मराठी गझल : १९२० ते १९८५
रत्नाकर बापूराव मंचरकर
०१ विचारप्रवृत्त करणारा गझलविचार
(प्रस्तुत लेखाच्या प्रसिद्धीनंतर डॉ.अविनाश कांबळे यांनी आपले आडनाव ‘कांबळे’ ऐवजी ‘सांगोलेकर ’ धारण केले आहे-संपादक).
‘‘मराठी गझल : १९२० ते १९८५’’ हा डॉ.अविनाश कांबळे यांचा ग्रंथ मराठी गझल विचारात मोलाची भर घालणारा आहे.गझलेची चर्चा १९१९ पासून मराठीत होत आलेली आहे. एखाद्या-दुस-या जुजबी पुस्तकाचा अपवाद वगळला तर ही बरीचशी फुटकळ व प्रासंगिक आहे. अज्ञान, अर्धवट माहिती, पूर्वग्रह आणि अभिनिवेश यांनी ती ब-याच प्रमाणात डागाळलेली आहे.
मराठीतील चांगली गझलसमीक्षा ही माधव जूलियन, सुरेश भट यांच्यासारख्या चांगल्या गझलकारांनीच लिहिलेली आहे. हे दोघेही बहुभाषिक पर्यावरणात वाढलेले सृजनशील कलावंत आहेत. गझलनिर्मितीच्या आंतरिक अनुभवात त्यांना काही अडथळे जाणवत होते. त्यासाठी ते गझलविचाराकडे वळलेले दिसतात. मराठी काव्य व परंपरा यांचे जागते भान ठेवून त्यांनी फार्सी,उर्दू गझलेचा विचार केला. तिला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.
डॉ.अविनाश कांबळे हेही असे ‘पोएट-क्रिटिक’ आहेत. आपल्या काव्यनिर्मितीच्या अंतरिक गरजांमधून तेही समीक्षेकडे वळताना दिसतात. गझलनिर्मितीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ‘गझलधारा’ आणि ‘काफला’ या प्रातिनिधिक संग्रहातून त्यांनी वेचक मराठी गझलांचे संकलन-संपादन केले. एम. फिल. च्या निमित्ताने आरंभापासून 1920 पर्यंतच्या मराठी गझलेचा त्यांनी शोधपूर्वक धांडोळा घेतला होता. आता गझलेचा तात्विक आणि ऐतिहासिक परामर्श त्यांनी पीएच. डी. प्रबंधाच्या रूपाने आपल्या समोर ठेवलेला आहे. एखाद्या विषयाचा ध्यास घेउन अनेक बाजूंनी त्याचा विचार करणे, आंतरिक गरजांमधून संशोधनाकडे वळणे, त्याचा चिकाटीने व साक्षेपाने पाठपुरावा करणे ही आज दुर्मीळ झालेली वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनातून जाणवतात.
मराठी गझलेच्या वाटचालीचा त्यांनी घेतलेला चिकित्सक आढावा विचारांना चालना देणारा आहे.
०२ अभिजातवादी प्रकारनिष्ठ समीक्षा
डॉ.कांबळे यांचा ग्रंथ एका काव्यप्रकाराचा इतिहास सांगणारा ग्रंथ आहे. त्यामुळे त्यातील विवेचनाला प्रकारनिष्ठ समीक्षेचे रूप प्राप्त होते.
कोणतीही साहित्यकृती कोणत्या ना कोणत्या साहित्यप्रकारामध्ये मोडते. ऍरिस्टॉटल किंवा भरतमुनी यांचे साहित्यप्रकाराचे मॉडेल सामान्याश्रयी होते. त्यात एखाद्या साहित्यप्रकारातील संकेतांचा संच निश्चित समजला जातो. प्रत्येक साहित्यप्रकाराचे स्वत्व त्याच्या शुद्धतेमध्ये असते. इतरांपासून असणा-या वेगळेपणात असते; असे अभिजातवादी समीक्षा मानते. तीत त्या त्या साहित्यप्रकाराचे एक आदर्श आणि स्थिर असे नमुनारूप मानले जाते. त्यानुसार विशिष्ट साहित्यकृतीचे वर्गीकरण व मूल्यमापन केले जाते. कोणतीही साहित्यकृती ज्या प्रकारात मोडते त्याचे सामान्यगुण, जातितत्व लक्षात घेऊन साहित्यकृतीची पाहणी करणे म्हणजे प्रकारनिष्ठ समीक्षा; असे अभिजातवाद्यांना वाटते. डॉ.कांबळे हीच भूमिका घेतात.
गझलेची पाहणी करण्यापूर्वी डॉ.कांबळे तिची एक निश्चित संकल्पना गृहीत धरतात. फार्सी-उर्दू गझलेचे मूळ स्वरूप ते प्रमाण मानतात. गझलेचा ‘आकृतीबंध’ हा शब्द ते ‘फॉर्म’ या अर्थाने वापरतात आणि चर्चा मात्र निव्वळ रचनेची करतात. त्यामुळे येथे ‘रचनाबंध’ हा शब्द वापरणे अधिक योग्य झाले असते. गझलेची वृत्तयोजना, काफिया व रदीफ हे यमकांचे प्रकार व त्यांचे नियम, द्विपदींची संख्या, त्यांची स्वयंपूर्णता आणि पहिल्या (‘मतला’) व शेवटच्या (‘मक्ता’) द्विपदींचा वेगळेपणा हे गझलेचे तंत्रविशेष त्यांनी स्पष्ट केले आहेत. गझलेचे आशयविश्व आणि गझलकाराची आत्ममग्न, बेहोशीची गझलवृत्ती याही वैशिष्ट्यांचा उल्लेख ते करतात. पण एखाद्या कवितेची तपासणी करताना मात्र ते गझलेच्या रचनाबंधाला, तिच्या तंत्राला सगळयात अधिक महत्व देतात. बा. भ. बोरकर, विंदा करंदीकर यांच्या गझलवृत्तीचा गौरव करूनही प्रसंगी तांत्रिक कारणांनी ते त्यांच्या कवितांचे गझलत्व नाकारतात. तंत्र हेच गझलेचे प्राणभूत वैशिष्ट्य ते मानतात, हे या ग्रंथाच्या पानापानातून स्पष्ट होते. त्यामुळे त्यांची गझलेची संकल्पना विवेचनात व्यापक वाटली तरी प्रत्यक्षात निव्वळ तांत्रिक झालेली आहे.
गझलेचे रूप ते स्थिर, अपरिवर्तनीय मानतात. या मूळ तांत्रिक नमुन्याप्रमाणे आहे की नाही या एकाच कसोटीवर ते एखाद्या कवितेचे गझलत्व ठरवितात. मुळाबरहुकूम नसलेल्यांना ते गझल मानीत नाहीत. मुळाबरहुकूम असलेल्यांचे काव्यसौंदर्य त्यापेक्षा वेगळया काव्यघटकात शोधीत नाहीत. येथे गझलेच्या संकेतांनाच कर्मठ मूल्यांचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे त्यांचे विवेचन यांत्रिक, साचेबंद, ठरीव आणि तंत्रनिष्ठ होते.
सामान्याकडून विशिष्टाकडे जाण्याची ही निगमनात्मक दृष्टी आहे. ती आजच्या साहित्यप्रकारनिष्ठ समीक्षेत नाकारली जाते. विशिष्टाकडून सामान्याकडेही जाता येते. पण हीदेखील वर्णनात्मक दृष्टी आज गौण मानली जाते. आज सामान्य आणि विशिष्ट यांचा द्वंद्वात्मक विचार अधिक महत्वाचा मानला जातो. चांगली साहित्यकृती ही त्या साहित्यप्रकाराच्या काही संकेतांचे पालन करीत असते. तसेच काही संकेतांचे उल्लंघनही करीत असते. अशाप्रकारे साहित्यकृती स्वत:चे रूप घडवीत असते. त्यामुळे कोणत्याही साहित्यप्रकाराचा संकेतव्यूह ऐतिहासिक पातळीवर खुला असतो, बदलता असतो असे मानावे लागते.
सामान्य आणि विशिष्ट यांचा असा परस्परावलंबी विचार केला असता तर मराठी परंपरेत गझलेची संकल्पना कशी व का बदलली तिचे उणे-अधिक काय याचा शोध डॉ. कांबळे यांना अधिक नेमकेपणाने घेता आला असता. आहे या स्थितीत डॉ. कांबळे यांची मूल्यप्रामाण्यवादी आणि तंत्रनिष्ठ भूमिका त्यांच्या विवेचनाला मर्यादित करते असे मला वाटते.
त्यांच्या विवेचनातील एक महत्वाचा मुद्दा येथे अधोरेखित करण्यासारखा आहे. मराठी समीक्षेवर संस्कृत आणि इंग्रजी परंपरांचा प्रभाव आहे. त्यामुळे फार्सी-उर्दूतून मराठीत आलेल्या साहित्यप्रकारांचे यथार्थ आकलन होऊ शकत नाही. गझलेचे अंगभूत वेगळेपण पुसून टाकून तिला भावगीताचे किंवा भावकवितेचे रूप देण्याचा प्रयत्न; हे त्याचे एक उदाहरण आहे. यादृष्टीने गजल-ए-मुसलसिल आणि गजल-ए-गैरमुसलसिल यांचे स्वरूप आणि त्यांचे भावगीताहून असणारे वेगळेपण यांचे सुस्पष्ट विवेचन डॉ.कांबळे यांनी केले आहे. मराठी गझलेचा विचार निव्वळ उर्दू गझलेच्या नव्हे तर फार्सी गझलेच्या संदर्भातही झाला पाहिजे असे त्यांनी नेमकेपणाने दाखवून दिले आहे. अरबी-फार्सी-उर्दू यांचे छंदशास्त्र, साहित्य आणि समीक्षा यांची परंपरा अधिक जाणीवपूर्वक लक्षात घेण्याची गरज त्यांनी पटवून दिली आहे. हे त्यांच्या ग्रंथाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे.
३. मराठी गझलरचनेचा इतिहास :
‘मराठी गझल : १९२० ते १९८५’ हा गझलेचा इतिहास सांगणारा ग्रंथ आहे. साहित्याचा इतिहास तथ्यलक्षी, रूपलक्षी, अनुबंधलक्षी आणि समग्रलक्षी अशा वेगवेगळ्या प्रकारांनी लिहिता येतो-यात डॉ.कांबळे यांच्या ग्रंथाला कितपत यश लाभले आहे, त्याचा थोडक्यात विचार करू.
३.१ विश्वसनीय तथ्यलक्षी इतिहास
तथ्यलक्षी इतिहास म्हणून या ग्रंथाला मोठे यश मिळालेले आहे. साहित्यकृतीची निर्मिती आणि तिला मिळालेला रसिकांचा प्रतिसाद ही दोन्हीही साहित्यिक घटिते आहेत. त्यांची कलासंगत, साधार नोंद करणे म्हणजे साहित्यिक इतिवृत्त होय. ते वस्तुस्थितीदर्शक असावे लागते. कोणत्याही इतिहासाला अशा इतिवृत्ताचा आधार असावा लागतो, कारण त्याच्या आधारानेच साहित्यिक घटितांचा एकमेकांशी संबंध लावता येतो आणि त्याचा अर्थ जाणता येतो.
डॉ.कांबळे यांच्या ग्रंथाचा विशेष हा की मराठी गझलेचे विश्वसनीय इतिवृत्त त्यांनी मोठ्या परिश्रमाने सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांच्या इतिहासाला विश्वसनीयता आणि प्रामाण्य लाभले आहे. डॉ.कांबळे यांनी ज्याचा सूक्ष्म अभ्यास सादर केला आहे अशा काव्यसंग्रहाची संख्याच मुळी ११५इतकी आहे. पण या ११५ काव्यसंग्रहांचा शोध घेताना त्यांना जवळजवळ सगळीच मराठी कविता तपासावी लागली आहे. त्यासाठी केवळ काव्यसंग्रहच नव्हे तर संग्रहबद्ध न झालेली कविताही त्यांनी चाळली. दैनिके, साप्ताहिके, मासिके, विशेषांक यांच्या कित्येक संचिका त्यांनी डोळ्याखालून घातल्या आहेत.
कुसुमाग्रजांनी एकूण ६५० कविता लिहिल्या त्यापैकी गझल म्हणून विचार कराव्यात अशा ११कविता त्यांना आढळल्या. या ११ कवितांच्या छाननीतून जिला गझल म्हणता येईल अशी एकच कविता कुसुमाग्रजांच्या नावावर नोंदविता येईल, असा निष्कर्श ते काढतात. तेव्हा त्यामागे केवढे परिश्रम आहेत याची कोणालाही कल्पना यावी. केवळ मोठमोठ्याच नव्हे तर प्रत्येक बारीकसारीक कवीची त्यांनी अशीच पाहणी केली आहे. कवीचा जीवितकाळ, लेखनकाळ, प्रसिद्धीकाळ, त्याची संग्रहबद्ध व असंग्रहित काव्यनिर्मिती, त्यातील गझलरचनेचा शोध,तिची तंत्रशुद्धतेच्या दृष्टीने बारकाईची तपासणी, यांची नेमकी, विश्वसनीय आणि रेखीवपणे दिलेली माहिती या ग्रंथात प्रथमच एकत्रित स्वरूपात पाहता येते.
अचूक आकडेवारी आणि काटेकोर तपशील हा त्यांच्या ग्रंथाचा खास विशेष आहे. मराठी गझलेचे संकलन, परिगणन, वर्गीकरण आणि व्यवस्थापन करण्याचा एवढा व्यापक प्रयत्न मराठीत कोणीही केलेला नाही. त्यांच्या मूळ प्रबंधाला जोडलेली 100 पानांची संदर्भसूची त्यांच्या अमर्याद कष्टाची साक्ष देणारी आहे. मराठी गझलेचा तथ्यलक्षी इतिहास म्हणून अजोड ठरेल असे परिश्रमाचे व निर्दोष नोंदीचे हे काम आहे.
३.२ रूपलक्षी इतिहासाच्या मर्यादा
साहित्यकृतींच्या रूपाचा वेध घेणे आणि त्यातील स्थित्यंतरांचा आलेख चितारणे हे रूपलक्षी साहित्येतिहासाचे उद्दिष्ट असते. डॉ.कांबळे यांचा ग्रंथ मराठी गझलेच्या वाटचालीचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करतो. डॉ.कांबळे यांनी माधव जूलियन आणि सुरेश भट या मराठीतील चांगल्या गझलकारांचा स्वतंत्र प्रकरणांमधून तपशीलवार विचार केला आहे. त्यांचे एकूण काव्य, त्यातील गझलरचना, तिचे सामर्थ्य, मर्यादा, त्यांचा गझलविचार व मराठी गझलेच्या प्रवाहातील त्यांचे स्थान असा औरसचौरस व समतोल विचार त्यांनी केला आहे.
मूळ फार्सी-उर्दू गझलेचे स्वरूप माधवरावांना नीट माहीत होते. तरीही त्यांनी ते जसेच्या तसे मांडले नाही. त्यांनी त्याची चिकित्सा केली. त्याचे परिष्करण केले. स्वतंत्र, स्वयंपूर्ण द्विपदी आणि यमकबंधने ही गझलेची प्राणभूत वैशिष्ट्ये. पण माधवरावांना नेमकी तीच दोषास्पद वाटली. त्यांनी गझलेला भावगीताचे किंवा भावकवितेचे रूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विचारांचा प्रभाव मराठी गझल आणि समीक्षा यांवर दीर्घकाळ राहिला. त्यामुळे गझलेचे तंत्रशुद्ध रूप मराठीत प्रकट होऊ शकले नाही. ते रूप प्रकट झाले ते सुरेश भट यांच्या गझलरचनेतून व गझल विचारातून. फार्सी-उर्दूतील गझलेचा रचनाबंध त्यांनी मुळाला अनुसरून मांडला. स्वत: कसदार गझलनिर्मिती केली. गझल पठण, गझल गायन यांना चालना दिली. नव्या गझलकारांची पिढी घडविली. त्यामुळे मराठीत गझलयुग अवतरले.
कवितेचा इतिहास लिहिणाराला भूतकालीन काव्यसृष्टीची एक व्यवस्था लावावी लागते. मराठी गझलेच्या या इतिहासात डॉ.कांबळे यांनी पुष्कळच व्यवस्थापनकुशलता दाखविली आहे. माधव जूलियन अणि सुरेश भट या अक्षांश-रेखांशात मराठी गझलेचा नकाशा त्यांनी सिद्ध केला आणि त्यात इतर सर्व कवींचे स्थानांकन केले. मराठी गझल क्रमाने शुद्ध होत गेली, असे तिच्या विकासाचे सूत्रही त्यांनी अधोरेखित केले आहे.
हे सर्व विवेचन पुष्कळसे पटण्यासारखे आणि समाधानकारक आहे. तथापि डॉ.कांबळे यांनी आपल्या विवेचनाची मांडणी व्यक्तिप्रधान केलेली आहे. त्याऐवजी त्यामागील प्रवृत्तींचा त्यांनी शोध घेतला असता तर संस्करणवादी आणि मूलप्रामाण्यवादी अशा दोन धारा त्यांना शोधता आल्या असत्या; त्यातील द्वंदातून मराठी गझलेचे गतिचित्र रेखता आले असते; असे वाटते.
डॉ.कांबळे यांची गझलेच्या रूपाची संकल्पना केवळ तंत्रापुरती मर्यादित आहे. त्यामुळे त्यांच्या काव्येइतिहासाला रूपलक्षी म्हणण्यापेक्षा तंत्रलक्षी म्हणणे अधिक योग्य ठरेल.
३.३ अनुबंधलक्षी इतिहासाच्या उणिवा
साहित्य आणि सांस्कृतिक पर्यावरण यांच्या परस्परसंबंधांचा उलगडा करणे हे अनुबंधलक्षी साहित्येतिहासाचे काम असते. त्यामुळे साहित्याचे स्वरूप, त्याची जडणघडण अशीच का आहे, याची कारणमीमांसा करता येते.
मराठी गझल आणि मराठी समाज व संस्कृती यांच्या संबंधांचे ओझरते उल्लेख या ग्रंथात येतात. पण त्यांचा सखोल वेध घेण्याचे पुरेसे प्रयत्न केले जात नाहीत.
अरबी ‘खम्रीयात’ आणि फार्सी ‘कसिदा’ यांच्या एकीकरणातून ‘गझल’ आकाराला आली. तिची बीजे अरबी संस्कृतीत आहेत. त्यांचा विकास इराणी संस्कृतीच्या संयोगीकरणाची पार्श्वभूमी आहे. सातव्या शतकापासून गझलेचे अस्तित्व दाखविता येते.अनेक संस्कृतींच्या संमीलनातून आकाराला आलेल्या गझलेचा प्रादेशिक व्याप-विस्तार मोठा आहे. तिला प्रदीर्घ काळात टिकलेली एक सातत्यपूर्ण परंपरा आहे. भारतात बाराव्या शतकातील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती या सूफी परंपरेतील साधुकवीच्या वाणीतून तिचा पहिलावहिला आविष्कार झाला. सतराव्याशतकापासून उर्दू, हिंदी, पंजाबी, गुजराथी, मराठी या भारतीय भाषांतून ती फुलारली. परभाषेतून आणि दुस-या संस्कृतीतून गझल हा काव्यप्रकार मराठीत आला या घटनेची ऐतिहासिक नोंद डॉ.कांबळे करतात, पण त्या घटनेमागील संस्कृतिसंयोगाची प्रक्रिया उलगडून पाहत नाहीत.
‘इराणी घाटाचा कुंभ’ असे गझलेचे वर्णन माधव जूलियनांनी केले आहे. इराणी संस्कृती ही ‘द्राक्ष संस्कृती’ आहे तर आपली संस्कृती ही ‘रूद्राक्ष संस्कृती’ आहे. ज्या बेभान प्रेमाचे आवेगी, उत्कट उद्गार गझलेत व्यक्त होतात ते प्रेम लाभावे अशी स्थिती आपल्या समाजजीवनात नाही. जातीपातींनी चिरफाळलेले आणि कुटुंब, धर्म अशा संस्थांनी बांधलेले आपले व्यक्तिजीवन आहे. त्यात गझलेतील प्रेमातुरता आणि सीमेची बेहोषी यांना कितपत वाव आहे?
राजदरबारातील मुशायरे, नर्तकींचे कोठे, मयखाने आणि सूफी साधूंचे मठ यांच्या पर्यावरणात गझल घडली-वाढली. त्याचा मागमूसही आपल्या संस्कृतीत नाही.
गझलेमागे जी जीवनसृष्टी आहे ती क्षणवादाची आहे. जीवनाला अंत आहे. ते मर्त्य आहे, क्षणभंगूर आहे. त्यामुळे जो क्षण माझ्या वाट्याला आला त्याला उत्कटतेने सामोरे जाण्यात, तो समरसून जगण्यात, भोगण्यातच त्याचे साफल्य आहे; अशी ती जीवनधारणा आहे. याउलट आपली संस्कृती आत्म्याच्या अविनाशीत्वावर विश्वास ठेवणारी, चिरंतनावर श्रद्धा ठेवणारी आहे. या परस्परविरोधी धारणांमधून मराठी गझलेने कसा मार्ग काढला; याचा शोध घ्यावयास हवा.
साहित्य हे संस्कृतीच्या संरचनेचे एक अंग असते. त्यामुळे एका संस्कृतीतील गोष्ट दुस-या संस्कृतीत तशी रेडीमेड घेता येत नाही. बाहेरून येणा-या प्रभावांना रूपांतरित करून आत्मसात करण्याची क्षमता प्रत्येक जिवंत आणि जोमदार संस्कृतीमध्ये असते. आत्मसातीकरण ही संस्कृतीच्या संपन्नतेची खूण असते. मराठी गझलकारांनी घेतलेले रचनास्वातंत्र्य आणि गझलेत केलेले बदल हे या मराठीकरणाचेच आविष्कार आहेत. इराणी गझलेच्या मराठी आत्मसातीकरणाची ही प्रक्रिया डॉ.कांबळे लक्षात घेत नाही. या प्रक्रियेत परिष्करण ही अटळ गोष्ट ठरते. पण मूलप्रामाण्यवादी भूमिका स्वीकारल्यामुळे डॉ.कांबळे तिच्याकडे दुर्लक्ष करतात.
इ. स. १९२० ते ४० आणि इ. स. १९६५ ते ८५ हे गझलेच्या लोकप्रयितेचे कालखंड मराठी समाजाच्या-हासाचे कालखंड होते, असे निरीक्षण डॉ.कांबळे यांनी नोंदविले आहे पण त्याचा मागोवा मात्र घेतलेला नाही.गझलेतील जीवनदृष्टी आणि त्या त्या कालखंडाचा युगधर्म यांच्या संबंधांचा ताळमेळ पाहणे येथे आवश्यक होते. समाजाच्या मध्यवर्ती जीवनधारणेत विशिष्ट मूल्यांचे स्थान काय याचे उत्तर प्रत्येक संस्कृतीत आणि त्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे असू शकते.
अपवाद वगळता पुष्कळशा मराठी गझलेत तंत्राचा बडिवार दिसतो. नटण्यामुरडण्याकडे, काट्याकाळजीने केलेल्या सजावटीकडे अधिक लक्ष देण्याची प्रवृत्ती आढळते. या गोष्टींचा संबंध-हासकालाशी लावता येईल का; याचा शोध घ्यायला हवा होता.
समाजाच्या अवनत अवस्थेत निर्माण झालेले साहित्य अवनतच असते असे नाही. साहित्य व समाज यांचे संबंध एकेरी, साधे व सरळ नसतात. पण त्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न येथे नाही. त्यामुळे डॉ.कांबळे यांचा हा गझलेचा इतिहास अनुबंधलक्षी इतिहास होऊ शकलेला नाही.
०४ मराठी गझलयुगाचा टीकाकार आणि टीकाग्रंथ
अशा काही मतभिन्नतेबरोबरच डॉ.अविनाश कांबळे यांच्या ग्रंथाचे श्रेयही मोकळेपणाने मान्य केले पाहिजे. डॉ.कांबळे यांच्या विवेचनशैलीची अनेक प्रशंसनीय वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे वाचन चौफेर आहे. त्यामुळे अनेकविध संदर्भांची ते विवेकपूर्ण मांडणी करू शकतात. त्यांच्याजवळ सारग्रहणाचे कौशल्य आहे. त्यांची प्रवृत्ती सिद्धांताकडे जाण्याची आहे. त्यांच्या खंडनमंडनात पटावरची सोंगटी मारण्याचा नेमकेपणा आहे. त्यात पटच उधळून देण्याचा आततायीपणा नाही. गझलेवरील हे सारे विवेचन अतिशय सुबोध आणि वाहते आहे. तरीही त्याचा शास्त्रीय पाया पक्का आहे. त्यामुळे अभ्यासकांना ते विचारप्रवृत्त करील आणि रसिकांची रुची वाढवील. वादविवादांचे काहूर आणि संभ्रमाचे धुके दूर सारून डॉ.कांबळे यांनी गझलेची संकल्पना सुस्पष्ट मांडली. पूर्वग्रह, गैरसमज आणि अभिनिवेश टाळून सहृदयतेने पण वस्तुनिष्ठ दृष्टीने मराठी गझलेची तपासणी आणि मांडणी केली. मूलप्रामाण्यवादी भूमिकेमुळे त्यांचा ग्रंथ प्रकारनिष्ठ समीक्षेचा अभिजाततावादी नमुना ठरतो. मराठी गझलेचा एक रूपलक्षी नकाशा त्यातून आपल्याला मिळतो. मराठी गझलेचा तथ्यलक्षी इतिहास म्हणून तो केवळ अजोड ठरतो. ‘मराठी गझल : १९२० ते १९८५’ या ग्रंथाच्या रूपाने मराठी कवितेत अवतरलेल्या गझलयुगाला त्याचा टीकाग्रंथ आणि टीकाकार मिळाला आहे.
अविनाश वि. कांबळे, ‘‘मराठी गझल : १९२० ते १९८५’’, सौ. स्नेहसुधा कुलकर्णी निहारा प्रकाशन, पुणे, १९८५. पृष्ठे २४०, किंमत १५०रु. या ग्रंथातील गझलविचाराची तपासणी करणे हा या लेखाचा उद्देश आहे. एक खुलासा असा की डॉ.कांबळे यांचे नाव आता डॉ.अविनाश वि. सांगोलकर असे झाले आहे. तथापि ग्रंथ ज्या नावावर प्रसिद्ध झाला त्याचाच उल्लेख येथे केला आहे.
(डॉ.र. बा. मंचरकर, श्री स्वामी समर्थ १९ नंदनवन कॉलनी, कोहिनूर मंगल कार्यालयासमोर, सावेडी, अहमदनगर - ४१४००३. दूरभाष : (०२४१) (२४२३५७५)(पूर्व प्रसिद्धी : कविता-रती दिवाळी २००४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा