गेल्या १५ जुलै १९८२ रोजी श्री सुधाकर कदम यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ‘अशी गावी मराठी गझल’ हा आपला मराठी गझल गायनाचा कार्यक्रम सादर केला़. मी स्वतः या कार्यक्रमात निवेदक म्हणून हजर होतो़.
केसरीच्या २५ जुलैच्या अंकात श्री सुधाकर कदम यांच्या मराठी गझलगायनाच्या कार्यक्रमाविषयी गझल गायन की भावगीत गायन? असे शीर्षक असलेला ‘रसिकमित्र’ या टोपणनावाने एक लेख प्रसिद्ध झालेला आहे़. या लेखात व्यक्त झालेली मते मराठी गझल व मराठी गझल गायनाविषयी सामान्य जनतेत गैरसमज पसरवणारी आहेत, असे मला वाटते़.
स्पष्टपणा नाही
श्री सुधाकर कदम यांनी पेश केलेल्या मराठी गझलांपैकी कोणत्या गझलेवर कोणत्या मराठी भावगीतांचे किंवा नाट्यगीतांचे संस्कार झाले हे ‘रसिकमित्र’ने उदाहरण देऊन स्पष्ट केले असते तर ते अधिक बरे झाले नसते काय? नाट्यगीतांसाठी वेगळे राग आणि गझलांसाठी वेगळे राग असा नियम आहे काय? शिवाय मराठी नाटयसंगीताचा संस्कार म्हणजे नेमके काय? ते स्पष्ट झालेले नाही़. कारण पंडित जितेंद्र आभषेकी यांच्या सारख्या अलीकडील काही सन्माननीय अपवादांच्या बंदिशी सोडल्या तर बहुतेक गाजलेल्या मराठी नाट्यगीतांचे मूळ कोणत्या तरी कर्नाटकी किंवा हिंदुस्थानी संगीतातील चीजेला जाऊन भिडलेले आहे, ही वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही़.
‘ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची;
तापलेल्या अधीर पाण्याची.’
किंवा
‘झिंगतो मी कळेना कशाला;
जीवनाचा रिकामाच प्याला.’
या दोन गझलांचा संदर्भात मराठी भावगीतांच्या वळणाचा आरोप करुन ‘रसिकमित्र’ निर्वाळा देतात - त्यातील ठेका, चाल दोन्ही परिचयाची वाटली.
गुलाम अलीने गायलेल्या दाग देहलवीच्या ‘रंज की जब गुफ्तगू होने लगी। आप से तुम, तुम से तू होने लगी’सप्रसिद्ध गझलेच्या सुरावटीचे संस्कार, श्री सुधाकर कदम यांनी गायिलेल्या ‘ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची; तापलेल्या अधीर पाण्याची.’ या गझलेच्या चालीवर झालेले आहेत़ आणि -
‘मिलाद’ची गाणी
विदर्भातील ईद-मिलादच्या दिवशी ‘मिलाद’ नावाची जी गाणी गातात, त्यांच्या सुरावटीचा संस्कार श्री सुधाकर कदमांनी गायिलेल्या ‘झिंगतो मी कळेना कशाला; जीवनाचा रिकामाच प्याला.’ ह्या मराठी गझलेच्या सुरावटीवर झालेले आहेत़.
‘रसिकमित्रा’चे म्हणणे असे की, गझलगायनात सारंगी तबल्याची साथ, म्हणून रहायला हवी़, तशी कदमांच्या मैफलीत नव्हती़. त्यामुळे मुळात शब्दार्थाला फारशी दाद न मिळणार्या मराठी गझलेवर स्वरसाथीची एवढी कुरघोडी झाली तर शब्दार्थ लयालाच जाईल, अशी भीति वाटते़.
शेर चालू असताना तबलावादक श्री शेखर सरोदे आणि सारंगीवादक लतीफ अहमदखान यांनी ढवळाढवळ केली नाही़ मात्र शेर संपल्यानंतर पुन्हा सम गाठतांना तबला व सारंगीने जी काही करामत दाखवून पुणेकर रसिकांची भरघोस दाद मिळवली, त्या करामतीला, तिने आणलेल्या बहारीलाहि साथीची कुरघोडी म्हणतात काय?
शेवटी ‘रसिकमित्रा’ला मी खटकलो. मैफिल सुधाकर कदमांची आहे असे सांगत सुरेश भटांनी दोन गझला म्हटल्या आणि ही गोष्ट खटकली.
मेहफिल के आदाब मला ठाऊक आहेत़ ते माझ्या रक्तात आहेत़. उपस्थित पुणेकर रसिकांनी केवळ आग्रह केला म्हणून नव्हे, तर श्री सुधाकर कदम यांनी आधी जातीने परवानगी दिल्यानंतरच मी माझ्या दोन रचना पेश केल्या़.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा