१७ ऑक्टोबर, २०१०

ग़ज़ल नव्हे गझल ! : वसंत केशव पाटील

काही दिवसांपूर्वी एक लेख लिहिण्यासाठी काही पुसतके-मासिके वगैरे पुढ्यात घेतली.. आणि-
फेब्रुवारी २००४च्या 'ललित'मधील एका लेखामुळे अक्षरश: उडालो. मराठीतील कित्येक शब्दांचे भलतेच सोंग पाहून चांगलीच भोवळ आली. त्या लेखातील नव्या शब्दलेखनामुळे मराठी भाषा आणि लिपी या बाबतीत बरेच स्फोटक प्रश्न निर्माण होऊ शकतात, असे वाटले.
आपली मराठी भाषा, तिची लिपी आणि तिची ध्वनिशास्त्रीय संरचना यामध्ये नाही म्हटले तरी बेतशीर (सैलसर, शिथिल किंवा उदार वगैरे) अशी काहीएक शिस्त होती आणि आहेसुध्दा. पण तिलाच या लेखाने दणकेच दणके दिले आहेत. अरबी-फारसी-तुर्कीमधून मराठीत आलेले अनेक शब्द या लेखात हिंदीप्रमाणे मराठीतही सर्रास 'नुक्तांकित' पद्धतीने लिहिले आहेत. आता, अशी सोय-सूट- सवलत कोणी, केव्हा आणि का दिली असा मोठा कळीदार प्रसंग उभा राहिला आहे. 'गज्जल' (माधव ज्यूलियन), 'गझल' (सुरेश भट, मंगेश पाडगांवकर प्रभृती) हे तसे प्रचलित झालेले, बऱ्यापैकी पचलेले आणि मराठीच्या चौकटीत बसणारे शब्द आहेत. म्हणून 'गझल' असे म्हटले आणि तसेच लिहिले तरी मराठीचा वारू आजवर तरी कधी कोठे अडला नव्हता. काही कसली अडचण आली नव्हती. इतकेच काय, 'गज्जल', 'गझल' ही शब्दरूपे बरी, बरोबर की बाद याविषयीसुध्दा विद्बानांमध्ये भरपूर चर्चा झाली आहे; पण ती सगळी मराठी भाषालिपीच्या चौकटीत. मग आताच काय म्हणून 'गझल' या शब्दाऐवजी 'ग़ज़ल' असे लिहिल्यामुळे काहीएक अभिनव महाभारत (म्हणजे इतिहास) धडणार असेल तर घडो ! अहो, घडेल नव्हे घडणारच. काय घडेल; तर .. गरीब, सडक, कदर, गैर, आवाज, कानून, कसाई, कसम, लायक, जबाब, ताजा, कलम, कैद, जवान, जखम, ताकद, (त), कैफियत, खंदक, खरीप, खाक, खामोश, जर्दा, जाहीर, जरा, साफ-सफाई.. (सुलभीकरण किंवा सरलीकरण व्हावे यासाठी काही वर्षांपूर्वी मराठीने झाडून सगळ्या अनुच्चारित अनुस्वारांना रजा दिली आहे. आता त्यांचीच ही भुते 'नुक्ता' म्हणजे टिंब बनून पुन्हा मराठीच्या मानगुटीवर बसणार (मान मोठी नि मानगूटही मोठी) असे शेकडो शब्द नुक्तांकित लिहावे लागणार (ते उच्चारायचे कसे ? ही परत नवी भानगड आहेच). उद्या, आधीची आपली मराठी बाराखडीला सुद्धा बाद करून तीत नुक्तांकित शैलीत सुधारून घ्यावी लागणार. पुढे परवा, या ओघातच उर्दूची (मुळात उर्दू ही भाषा आहे की एक बोली आहे, हा गुंता आलाच.) लिपीसुध्दा इंग्रजीप्रमाणे इयत्ता पहिलीपासून शिकवावी लागणार, आणि नंतर तेरवा, 'मराठी-उर्दू मुलांची शाळा' असे नवे बोर्ड गावागावांतून रंगवावे लागणार .. असो.
कोणत्याही भाषा-संस्कृतीने विशिष्ट मर्यादेत राहून उदार, लवचिक आणि स्वागतशील असण्यामध्ये काही गैर (हा शब्द 'गैर' असा लिहायला हवा ?) नाही. पण एखाद्याला काहीतरी वाटते म्हणून तो आपल्याला हवी तशी भाषालिपी वाकवतो-नाचवतो हे कसे आणि कशासाठी समर्थनीय किंवा स्वीकार्य ठरावे ! भाषा ही मुदलात एक सामाजिक संपदा आहे. ती काही कोणाची खासगी मालमत्ता नाही.
याच लेखात (वर उल्लेख केलेल्या) 'ग़ज़लबाबत', 'ग़ज़लशी' अशी काही चमत्कारिक नि 'अपूर्व' रूपेही आली आहेत. या रूपांना कोणते व्याकरण लागू आहे की नाहीच ? विभक्तीचा प्रत्यय हा साधा नियम आहे. मग, 'ग़ज़ल' या 'अद्बितीय' शब्दाचे काही सामान्यरूप होत नाही काय की येथेही पुन्हा 'गजल' (स्त्री-लिंगवाचक असेल तर) म्हणजे कोणी 'व्हर्जिन' आहे की काय ?
सध्या, कवितेच्या क्षेत्रामध्ये एक उदंड आणि प्रचंड पीक आले आहे. तो एक वेगळाच आणि तितकाच चिंतेचा विषय आहे. (तरीही आपण कसली चिंता किंवा चिंतन करीत नाही हा भाग वेगळा) तर ते असो गझल हा काव्याचा एक ( एकमेव सुद्धा )!-काही जणांचा तसा दावाच आहे.) (गैरप्रकारसुद्धा - येथे पाडगावकरांची साक्ष सलामीलाच येईल.) खरे तर, काव्याच्या औरसचौरस वाड्यातील ती एक अंधारी खोली आहे. (ती सुध्दा विस्तारित वगैरे) तेव्हा तिचे काय आणि केवढे कौतुक करायचे ? ज्ञानेश्वराची ओवी आणि तुकारामाचा अभंग यांचेदेखील मराठीने एवढे लाडकोड कधी केले नसतील! मराठी भाषेला ( आणि आता लिपीलाही) गझलेने मोठे आव्हान दिले आहे, हे खरे सुरेश भटांनी मोठ्या आक्रमक शैलीत गझल पेरली आणि फुलविलीसुध्दा.पण त्यांनी कधी नुक्त्यांचा आग्रह धरला नव्हता.
दोन वर्षांपूर्वी, एकाच वेळी औरंगाबादमध्ये दोन गझल संमेलने पार पडली.पण, ती संमेलने दोन गटांची होती, म्हणे(माझ्या एकट्याचा एक गट होता, तरीही मला निमंत्रण होते, आणि मी गेलोही हा विनोद म्हणा नाहीतर वास्तव म्हणा.) आता, उद्या आणखी एखादा गट 'गॅझल' असा एखादा नवा कोरा नामफलक मिरवत आला तर काय करायचे ? गझलवाल्यांची ही गटबाजी, तटबाजी किंवा मठबाजी ( पुन्हा, त्या तिथे तटापलीकडे काहीतरी किंवा कोणीतरी असणारच) शिवसेनेप्रमाणे आपल्या मराठी माणसाला कोठे नेणार आहे, हे कोणालाच कळत नाही. मराठी भाषा आणि साहित्य याविषयी प्रेम-लोभ ठेवणारे सगळे विद्वान, संशोधक, कवी (यात गझलवालेही येणारच) आणि जाणकार व्याकरण - विशारद यांनी मिळून सध्या सुरू असलेली मराठीची मोडतोड हिंमत दाखवून थांबविली किंवा थोपविली (संपविली तर बरेच) पाहिजे. उद्या कोणीही उठेल आणि म्हणेल, की मराठीमध्ये शिरोरेखावरती सुंदर सुंदर अनुस्वार असतात; त्या धर्तीवर प्रत्येक अक्षराखाली मी नुक्त्यांच्या नाजुक मुंडावळ्या बांधून मराठीला अधिक मंडित (दंडित) करणार; तर ते आपण चालू देणार काय ? परवा, बंगाली कन्नड भाषाभिमानी मंडळीही आपले ध्वनिशास्त्र आणि उच्चारशास्त्र वैगरे घेऊन मराठीत घुसू पाहतील तर ते ही आपण चालवून घेणार काय ? भाषा ही लोक संपत्ती असली तरी तीमध्ये सवंग लोकशाही पद्वत शिरली तर केवढे अराजक माजेल याची कल्पनाही करता येत नाही.
तेव्हा, जे कोणी मराठीचे वाली (सुग्रीव सुध्दा) असतील त्यांनी आता तरी जागे व्हावे, असे वाटते. अन्यथा आपली मराठी म्हणजे एखादी झोपाळू गाय होऊन राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: