९ फेब्रुवारी, २००९

‘शब्दसृष्टि’चा ॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥
‘शब्दसृष्टि’ हे मुंबईहून प्रकाशित होणारे हिंदी-मराठी द्विभाषिक असलेले त्रैमासिक आहे.साहित्य अकादमी पुरस्कार विशेषांक,डॉ.हरिवंशराय बच्चन विशेषांक अशा दोन बहुचर्चित विशेषांकांनंतर ‘शब्दसृष्टि’ने तिसरा अंक ‘भारतीय ग़ज़ल विशेषांक’ काढला आहे.

डॉ.चंद्रकांत बांदिवडेकर प्रमुख सल्लागर असलेल्या ह्या विशेषांकाचे संपादन डॉ.विजया आणि प्रा.मनोहर ह्यांनी अतिशय चोखंदळपणे केले आहे.

डॉ.रामजी तिवारी, डॉ.वसंत खोकले, डॉ.सूर्यबाला,प्रकाश भातंब्रेकर, डॉ.रमेश वरखेडे, डॉ.राम पंडित, डॉ.करुणाशंकर उपाध्याय, डॉ.मुक्ता नायडू, डॉ.नीरा नाहटा, डॉ.हर्षदेव माधव आणि पंकज शाह अशा नामवंत संपादकांची नामावली पाहिली तरी हा आंतरभारती प्रकल्प आहे,याची खात्री पटावी.फारसी,उर्दू,हिंदी,मराठी,गुजराती,उडिया,कश्मिरी,छत्तीसगढ़ी,डोगरी,पंजाबी,बांगला,भोजपुरी,मैथिली,राजस्थानी,सिंधी,संस्कृताअणि एवढेच नव्हे तर चक्क इंग्रजी भाषेतील त्यांच्या हिंदी अनुवादासह या विशेषांकात वाचायला मिळतात.

‘उर्दू ग़ज़ल मे भारतीय मानस की अभिव्यक्ति’,‘गुजराती ग़ज़ल:दशा
आणि दिशा’,‘संस्कृत गझल :उद्भव आणि विकास’,अशा लेखांचा प्रा.मनोहर यांनी  केलेला अनुवाद त्यांच्या व्यासंगाची आणि मेहनतीची खात्री पटविणारा आहे.

‘ग़ज़ल शायरी:उपेक्षित छंद’ - डॉ.राम पंडित  आणि ‘बहर-उल-ग़ज़ल’- डॉ.विजया हे लेख तर या विशेषांकाची खासियतच म्हणावी लागेल.
 
अनेक मुलाखती, गझलसंग्रहांच्या आस्वादात्मक परिचया सोबत या अंकाचा लक्षणीय विशेष पैलू म्हणजे दुष्यंतकुमारांवरील तीन लेख-‘अमीर खुसरो से दुष्यंतकुमार तक’-डॉ.विजया,‘हिंदी ग़ज़ल के परंपरापुरुष:दुष्यंतकुमार’-ज्ञान प्रकाश विवेक,आणि ‘दुष्यंतकुमार के बाद की ग़ज़ल’-डॉ.करुणाशंकर उपाध्याय.केवळ अर्ध शतक गझला लिहून एकविसाव्या शतकावर आपली ठसठशीत नाममुद्रा उमटवणारा थोर गझलकार म्हणजे दुष्यंतकुमार.त्य़ांचा एक प्रसिद्ध शेर आहे-

‘वे कह रहे है  ग़ज़ल गो नही रहे शायर,
मै सुन रहा हूँ हरेक सिम्त से ग़ज़ल लोगो।’

शामा यांनी काढलेल्या देखण्या मुखपृष्ठाचा हा विशेषांक पाहिल्यावर-वाचल्यावर आपल्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.

*********************************************************************************** 
‘शब्दसृष्टि’॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥ ऑक्टोबर-डिसेंबर२००८ व जानेवारी-मार्च २००९
संपादक:डॉ.विजया(९८२१९०२२७६),प्रा.मनोहर(९८२१५४५२८८)
संपर्क:‘शब्दसृष्टि’,१०२,कृष्णकमल,प्लॉट-५,सेक्टर-५,संत ज्ञानेश्वर महाराज मार्ग नेरूल(पूर्व)नवी मुंबई-४००७०६
मूल्य:२००रु
***********************************************************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: