२ डिसेंबर, २००८

मौन



गोड हसते,वा उचलते एक भिवई

खूपदा ती बोलते शब्दाविनाही!


‘हो’ म्हणाया- लाजुनी झुकतात डोळे

घट्ट मिटले ओठ म्हणती -‘आज नाही!’


हात हाती घेतलेला सोडते ती-

अर्थ हा की-‘का अशी करतोस घाई?’


एक सुस्कारा कधी,नि:श्वास केव्हा-

मी म्हणावे,‘जे हवे ते माग बाई!’


विस्मराया लागलो मी शब्द आता-

मौन अमुचे होत आहे अर्थवाही!


 - सदानंद डबीर

(पूर्वप्रसिद्धी : ‘कविता-रती’/दिवाळी २००८)

1 टिप्पणी:

आदित्य म्हणाले...

फार फार सुंदर! मी कवितांचा काही फार नियमित वाचक नाही, पण ही रचना फारच छान जमलीये.