Related Posts Plugin for WordPress, Blogger...

८ सप्टेंबर, २००९

गझलांची ‘खासियत’आणि वेदनेची कळ : लता मंगेशकर


‘रंग माझा वेगळा’ ह्या सुरेश भटांच्या कवितासंग्रहात समाविष्ट पत्रामधील संपादित अंश -


‘तुमच्या या संग्रहातला सर्वात चांगला वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे तो अर्थात गझल शैलीतील कवितांचा. तुमचे व्यक्तिमत्त्व, तुमच्या व्यथा, तुमच्या वेदना, जीवन जगताना तुम्हाला आलेले कटु अनुभव, या साऱ्यांचा अर्क तुमच्या गझलवजा कवितांत उतरला आहे. उर्दू कवींच्या गझला तुम्ही मनःपूर्वक वाचल्या आहेत. इतकेच नव्हे तर गझलांची जी एक 'खासियत' असते ती तुम्ही स्वतःमध्ये उत्तम मुरवली आहे. एक प्रकारची बेहोषी, बेफिकिरी, जगाबद्दलची पूर्ण उपेक्षा, आपल्याच भावविश्वात रमून राहण्याची वृत्ती, तीव्र एकाकीपणा, आणि अंतःकरणात सलत राहिलेल्या दुःखाची जिवापाड जपणूक-


दुभंगून जाता जाता मी अभंग झालो!
चिरा चिरा जुळला माझा, आत दंग झालो!

किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो!
अन् असाच वणवणतांना मी मला मिळालो!

सर्व संग सुटले, माझा मीच संग झालो

आता मजेने बोलतो भेटेल त्या दुःखासवे!
सांभाळूनी घेती मला माझी इमाने आसवे!

केव्हातरी दात्यापरी आयुष्य हाका मारते
मीही असा भिक्षेकरी ज्याला न काही मागवे!


गझल म्हटल्यावर त्यातल्या भावनांचे हे स्वरूप प्रथम मनात उभे राहते. गझलेची ही विशिष्ट वृत्ती तुम्ही पूर्णपणे आत्मसात केली आहे. उर्दू गझल भरपूर वाचण्यात एक धोका असा होता की, तुमच्या कविता या उर्दू किंवा फारसी गझलांचे नुसते अनुकरण होणेही शक्य होते. तथापि तुमच्या बाबतीत तसे ते झाले नाही. तुमच्या या प्रकारच्या कविता अगदी तुमच्या स्वतःच्या आहेत. गझल वाचनामुळे तुमची विशिष्ट कवीवृत्ती सिद्ध झाली असे म्हणण्यापेक्षा, मुळ तुमची मनोवृत्ती गझलेच्या भावविश्वाशी मिळतीजुळती असल्यामुळे गझल शैलीतील कवितेचे माध्यम भावाविष्कारासाठी तुम्ही निवडले, असे म्हटल्यास ते अधिक बरोबर होईल. उर्दू गझल मीही पुष्कळ वाचले आहेत. म्हणूनच तुमच्या या कवितांचा अस्सलपणा मला सारखा जाणवत राहिला. त्यांतली वेदना सच्चेपणाने जिवाला भिडत राहिली.

तुमच्या या कवितांत एकही कविता अशी नाही की, ज्यातली एखादी तरी ओळ, एखादी तरी भावना, एखादी तरी कल्पना सतत स्मरणात राहात नाही! अशा ओळी, भावना, कल्पना द्यायच्या म्हटल्या तर कितीतरी लिहावे लागेल. पण त्यातल्या त्यात काही ओळी लिहिल्याशिवाय मला राहावतच नाही:


माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझ्या पेटण्याचा सोहळा!

स्वप्न माझे बंगले अन् गीत माझे संपले
हाय! बाजारांत माझा हुंदका आणू नका!


'जन्माच्या वेलीचे सावध पान पान','कायांचा बंद कापूर', स्वप्नदेशी अनावर झालेली नीज' अशा कोमल आणि काव्यमय शब्दचित्रांचा ठसा मनावर एकदा उमटला की, तो कधी पुसून जात नाही.

तुमचा कवितासंग्रह वाचताना एक विचार राहून राहून मनात येत होता. काव्य असो की गाणे असो, त्यात बुद्धीच्या चपल आणि तल्लख विलासापेक्षा भावनेचा जिवंत जिव्हाळा हाच शेवटी आपल्या मनाला जाऊन भिडतो आणि नंतर दीर्घकाळ तिथे रेंगाळत राहतो. मी अनेक कवींची काव्ये वाचली आहेत, आणि अनेक गायकांचे गाणे ऐकले आहे.बौद्धिक चमत्कृतीची कसरत करून गायिलेले गाणे किंवा केवळ तल्लख बुद्धिविलास दाखवणारे काव्य हे रसिकाला चकित करते. स्तिमित करते, थक्क करते पण जे गाणे किंवा जे काव्य कलवंताच्या हृदयातून उत्फूर्तपणे प्रकट होते, ते ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेते. त्यात भपका नसेल, डामडौल नसेल, ऐट नसेल, पण त्यातली उत्कटता, सरलता आणि प्रांजळपणा हा सरळ आपल्या हृदयात प्रवेश करतो. आपल्या संतकवींचे कितीतरी काव्य असे उत्कट आणि हृदयस्पर्शी आहे. आपल्या बालकवींच्या काव्यात हे साधेपणाचे सौंदर्य होते. उर्दू कवींमध्ये मीर हा याच प्रकारचा कवी होऊन गेला. गायनाच्या संदर्भात बोलायचे झाले तर आपल्याकडच्या शास्त्रीय गायकांमध्ये बडे गुलाम अलीखाँसाहेब यांच्या गाण्यात हा भावनेचा जिव्हाळा होता. चित्रपट संगीत गाणाऱ्या कलावंतामध्ये सहगल हा या जातीचा कलावंत होता. त्याच्यापाशी डोळे दिपवणारी बौद्धिक चमत्कृती नव्हती; पण तो जे गाई ते रसिकांच्या हृदयाचा तत्काळ वेध घेई. तुमच्या कवितेबद्दल मला हेच म्हणावेसे वाटते. या कविता वाचताना त्यातल्या दुःखाची, वेदनेची कळ ही वाचकालाही जाणवण्याइतकी निश्चित प्रभावी आहे. या कवितांत बुद्धीला दिपवणारे चमत्कार नसतील; पण भावनेचा जिवंत जिव्हाळा, मनाचा निर्मळ प्रांजळपणा त्यात खचित आहे. आणि त्याचे मोल फारच मोठे आहे.’

ख्यातनाम सिने दिग्दर्शक राजदत्त गझलकार सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना ...

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP