८ ऑक्टोबर, २००८

मराठी गझलांमधून व्यक्त झालेल्या दलित जाणिवा : डॉ.अविनाश सांगोलेकर


१. प्रास्ताविक: प्रस्तुत शोधनिबंधात मराठी गझलांमधून दलित जाणीवा व्यक्त झाल्या का, त्यांचे स्वरूप काय आदी प्रश्नांची चर्चा करावयाची आहे. त्यासाठी संग्रहबद्ध मराठी गझलांचा धांडोळा घेण्यावर मी भर देणार असून असंग्रहित मराठी गझलांचा संदर्भ मात्र सुटणार नाही ह्याची दक्षता मी घेणार आहे.

२. मराठी गझल लिहिणारे दलित गझलकार:

’गझल’ हा कविता प्रकार मुळचा फारसी भाषेतील आहे तो उर्दु भाषेत सर्वाधिक लोकप्रिय आहे. मराठीत हा कविता प्रकार अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापासून हाताळला जात असून त्याचे प्रमुख चार टप्पे पुढील प्रमाणे सांगता येतात. १. अमृतराय व मोरोपंत यांची गझल. २. माधव जुलियन यांची गझल. ३. सुरेश भटांची गझल. ४. सुरेश भटांच्या नंतरची आजची गझल. अमृतराय, मोरोपंत, माधव ज्युलियन, सुरेश भट हे दलितेतर गझलकार होत. नेमकेपणाने सांगावयाचे तर ब्राह्मण जातीतील गझलकार होत. मात्र त्यांनी आपल्या गझलांमधून दलित जाणीवा व्यक्त केलेल्या नाहीत असे नाही. केशवसुत जातीने ब्राह्मण असतांनाही ‘अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न’ यासारख्या कवितेतून ते समर्थपणे दलित जाणीवा व्यक्त करताना दिसतात. सुरेश भट हे जातीने ब्राह्मण होते तरीही त्यांनी आपल्या काही गझलांमधून दलित जाणीवा व्यक्त केलेल्या आहेतच.अशा प्रकारे दलितेतरांनी व्यक्त केलेल्या दलित जाणिवा हया सहानुभुतीमधून, निरीक्षणामधून,सहृदयतेमधून, मानवतेमधून व्यक्त केलेल्या आहेत हे उघडच आहे. प्रत्यक्ष दलितच जेव्हां हया जाणिवा व्यक्त करतो तेंव्हा त्या जाणीवांना स्वानुभवाचे, आत्मनिष्ठेचे, वास्तवतेचे मोठे पाठबळ लाभत असते ह्यात शंका नाही. मराठी गझलांमध्ये हे चित्र अलिकडे दिसू लागले आहे. भगवंत बनसोडे (मुंबई), ल. स. रोकडे (नागपूर) , डी. बी. रत्नाकर (कोल्हापूर), रमाकांत जाधव (मुंबई), घनश्याम धेंडे (पुणे), हृदय उर्फ बंडू चक्रधर (नागपूर), मनोहर रणपिसे (मुंबई), ललित सोनोने (गुंजी,जि. अमरावती), द्शरथ दोरके (पुणे), गौरवकुमार आठवले (नासिक रोड), पोपट आबा कांबळे (गडमुडशिंगी,जि. कोल्हापूर) या दलित कवींनी गझल हा कविता प्रकार मोठ्या प्रमाणात हाताळलेला आढळतो. यातील बहुतेकांच्या गझला त्यांच्या कवितासंग्रहांमधून, गझलसंग्रहांमधून रसिकांसमोर पर्यायाने समाजासमोर आलेल्या आहेत. यातील काही गझलकारांच्या गझला ‘काफला’ (१९९०) , ‘कारवा’ (२०००) , ‘विदर्भाची मराठी गझल’ (२००४) या तीन प्रातिनिधिक मराठी गझलसंग्रहामधूनही त्या त्यावेळी समाजासमोर आलेल्या आहेत.
. दलित गझलकारांच्या गझलांमधून व्यक्त झालेल्या दलित जाणिवा:

गौतम बुद्ध, डॉ. आंबेडकर या थोर व्यक्ती दलित कवितेच्या प्रेरणास्थानी होत. हे दलित गझलकारांच्या गझलांमधूनही मनावर ठसते. पुण्यातील एक ज्येष्ठ गझलकार घनश्याम धेंडे डॉ. आंबेडकरांना उद्देशून म्हणतात - ‘देह नाशवंत हा जरी जगी न राहिला नांदतोस आजही जनामनात तू भीमा!’ नासिकरोड येथील नव्या पिढीतील गझलकार गौरवकुमार आठवले डॉ. आंबेडकरांना आवाहन करताना म्हणतात- ‘होऊन सूर्य-चंद्र येऊ नकोच आता; ज्वालामुखी उद्याचा होऊन ये भीमा तू’ युध्दाच्या पार्श्वभूमिवर आठवले यांना प्रेम, शांती, अहिंसा, यांची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध अधिक महत्वाचे वाटतात म्हणून ते बुद्धांनाच प्रश्न विचारतात- ‘युध्दात विश्व सारे गुंतून आज आहे; तू प्रेम, शांती आम्हा देणार का जरासा?’ डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांचे अनुयायी म्हणविणा-यांकडून दलित समाजाचा अपेक्षाभंग झाल्याची व्यथा काही गझलकारांनी बोलून दाखविली आहे. नागपूरचे ज्येष्ठ गझलकार ल.स. रोकडे स्पष्ट म्हणतात- ‘कुत्री येथे जरी भुंकती; पॅंथर अमुचे पळू लागले’ आपल्या दुस-या एका गझलेत रोकडे म्हणतात- ‘जेव्हा पुढे निघालो आम्ही लढावयाला; हातातली निशाणे फेकून कोण गेले?’ घनश्याम धेंडे हे मोठ्या खेदाने डॉ. आंबेडकरांना उद्देशून कटू सत्य सांगतात ते असे- ‘ते तुझे पाईक काही नामधारी; मांडला त्यांनी तुझा बाजार भीमा!’ दलित समाजाची नीट एकजूट झाली नसल्याची खंत गौरवकुमार आठवले हे डॉ. आंबेडकरांना उद्देशून कशी सांगतात पहा- ‘आमची झालीच नाही एकता बाबा अजूनही; दोन पार्ट्या, तीन झेंडे एकट्या गावात आहे!’ दलितांना प्रस्थापित समाज हा अजूनही नीटपणाने वागवत नाही याची खंत-चीड काही गझलकारांनी पुढीलप्रमाणे व्यक्त केली- अ) भागवत बनसोडे : ‘मी कसा कोठून आलो,काय माझे नाव आहे? हिंडतो उप-यापरी मी, कोण माझे गाव आहे?’ ब) ल. स. रोकडे : ‘जगणे जेव्हां कळू लागले; वाडे अमुचे जळू लागले’ ‘माणसांनाच दूर ठेवाया; वेद अद्याप सांगती येथे’ ‘जरी या मायभूमीची , इथे ही लेकरे सारी; कुणाला ‘रोकडे’ परका, कुणाला जवळचा ‘काणे’!’ अशी प्रतिकूल परिस्थिती असताना मग त्यावर मात करायची, तर डॉ. आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा या संदेशाचे आचरण केले पाहिजे यावर या गझलकारांची श्रद्धा आहे म्हणून रोकडे म्हणतात- ‘युध्द हे आमचे जारीच ठेवू; काल ही आमची माघार नव्हती!’ ‘ठेव तू तलवार हाती, ठेव तू अंगार हाती; कापणा-यां काप दोस्ता, जाळणा-यां जाळ दोस्ता’ ‘हे भीमबांधवा रे! ये भीमसैनिका रे! दावून भीमशक्ती तोडून टाक फासे’ ‘दलित होता झोपेमध्ये; आज तोही उठला आहे’ क) घनश्याम धेंडे : ‘टाकले पाऊल जेव्हा देवळाच्या आत मी; देव गाभा-यात तेव्हा का दडाया लागला?’ ड) गौरवकुमार आठवले : ‘जाणून काय घेतो तू नाव गाव माझे? जातीस माणसाच्या पुसतात लोक येथे’ ‘जात आणि पोटजाती बाजूला ठेवून द्या रे; माणसांनो! फक्त ठेवा माणसाची जाण आता!’ इ) रमाकांत जाधव : ‘शेषाच्या माथी अपुली धरती कधीच नव्हती; त्या राबत्या हातांनी तोलता पाहिली मी’
४. समारोप : अशा प्रकारे मराठी गझलांमधून व्यक्त झालेल्या दलित जाणिवांचे आपण धावते दर्शन घेतले. अन्यही दलित गझलकार आहेत. परंतु त्यांच्या गझला उपलब्ध न झाल्यानं त्यांचा येथे विचार करता आलेला नाही. दलित जाणिवा व्यक्त करणा-या ह्या व अन्य मराठी गझला या व्यापक अर्थाने दलित कवितेचाच एक वेगळा अविष्कार होत. शिवाय दलित कवितेमध्ये सामाजिक विषमतेशी संबंधित अशा भाव-भावना व्यक्त झालेल्या असल्याने दलित कविता ही मराठीतील सामाजिक कवितेचाही एक महत्वपूर्ण भाग आहे. तसा ‘गझल’हा मूळचा प्रेमविषयक कविता प्रकार आहे परंतु सूफी संतांनी त्याला इश्वर प्रेमाचे नवे परिमाण दिले, स्वातंत्र प्राप्तीच्या चळवळीत उर्दु गझलकारांनी या काव्यप्रकाराला स्वातंत्र प्रेमाचे, देशप्रेमाचे अजून एक नवे परिमाण बहाल केले. त्या पार्श्वभूमिवर आता मराठी गझलांमधून दलितप्रेम, समाजप्रेम, मानवतावाद या गोष्टी विपुल प्रमाणात व विविध प्रकारांनी व्यक्त होऊ लागल्या आहेत. मराठी गझलांमधून व्यक्त झालेल्या दलित जाणिवा आपण जाणून घेतल्या नंतर हे प्रकर्षाने आपल्या लक्षात आल्यावाचून राहत नाही हे खरे.
संदर्भ व टीपा :
१. धेंडे घनश्याम : ‘बासरी’ मानसन्मान प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती १४ जानेवारी १९९९, पृष्ठ ३६
. आठवले गौरकुमार : ‘सवाल’ श्री समर्थ साई वितरण, पुणे, प्रथम आवृत्ती मार्च २०००, पृष्ठ ४६

. तत्रैव, पृष्ठ १८,३४,६०,७३,७०,७५,८१

. रोकडे ल. स. : ‘ओल्या जखमा’ अभिजित प्रकाशन, नागपूर, प्रथम आवृत्ती १० नोव्हे. १९८९

. धेंडे घनश्याम : उनि, पृष्ठ १९

. आठवले गौरवकुमार : उनि, पृष्ठ ४१

७. बनसोडे भागवत, : ‘दळा कांडा’ रानमन प्रकाशन, मुंबई, प्रथम आवृत्ती , २६ डिसेंबर. १९८२, पृष्ठ ४२
. रोकडे ल.स. : उनि, पृष्ठ १७

. धेंडे घनश्याम : उनि, पृष्ठ ४७

१०. आठवले गौरवकुमार : उनि, पृष्ठ १३
११. रोकडे ल. स. : उनि,पृष्ठ ६८
१२
. तत्रैव पृष्ठ ७०,७५,८१

१३
. जाधव रमाकांत : ‘गीत गझल’ हिरा प्रकाशन, डोंबिवली, प्रथम आवृत्ती, नोव्हें १९९८, पृष्ठ ४१

१४
. आठवले गौरव कुमार : उनि, पृष्ठ ५१

१५
. विशेषत: सोलापूर येथील नव्या पिढीतील एक महत्वाचे कवी डॉ. धम्मपाल रत्नाकर हयांच्या ‘लक्तरांची गझल’ नीहारा प्रकाशन पुणे, प्रथम आवृत्ती ६ डिसें १९९४ पृष्ठ ३६ किंमत रू १५/- हा कविता संग्रह उपलब्ध होऊ शकला नाही. त्यांनी एकेकाळी चांगल्या गझला लिहिल्या होत्या, हे त्यांच्या ह्या पहिल्या कवितासंग्रहावरून लक्षात येते.

१६
. सदर शोध निबंधासाठी माझा गझलाकार मित्र प्रदीप निफाडकर (पुणे) ह्याची मला मदत (नेहमी प्रमाणे) झालेली आहे. हे येथे कृतज्ञतापूर्वक नोंदवतो.

संपर्कासाठी पत्ता :- डॉ. अविनाश सांगोलेकर, प्रपाठक,मराठी विभाग, पुणे विद्यापीठ,पुणे-४११००७ मो. - ९८५०६१३६०२ ***************************************************************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: