शोक 
तेव्हाही मी त्यांच्या आसवात नसणारच’

असे पूर्वी सांगून ह्या सर्व मंडळींची अलबत्या-गलबत्या- भलत्याच्या गटात आधीच भटांनी वर्गवारी करून ठेवली होती. भटांच्या हयातीत त्यांच्या खाण्या-थुंकण्याबद्दल खरेखोटे लेख लिहून मनस्ताप देणारे महाभाग या श्रद्धांजली सत्रात उरबडवेपणा करण्यात आघाडीवर होते. स्वत:च्या करियरसाठी जमेल तेथे जमेल तसा भटांचा वापर करून नंतर त्यांच्याकडे कायमची पाठ फिरवणारे, त्यांच्याविषयी कुत्सितपणे बोलणारे स्वयंघोषित गजलतज्ज्ञ, गजलसमीक्षक यात होते. भटांच्या श्रद्धांजलीसभेत ‘‘भटांसोबतच मराठी गजल संपली’’ असे उद्गार काही महामहिमांनी काढले तेव्हा केवळ या महापुरुषाच्या मांडीला मांडी लावून बसायला, मिरवायला मिळते या आनंदाच्या धन्यतेत न्हाऊन निघालेल्या या स्वयंघोषित भटकरसांना भटांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने सकस गजललेखन करणा-या महाराट्रातील सुमारे २००/२५०तरुण मुलांचा सोयिस्कर विसर पडला होता. कमीत कमी

‘आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे...

किंवा

‘जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला
मी इथे अमृताचे रोपटे रुजवून गेलो’

हे स्वत: भटांनीच लिहून ठेवले आहे आणि त्या ‘अमृताच्या रोपट्याचे’ वृक्षात रूपांतर झाल्याचे मी याची देही याची डोळा पाहत आहे, असे भट शेवटच्या काही दिवसात अभिमानाने सांगत असत याची आठवण तरी यांना व्हायला हवी होती.
नंतरच्या काळात कुठलाही संदर्भ नसताना एका महाभागाने भटांच्या थुंकण्यावर जाहीर कार्यक्रमात भाष्य करून स्वत:चा दर्जा दाखविला तेव्हा एक म. भा. चव्हाण वगळता त्याला जाब विचारायची कोणाचीही हिंमत झाली नाही.
अजूनही महाराष्ट्रात गावोगाव आणि विशेषत: पुण्या-मुंबईत असे अनेक महाभाग आहेत.
‘माझा गजलसंग्रह स्वत: भट काढणार होते’, ‘माझी अमुक अमुक गजल भटांना इतकी आवडली की या संपादकाला फोन करून त्यांनी ती दिवाळी अंकात छापायला लावली, किंवा या गायकाला बोलावून घेतले आणि कॅसेटमध्ये घ्यायला सांगितली’ अशा स्वरूपाची विधाने ही मंडळी कायम करीत असतात. वस्तुस्थिती काय आहे?
स्वत: भटांचे गजलवारस म्हणून मिरविणा-या कोणाही महाभागाची गजल ४०-५० गजलरचनांच्या पलीकडे गेलेली नाही. याउलट कोणताही गाजावाजा न करता... भटांची प्रेरणा आणि मार्गदर्शन यांचे महत्व मान्य करीत त्यांच्यापासून सन्माननीय अंतर राखून गजललेखन करणारे अनेक रचनाकार सातत्याने मोठ्या संख्येने दर्जेदार गजलरचना करीत आहेत... नावानिशीवार यादी सांगता येईल... परंतु तूर्तास ते नको...
काही मंडळींच्या अशा वागण्यावर स्वत: भटांच्या स्वभावातील काही गुण-दोष कारणीभूत आहेत असे मला वाटते. अगदी सुरुवातीला एखाद्या माणसाची रचना... अगदी एखादी ओळ आवडली आणि त्याने थोडा लाघवीपणा दाखविला तर भट अगदी स्वखर्चाने त्याचा उदोउदो करीत त्याला महाराष्ट्रभर मिरवायचे. ही माणसे काही काळ भटांना वापरून नंतर आपली जात दाखवून पाठ फिरवती झाली म्हणजे भटांना संताप यायचा. परंतु याबाबत आपले स्वत:चे वागणे माणसांचे मूल्यमापन चुकले आहे असे स्वत:शीच कबूल करणेसुद्धा त्यांना अवघड वाटायचे.

१० ऑगस्ट २००२ ला बालगंधर्वला त्यांचा ‘एल्गार’ हा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला. त्याआधी सुमारे महिनाभर ते पुण्यात इन्स्पेक्शन बंगल्यावर वास्तव्यास होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सुमारे महिनाभर उपचार घेताना एक दिवस अचानक आजारीअवस्थेत मला फोन करून बोलावून घेऊन ‘‘आताच्या आता मला येथून बाहेर पडायचे’’ असे निर्वाणीचे सांगून त्यांनी मला इन्स्पेक्शन बंगल्यात आरक्षण करायला सांगितले. मी त्यांचे (आणि माझेसुद्धा) निकटचे मित्र आमदार उल्हासदादा पवार यांना फोन करून या गोष्टीची कल्पना दिली.
ते कोणत्यातरी कारणानं अतिशय दुखावले आहेत- नाराज आहेत याची उल्हासरावांना कल्पना दिली. आजारी अवस्थेत त्यांनी रुग्णालयातून बाहेर पडू नये असे उल्हादादांनीसुद्धा बजावले परंतु भटांचा आग्रह कायम होता... शेवटी त्यांना इन्स्पेक्शन बंगल्यात हलविले.
नंतरच्या सुमारे १५ दिवसात ते ब-यापैकी सावरले. त्या काळास सौ. पुष्पाताई, सुरेश भट, चि. चित्तरंजन हेसुद्धा पुण्यातच होते. गप्पा मारायला नेहमीचे काही निवडक मित्र असले म्हणजे कुटुंबियांना सुट्टी... त्यांनी भटांच्या सासुरवाडीला पंतांच्या गोटात मुक्कामी जावे असा नेम ठरलेला.
१९७९ते २००३ ह्या जवळपास दोन तपांच्या कालावधीतला माझा आणि सुरेश भटांचा ऋणानुबंध... प्रारंभीच्या ‘रंग माझा वेगळा’ नंतरच्या ‘एल्गार’ या त्यांच्या कोणत्याही वाद्यावर, संगीताच्या साथसंगतीशिवाय सादर केलेल्या आगळ्यावेगळ्या तीन-चार तासांच्या गजला-काव्य गायनाच्या महाराष्ट्रभर झालेल्या शेकडो प्रयोगांपैकी, बहुतांशी प्रयोगात निवेदक-सूत्रसंचालक म्हणून तर उर्वरित कार्यक्रमात सहकारीही म्हणून. त्यांच्या सोबतचा प्रारंभापासूनचा साथीदार या नात्याने त्यांचे निकट सान्निध्य लाभले. दौ-यावर असताना त्यांच्या स्वभावातील कलंदराचे अनेक पैलू अनुभवायला मिळाले. त्यांच्या विषयीच्या अनेक चांगल्यावाईट वदंता- दंतकथा यांचा खरेखोटेपणा जवळून पाहता आला.
या सर्व बाबींचा आढावा - किस्स्यांच्या उजळणीत अनेक जवळ आलेल्या, दुरावलेल्या, सुखावलेल्या, मित्रांबाबतची खंत भटांनी इन्स्पेक्शन बंगल्यावरच्या त्या मुक्कामात व्यक्त केली. प्रा. किशोरदादा मोरे यांच्यासंबंधात अकारण दुरावा आल्याचा भटांचा दावा होता. परंतु त्यात स्वत:चा काही दोष आहे हे मान्य करायची त्यांची तयारी नव्हती.
कुटुंबावर जाणते-अजाणतेपणी अन्याय झाला आहे हे त्यांना मान्य होते पण त्यांची जबाबदारी माझ्या एकट्याची नाही. हा दुराग्रहसुद्धा कायम होता.अत्यंत निकटची म्हणविणारी अनेक मंडळी दीनानाथ रुग्णालयात असताना शेजारच्या वार्डामध्ये वेळोवेळी येऊन गेली पण आपल्याकडे फिरकण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नाही याची त्यांना खंत वाटत होती.
काही काही गोष्टींना फक्त दोनच बाजू असू शकतात. एक स्वत: भटांची बाजू आणि दुसरी चुकीची बाजू असल्याचे त्यांचे ठाम मत होते.

वली सिद्दीकी आणि अरविंद ढवळे या त्यांच्या जीवश्च कंठश्च मित्रांबाबत कधीही कोणताही उणा शब्द भट बोलले नाहीत किंवा इतरांनी बोललेला त्यांनी सहन केला नाही. इतर अनेक मित्र, स्नेही काही कालावधीपुरते त्यांच्या अत्यंत जवळ झालेत आणि दुरावलेत... काही दुखावलेत. काहींच्या बाबतीत विनाकरण दुरावा... याविषयी काहीही बोलायला गेले तर मी... किती किती लोकांचे गैरसमज दूर करायला जाऊ... आता माझ्यापाशी तेवढा वेळ राहिला नाही. हे त्यांचे उत्तर.
मंगेशकर कुटुंबियांविषयी अगदी गमतीनेसुद्धा काहीही उणे बोललेले त्यांना खपायचे नाही. ‘उष:काल होता होता’ या अजरामर गाण्याला हृदयनाथ मंगेशकरांनी लावलेली चाल-त्यात वापरलेला कोरस या सर्व प्रकाराने त्या दाहक रचनेला जवळजवळ ‘पिकनिक सॉंग’ चे स्वरूप आले आहे असे माझे मत मी ठासून मांडले म्हणजे ते संतापायचे... “तमाशाच्या गाण्यापलीकडे तुला गाण्यातले काय कळते?’’ असा संतप्त प्रश्न करायचे... ‘लाजून हासणे अन हासून ते पहाणे’ या गाण्याची चाल हृदयनाथांनी चांगली बांधली आहे. परंतु ‘ला’... जानेवारी महिन्यात तर ‘जून’ जून महिन्यात म्हटल्याइतके अंतर का ठेवले कळत नाही! असे म्हटल्यावर एरव्ही शब्दोच्चारांच्या स्पष्टतेबाबत दुराग्रही असणा-या भटांना राग यायचा...
‘‘मी मज हरपून बसले ग ही रचना लता मंगेशकरांना आशा भोसलेइतक्या उत्कटतेने, परिणामकतेने सादर करता आली नसती’’. अशा प्रकारच्या माझ्या विधानावर त्यांनी कधीही उघडपणे मत व्यक्त केले नाही.
या पंचवीसेक वर्षाच्या कालावधीत माझ्याकडून झालेल्या काही मोठ्या प्रमादांना त्यांनी उदारपणे क्षमा केली. काही गोष्टींचा उल्लेखही कधी केला नाही. ‘एल्गार’च्या प्रकाशनाबाबत प्रथम आवृत्तीच्या प्रस्तावनेत माझा उल्लेख केला नाही याबद्दल दुस-या आवृत्तीत जाहीरपणे माफी मागण्याचे औदार्य त्यांनी दाखविले. इतकेच नाही तर पुढच्या ‘झंझावात’ आणि ‘सप्तरंग’ या संग्रहाच्या प्रस्तावनेत मी सुरेशचा कायमचा उतराइ आहे... अशा स्वरूपाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
काही अत्यंत किरकोळ गोष्टीवरून मात्र ‘‘आताच्या आत्ता तोंड काळं कर... आयुष्यभरात पुन्हा तुझे तोंड पाहणार नाही’’ असा हद्दपारीचा आदेश किमान ७-८ वेळा त्यांनी माझ्यावर बजावला होता. माझ्या सुदैवाने बहुतांश वेळा ही हद्दपारीची सजा ४-५ तासांच्या आत रद्द व्हायची. जास्तीत जास्त टिकलेला सजेचा कालावधी दोन दिवस (फक्त एकदाच) विशेष म्हणजे या काळात माझे वास्तव्य नागपुरात धंतोलीला त्यांच्या घरी होते.
पोस्ट खात्यातली तथाकथित चांगलीचुंगली नोकरी सोडून मी गाढवचुक केली असे भटांचे मत होते. ‘‘स्वत:चे सोन्यासारखे आयुष्य स्वत:हून नेम धरून उकिरड्यावर फेकण्याचा पराक्रम तुझ्या नव-याने केला आहे’’. असे माझ्या पत्नीला ते नेहमी सांगायचे. एखादी चांगली नोकरी गाठून मी आयुष्याची घडी पुन्हा बसवावी यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.
१९८०-८५ दरम्यान त्यांचे “शरदराव पवारांचे अत्यंत निकटचे संबंध होते. पवारसाहेबांनी १९८६ मध्ये परत इंदिरा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यात कमालीचा दुरावा/कटुता निर्माण झाली. पण त्यापूर्वी १९८२-८३ च्या काळात समाजवादी कॉंग्रेस (त्यावेळची) पक्षाचे एक कायमस्वरूपी कलापथक असावे, त्यावेळी गण, गवळण, बतावणी, वग, कवने इत्यादी लिखाण भटांनी करावे आणि सादरीकरणाची जबाबदारी पूर्ण वेळ कार्यकर्ता या नात्याने मी सांभाळावी असा प्रस्ताव भटांनी मांडला. समाजवादी कॉंग्रेसचे त्यावेळचे नेते अरुणभाई मेहता यांचेशी याबाबत प्राथमिक चर्चा देखील झाली. पण नंतर त्याबाबत पुढे काही घडू शकले नाही.
नतंरच्या काळात ‘लोकमत’ ची पुणे आवृत्ती सुरू होण्याच्या वेळी मी त्याच ठिकाणी काम करावे यासाठी भटांनी मन:पूर्वक प्रयत्न केलेत. मी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही याचा राग शेवटपर्यंत त्यांच्या मनात होता.
‘आकाशगंगा’ या खंडकाव्याचे पन्नास स्पंद लिहून झालेले आहेत. उरलेले १५० लिहून हे संकल्पित खंडकाव्य पूर्णत्वास न्यावे ही मनीषा होती. स्वत:विषयीच्या काही समज-गैरसमजांना-वंदतांना-योग्य उत्तरे द्यायची राहिली होती. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर बरेच हिशेब चुकते करायचे राहून गेले होते आणि त्यासाठी त्यांनी ‘जीवना तू तसा... मी असा’ हे संकल्पित आत्मचरित्रात्मक पुस्तक पूर्ण करायचे होते. त्यासाठी मी दोन-तीन महिने पू्र्ण वेळ द्यावा अशी त्यांची इच्छा होती.
‘रंग माझा वेगळा’ हा कार्यक्रम ऐन भरात असताना एका कार्यक्रमात फर्माइशीनुसार ‘पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी’ ही रचना त्यांनी सादर केली होती. कार्यक्रमानंतर त्याबाबत चर्चा झाली.

‘सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी’

या ओळींचा संदर्भ देऊन विनोदाने मी त्यांना म्हणालो, ‘‘बाबा... या सोबत्यांमध्ये माझा समावेश आहे का? कारण मला वजन उचलायची प्रॅक्टीस करावी लागेल.
डिसेंबर २००२ मध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी पंधरा दिवस नागपुरात होतो. नेहमीप्रमाणे भटांना भेटायला मी त्यांच्या घरी गेलो. नेहमीप्रमाणे ‘‘अग पुष्पा... वैराळकर आला आहे, मौल्यवान वस्तू कुलपात ठेव’’ असे स्वागत झाले. 
भटसाहेब अत्यंत विमनस्क अवस्थेत होते. ‘‘सुरेश तू आता जाऊ नकोस, १५-२० दिवस तरी थांब... ‘जीवना तू तसा...’ ची काही अत्यंत महत्वाची प्रकरणे तुझ्या उपस्थितीतच लिहिली जावीत असे वाटते... अनेक महत्वपूर्ण घटनांचा तू एकमेव साक्षीदार आहेस... काही गोष्टींची आठवण तूच देऊ शकतोस... आपणाला त्वरा करायला हवी. वली (वलीभाई सिद्दीकी) मागेच गेला... आता अरविंद पाटीलसुद्धा गेला. मला स्वत:चा भरवसा राहिला नाही,’’ इत्यादी.
मी मंत्र्यांच्या आस्थापनेवर स्वीय सचिव म्हणून काम करत असल्याने २००३ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर एप्रिल-मे २००३ मध्ये महिना दोन महिने त्या कामासाठी वाहायचे ठरले अन 
निघताना मी पुन्हा वातावरण मोकळे करावे या हेतूने ‘‘सोबती काही जिवाचे मध्ये मी नाही ना?’’ असे विचारले...‘एप्रिलमध्ये बोलू... सर्व ख-या-खोट्या सोबत्यांविषयी त्यावेळी लिहूनच टाकू’’ भटांनी उत्तर दिले.
१४ मार्च २००३ च्या रात्री भट गेलेत... माझ्या या प्रश्नाप्रमाणेच माझे आणि इतरांचे असेच अनेक जीवघेणे प्रश्न अनुत्तरीत ठेवून...

(‘सुरेश भट : एक कलंदर झंझावात’ या आगामी पुस्तकातून)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: