१३ मार्च, २००९

सुरेश भटांच्या गझलांमधील तत्वचिंतन : सदानंद डबीर





उर्दू गझलांमध्ये तत्वचिंतनासाठी गालिब प्रसिद्ध आहे. गालिबच्या काही शेरांचे अर्थ लावण्यात, जाणकार समीक्षकांतही मतभेद आढळतात. काहीवेळा गालिब वरवर इश्किया खयाल मांडताहेत असे वाटते. पण त्यात एखादे सखोल तत्त्वज्ञान, तात्विक विचारही दडलेला असतो. उदा. ‘कौन जीता है यहॉं, तेरी जुल्फ के सर होने तक’ (आह को चाहिए इक उम्र असर होने तक!) - (बाई ग,) - तू तुझे मोकळे केस बांधून डोक्यावर घेशील, (अंबाडा बांधशील) - पण तोवर मी जीवंत रहायला हवे ना !’ असा वरवर अर्थ आहे. पण कदाचित गालिबचा इशारा, ‘जीवन इतकं क्षणभंगूर आहे की, पुढल्या क्षणाचाही भरवसा नाही!’ - ह्या तात्विक चिंतनाकडेही असू शकेल. एखादे क्लीष्ट तत्त्वज्ञान, काव्यात्म पद्धतीने (लिरिकली) मांडता येणे - हे गझलचे एक बलस्थान आहे. सर्वसामान्य वाचक/श्रोत्यांपासून ते प्रकांड पंडितांपर्यंत गालिब वेगवेगळ्या पातळ्यांवर ‘अपील’ होत राहतो- ते ह्यासाठीच.
गझलचे शेर ‘सोपे’ (प्रासादिक) असावेत असा संकेत आहे. पण दोन नुसती सोपी statements (विधाने) अगदी गझलच्या तंत्रानुसार केली तर शेर होतो का? तर नाही! काव्यात्मकता, कलात्मकता हवीच. त्या शेराने वाचकाच्या मन/बुद्धी/हृदयाला साद घातली तरच तो शेर. अन्यथा एक तांत्रिक द्विपदीच होईल. अर्थात ‘सोपेपणा’ सांभाळून काव्यात्मकता आणणे निश्चितच अवघड आहे.
‘जरा कठीण’ किंवा तत्वचिंतनात्मक, गूढगुंजनात्क, पटकन आकलन न होणारा शेर कोणी मराठीत लिहिला की तो ‘शेर’च नाही म्हणून हाकाटी करायची, तिरकसपणे त्या कवीला ‘गालिब’ म्हणून हिणवायचे- अशी घातक प्रथा मराठी गझलच्या संकुचित परिवारात पडते आहे. हे टाळले पाहिजे ख-या अर्थाने मराठी गझल ज्यांच्यापासून सुरू झाली असे आपण मानतो, त्या कवीवर्य कै. सुरेश भटांनी आपल्या गझलांमधून असे तत्त्वचिंतनात्मक शेर लिहिलेले आहेत. त्याचीच काही उदाहरणे वानगीदाखल आपल्या समोर ठेवण्यासाठी हा लेखन प्रपंच आहे.

१. 

‘हे रिते अस्तित्व माझे शोध शून्यातील वेडा
माझिया मागेच माझी सर्व ही ओझी रहावी’ 

(रूपगंधा. पृ.८८)
         ‘पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी’ ह्या गाजलेल्या गझलचा हा शेर आहे. ‘रिते अस्तित्व’, ‘शून्यातला शोध’ त्यांच्या सर्व अर्थच्छटांसह (शब्दार्थ/वाच्यार्थ/मतितार्थ/लक्षणार्थ) सामान्य वाचक/श्रोत्याला सहजपणे आकलन होणे कठीण आहे.
‘मी कोण आहे?’ ह्या अध्यात्मातल्या मूलभूत प्रश्नाशी हे निगडीत आहे. आणि माणूस ह्या प्रश्नांची ‘ओझी’ अकारणच वाहतो असा सूर दुस-या ओळीत आहे. ‘मरणाने केली सुटका...’ ह्या भटांनी नंतरच्या संग्रहात लिहिलेल्या गझलमध्ये हा आशय वेगळ्या शब्दात आलाय. मात्र हा नंतरचा आविष्कार अधिक सुगम होऊन सर्वसामान्य वाचकांच्या आवाक्यात आला असे म्हणता येईल. चर्चेसाठी घेतलेला हा शेर मात्र तितका सोपा नाही- अर्थातच म्हणून हा शेरच, अथवा ही गझलच नाही, असे नाही. हा चांगला शेर आहे, फक्त त्याला सुजाण वाचकाची अपेक्षा आहे.

२. 

‘मीच माझा चेहरा अन् मीच माझा आरसा
जाणतो मी पाहुनी माझ्यात- मी आहे कसा’  

(रूपगंधा पृ.७०)

इथे पहिल्या ओळीत सरळ सरळ ‘अद्वैत’ तत्त्वज्ञान सांगितले आहे. जे काही ‘आहे’ ते ‘एकच’ आहे. पाहणारा तोच- त्यानेच आपल्यामधून पंचमहाभूतात्मक ‘आरसा’ म्हणजे हा देह तयार केला. हा देह म्हणजे या ‘अव्यक्ताचे’ व्यक्त होण्याचे ‘साधन’ झाले की तो आरसाही लयाला जातो, पाहणारा ‘मी’ ही संपतो, आणि उरते. फक्त चैतन्य किंवा जे काही ‘आहे’ ते ‘एकमेव’ अशी अर्थच्छटा ह्या शेरात मला गवसली. कदाचित भटसाहेबांना अपेक्षित अजून काही वेगळे असू शकेल. पण ह्या ओळी तत्त्वचिंतनात्मक आहेत ह्याविषयी दुमत होऊ नये. वरील आध्यात्मिक आशय चांगदेव पासष्टीतही आढळतो.

३. 

‘आजन्म वै-यासारखे वेडावले ज्याने तुला
ते चेहरा होता तुझा, त्यालाच वेडावून जा’

(रंग माझावेगळा पृ.४९)
‘विसरून जा, विसरून जा, तुजलाच तू विसरून जा’ अशी मतल्याची ओळ आहे.‘वै-यासारखे  वेडावणारे’ कोण? तेही ‘आजन्म’- एक अर्थ असा घेता येईल की, ते आजन्म वेडावणारे/फसवणारे/हुलकावणी देणारे- म्हणजे माणसाचे ‘प्राक्तन’ किंवा ‘नशीब’. पुन्हा हे माझे ‘प्राक्तन’ कोणी निर्माण केले? तर ‘मीच!’ म्हणजे पुन्हा ‘अद्वैत’ मतच आले. तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुझ्या सुखदु:खाचा ‘निर्माता’ तूच आहेस. मूळ जे ‘चैतन्यरूप’ आहे- त्याला सुखही नाही वा दु:खही नाही. ‘तुझा छळ करणारा तूच होतास’ हे एकदा समजून घे. कोणी बघत नसताना आरशात पाहून माणूस स्वत:च्या प्रतिबिंबालाच वेडावतो तसेच काहीसे, आपले प्राक्तन’, (अजाणता) आपणच निर्माण करतो. म्हणजे, पुन्हा ‘मीच माझा चेहरा’ हा आधीच्या शेरातला आशय इथे वेगळ्या शब्दात, वेगळ्या प्रतिमात आला, पण अद्वैत तत्वज्ञानाचे मूळ सूत्र कायम आहे.
 
४.  

‘हरवले आयुष्य माझे राहिले हे भास
धगमगे शून्यात माझी आंधळी आरास’
 
ह्या शेराचा अर्थ पटकन कळतो का? तर नाही. ‘हरवले आयुष्य माझे’ हा भाग कळल्यासारखा वाटतो- पण कळत नाही. का हरवले? कुठे हरवले? कसे हरवले? ह्यावर कवी मौन बाळगतो. पण तरीही आयुष्य हरवले- म्हणजे ‘विफल झाले’ एवढा अर्थ सूचित होतो तो मान्य केला की, आता जगण्याचे केवळ ‘भास’ राहिले आहेत. यातला ‘जिवंतपणा’ कधीच संपला आहे हे उलगडते. पुन्हा दुस-या ओळीशी आपण अडतो. ‘माझी आंधळी आरास’ म्हणजे ‘अव्यक्त चैतन्य’ असे म्हणता येईल. म्हणजे ‘व्यक्त झालेले हे जीवन’ तर विफल झाले- पण जे काही अव्यक्त ‘शून्य’ आहे ते मात्र अजूनही ‘धगमगते’ आहे. फारच कठीण अर्थ आहे. मला जो अर्थ ‘जाणवतो’ आहे, तो मी गद्यातही वाचकांपर्यंत पोचवायला असमर्थ आहे.
५.      

 ‘अता मीच माझी चर्चा मजसवे करावी
अता मीच माझी अफवा मला ऐकवावी’ 

(एल्गार पृ.२२)
सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की, ह्या गझलच्या ओळी (शेर) नसून, सहा ओळींच्या कवितेतील शेवटच्या दोन ओळी आहेत. मात्र ह्या दोन ओळीत ‘गझलीयत’ आहे, आणि भटांच्या लेखनातून वारंवार प्रकट होणारे ‘अद्वैत’ तत्वज्ञानही इथे आहे.
‘अता मीच माझी चर्चा मजसवे करावी’ ह्या ओळीत ते येते. ‘माझी अफवा’ म्हणजे ‘माझ्या अस्तित्वावरच संशय’ असे म्हणायचे असावे. असो, ही गझल नसल्याने आपण अधिक चर्चा करू या नको.


६.  

‘बघून रस्त्यावरील गर्दी, कशास मी पाहण्यास गेलो
धुळीत बेवारशी कधीचे, पडून माझेच प्रेत होते’ 

(झंझावात पृ.४२)
- आता मीच माझे ‘प्रेत’ कसे बघू शकेन? हा प्रश्न तर्कसंगत आहे. पण ‘काव्यांतर्गत लॉजिक’ ने ह्याचे उत्तर देता येते. अर्थात सामान्य वाचकाला हा शेर नक्कीच ‘चकीत’ करतो, आणि त्याची दादही येते. परंतु त्यातला अंतर्गत अर्थ कितीजणांना कळेल? सोपेपणा प्रसादगुण, चटकन ‘संप्रेषित’ होण्याचा गुणधर्म ह्या ओळींमध्ये आहे का? (माझ्या मते ‘आहे’ पण त्यासाठी वाचकही तेवढ्या तयारीचा हवा!)
‘मी बेवारशी प्रेत बघितले’ हे व्यवहारात शक्यच नाही. मग काय असावे? तर धुळीमध्ये कोणी गरीब/दरिद्री/एकाकी व्यक्ती मरून पडली होती एवढाच भाग ‘व्यावहारिक’ आहे. मात्र कवीने जेव्हा त्या ‘प्रेताला’ पाहिले तेव्हा - सहानुभूतीची पराकोटीची भावना उफाळून आली. आणि ‘तो’ (ते प्रेत) मीच आहे असे त्याला वाटले. ‘सर्वाभूती एकच’ ह्या न्यायाने. किंवा सर्व दु:खित/पीडित/शोषित - एकाच जातीचे (cast ह्या अर्थाने नाही) असतात ह्या न्यायाने.
-पुढे हाच विचार भटांच्या एका गझलेत अधिक सोपेपणाने प्रकटला-जेव्हा त्यांनी लिहिले,
‘माणसांचे दु:ख माझे बनत आहे
सोसतांना मी नव्याने घडत आहे’.

७. 

‘मी उरलो सुखदु:खाच्या वरपांगी भासांपुरता
हे जगणे, जगणे नाही, ही काया काया नाही’

 (सप्तरंग पृ.६७)
‘मी’ म्हणजे माझा देह नाही, ‘मी’ म्हणजे माझे मन नाही, मी ह्या देहमनाचा साक्षी असा आत्मा आहे. हे भारतीय तत्त्वज्ञान वरील शेरात आले आहे. सुखदु:ख ‘भास’ आहेत, कारण ही कायाच मुळी भ्रामक आहे, ‘माया’ आहे.
हा तत्त्वचिंतनात्मक शेर आहे. आणि भारतीय तात्त्विक विचार माहीत नसेल तर कळायलाही अवघड आहे.

८. 

‘उभा जन्म जातो आहे, हा असाच माझा
मी अजून शोधत आहे चेहराच माझा

ही भकास वणवण माझी कुणाला कळेना
पाठलाग करतो आहे मी उगाच माझा’ 

(सप्तरंग पृ.१८.)
वरवर सोपे वाटणारे शब्द असले तरी ते गहन अर्थ सांगू पहात आहेत. ‘उभा जन्म जातो आहे, हा असाच माझा’ एवढी एकच ओळ पटकन संप्रेषित होते. ह्या ओळीत एक निराशपणा/हताशा आहे जिचे सामान्य वाचकाला आकर्षण असते. श्रोता चटकन त्या ओळीशी ‘आयडेंटीफाय’ होतो. पण भटसाहेब सांगताहेत ती व्यावहारिक अपयशातून आलेली हताशा नाही. ती फार व्यापक अशा मानवी जीवनाच्या संदर्भात आली आहे. आत्मबोध किंवा आत्मशोध हे मानवी जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नसल्याने आलेली ही निराशा आहे. हा अर्थ  दुस-या ओळीत स्पष्ट होतो. ‘मी अजून शोधत आहे चेहराच माझा’-‘अरे माणसा माणसा कवा होशील माणूस’ असं बहिणाबाईंनी ज्या अर्थाने म्हटलं आहे त्या अर्थाने. ‘माणूस’ नाही? वरकरणी (शारीरिकदृष्ट्या) तर आहे- पण त्याच्यातले ‘पशूपण’ संपलेले नाही! - ‘मी माझाच चेहरा शोधतो आहे’ हीच कल्पना दुस-या शेरातही ‘मी माझा पाठलाग करतो आहे’ ह्याप्रकारे येते.
मात्र दुस-या शेरात एक वेगळी छटा आहे. एक वेगळी कलाटणी आहे. ती ‘उगाच’ शब्दाने सूचित होते. ‘पाठलाग करतो आहे मी उगाच माझा!’ - पाठलाग करणे किंवा स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करणे हेच मुळी व्यर्थ आहे का? माझ्या ‘मीपणाचे’ रहस्य कधी कळणारच नसेल तर सगळा शोधच व्यर्थ आहे. ‘काही बोलायचे आहे पण बोलणार नाही’ - ह्या प्रसिद्ध कवितेत कुसुमाग्रज म्हणतात, ‘निळ्या आकाशात एक सोनेरी ढग आहे, पण त्याचे ‘रहस्य’ कोणाला कधीच कळणार नाही!’ - ते जीवनाचे ‘रहस्य’ कधीच कोणाला कळणार नाही.
-म्हणूनच हा ‘शोध’ हा ‘पाठलाग’ ‘उगाच’ आहे. इथे जाणता/अजाणता भटसाहेबांनी सा-या ‘आध्यात्मिकतेवरच’ प्रश्नचिन्ह लावले आहे. म्हणून हा शेर खास भटसाहेबांचाच आहे. आणि शब्दार्थ सोपा असला तरी ध्वन्यार्थ तात्त्विक आहे.
असो. असे अनेक शेर दाखवता येतील. मुद्दा इतकाच की, जीवनाचा आशय शोधणे, हे प्रत्येक कलाकार, कवी, आपापल्या परीने करत असतोच. आणि असे शेर जाणकारांना खुणावतात. निव्वळ तंत्र शिकून आणि कारागिरी करून तयार केलेले शेर ‘दादलेवा’ असतीलही. पण ते तात्कालिक परिणाम करतात. तेवढ्यापुरती ‘वाहवा’ मिळवतात. पण पुन: पुन्हा प्रत्यय देण्याची ताकद त्यांच्यात नसल्याने ते बादही होतात.
-अर्थात अशा चटपटीत शेरांना मी कमी लेखतो आहे असे नाही. बहुरुपिणी गझलचे तेही एक रूप आहे.
तसेच मुद्दाम ‘कठीण’ किंवा तत्वचिंतनात्मकच लिहायला हवे असेही नाही. मनात उठलेल्या उर्मीशी, विचारतरंगाशी, आपल्या अनुभवाशी प्रामाणिक राहून लिहायला हवे असे मात्र म्हणावेसे वाटाते.
गझलचा शेर लिहिण्यासाठी चिंतन आवश्यक आहे, हे मात्र नक्की.केवळ शब्दांचा खेळ करून किंवा ठराविक साचे वापरून शेर होत नाही.
‘हंगामा है क्यो बरपा थोडीसी जो पी है/डाका तो नही डाला चोरी तो नही की है’ ह्या वरवर मयकशी संदर्भात    असणा-या गझलमध्येही कवी म्हणतो- ‘हर जर्रा चमकता है अनवारे इलाहीसे/हर सॉंस ये कहती है हम है तो खुदा भी है’ - हरेक श्वास म्हणतोय की मी असेन/आहे, तर इश्वरही आहेच! (असलाच पाहिजे.) ह्या तात्त्विक आशयावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नसावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: