२४ ऑक्टोबर, २०१२

सदानंद डबीर : मराठी गजल : २ जी आणि ३ जी


१४-१५ जानेवारी २०११ ला गोव्यात संपन्न झालेल्या  ६व्या 'अखिल भारतीय मराठी गजल संमेलना'च्या निमित्ताने मराठी गजलेतील सुरेश भटांच्या नंतरच्या दुस-या आणि तिस-या पिढीचा, गजलेच्या विद्यमान रंग-रूपाचा आणि भवितव्याचा घेतलेला वेध...

माधव ज्युलियन ह्यांचे योगदान मान्य करूनही, तंत्रशुद्ध मराठी गजल खऱ्या अर्थाने रुजली ती सुरेश भटांपासून. ती पहिली जनरेशन म्हणता येईल. सुरेश भट, मंगेश पाडगावकर, खावर ही प्रमुख नावे. कुसुमाग्रज, विंदा, बोरकर, शांता शेळके, राजा बढे, अनिल, आरती प्रभू इत्यादी काही कवींनी थोड्याफार गजल रचना केल्या आहेत. पण त्यांचे योगदान मर्यादित आहे. मराठी गजलची पहिली जनरेशन म्हणजे सुरेश भट! हे समीकरण जनमानसात पक्के रुजले आहे.

भटांच्या पहिल्या संग्रहात (रूपगंधा) चार-पाच गजला आहेत. 'मल्मली तारुण्य माझे' आणि 'पूर्तता माझ्या व्यथेची' या गाजलेल्या गजला गीतात्मक आणि एकाच विषयावरच्या (मुसलसह) आहेत. 'रंग माझा वेगळा'मध्ये भटांना गजल गवसली आणि 'एल्गार' या तिसऱ्या संग्रहात ती पूर्णत्वाला गेली असे म्हणता येईल. 'केव्हातरी पहाटे'सारख्या तरल शृंगारिक गजला, 'थुंुकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता!' असा उदेकपूर्ण उपरोध, आणि 'पुसतात जात मुडदे मसणात एकमेका / कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला?' असं परखड सामाजिक भाष्य अशा अनेक स्वरूपात भटांची गजल प्रकटली. -ही पहिली जनरेशन.

भटांनी गजल रुजविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. हजारो पत्रे लिहिली, 'गजलची बाराखडी' लिहून नव्या पिढीला मार्गदर्शन केले आणि वृत्ता-छंदात लिहिणारा कवी दिसला की, त्याला प्रोत्साहन देऊन गजलकडे वळवले.

मराठी गजलची दुसरी पिढी- २ जी -भटांचा आदर्श ठेवूनच लिहिती झाली. दुसरे 'रोल मॉडेल' नव्हतेच. काही अपवादात्मक कवी आहेत, जे भटांना मानत नाहीत. पण त्यात अर्थ नाही; कारण भट नसते तर मराठी गजलही नसती, ही वस्तुस्थिती आहे.

भटांपासून प्रेरणा घेऊन सेकंड जनरेशन आली, त्यात शेकडो नावे आहेत. भटांनी त्यांना मार्गदर्शन केले, पण कार्यशाळा घेतल्या नाहीत. तो प्रकार एका संस्थेने सुरू केला. कार्यशाळा तंत्राचे नियम शिकवू शकते; कवी निर्माण करू शकत नाही. कार्यशाळेमुळे अनेक 'अ-कवी' झटपट गजलकार झाले आणि तंत्रशुद्ध पण कृत्रिम गजला लिहू लागले. संख्या वाढली, पण गुणात्मक दर्जा घसरला. (ज्येष्ठ संपादक प्रा. पुरुषोत्तम पाटलांनी 'गजलची बाजारगदीर्' असं म्हटलंय!) याचा एक परिणाम असा झाला की, साहित्य विश्वाने, ज्येष्ठ कवी-संपादक-समीक्षकांनी, गजलची उपेक्षा केली. त्यामुळे सेकंड जनरेशनमध्ये शेकडो कवी असूनही, ज्यांनी आपला स्वतंत्र ठसा निर्माण केला अशी नावे अगदी मोजकी आहेत. त्यात इलाही जमादार, सदानंद डबीर, चंदशेखर सानेकर, मनोहर रणपिसे यांची नावे घेता येतील.

प्रख्यात शायर निदा फाजलींचं एक वाक्य आहे- 'अच्छी गजल लिखना मुश्किल नहीं है, अपनी गजल लिखना मुश्किल है।' ह्या दृष्टीने बघता, सेकंड जनरेशनच्या अनेक कवींनी 'अच्छी गजल' लिहिली हे खरे, पण ती 'अपनी गजल' होती का? हा विवादाचा भाग आहे.

ह्यानंतर येते मराठी गजलची थर्ड जनरेशन. इथेही कार्यशाळेचे दुष्परिणाम जाणवतात, पण ती 'क्रेझ' कमी होते आहे. थर्ड जनरेशन टेक्नोसॅव्ही आहे. त्यांच्या गजला छापील स्वरूपापेक्षा नेटवरच्या वेगवेगळ्या साइटस्वर अधिक प्रचलित आहेत. नेटवर त्यांच्या आपसात चर्चाही होतात.

' गजल सुरेश भटांनंतर' हे डॉ. राम पंडित ह्यांनी संपादित पुस्तक अलीकडेच 'अभिव्यक्ती प्रकाशन'द्वारे प्रकाशित केले आहे. चाळीसएक पानांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि ११४ निवडक कवींच्या प्रत्येकी दोन किंवा चार गजला असे त्याचे स्वरूप आहे. त्यापैकी ४५ कवी सेकंड जनरेशनचे, ४१ कवी थर्ड जनरेशनच्या सुरुवातीचे आणि २८ कवी अगदी अलीकडचे आहेत. थर्ड जनरेशनवरची माझी टिप्पणी या ग्रंथावर आधारित आहे.

उर्दूसह अनेक भाषांमध्ये जी आधुनिक गजल लिहिली जाते आहे, ती, तंत्र कायम ठेवूनही आशय आणि शैलीच्या बाबतीत कवितेच्या अधिक जवळ जाते आहे. त्याची प्रसादचिन्हे थर्ड जनरेशनच्या गजलमध्ये दिसू लागली आहेत.

                                                                       रेखाचित्र : प्रकाश बाल जोशी

पहिल्या आणि दुसऱ्या जनरेशनमध्ये गजलचे एक ठाशीव आणि प्रसंगी 'आवाजी' रूप साकार झाले. 'मी आणि माझे दु:ख' तिने जरा जास्तच गडद रंगात साकारले. आता तो ट्रेंड बदलतो आहे. चित्तरंजन भट, वैभव जोशी, वैभव देशमुख, अनंत ढवळे, अनंत नांदूरकर, ज्ञानेश, राधा भावे, क्रांती, विजय आव्हाड ही या पिढीतल्या गजलकारांची काही नावे उदाहरणार्थ नमूद करता येतील. त्यांच्या गजलेचा वेगळेपणा अधोरेखित करणारे दोन शेर देतो...

चित्तरंजन भट लिहितात -

' कोणत्या चिमटीत मी त्याला धरू

हिंडते मेंदूत जे फुलपाखरू'

किंवा वैभव जोशी लिहितात -

' पुन्हा घेतली मी भरारी वगैरे

पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे'

आणि आता निवडणुकांचा हंगाम जवळ आला असताना, याच गजलचा हा शेर बघा -

' बिचारा खरोखर भिकारी निघाला

मला वाटले की पुढारी वगैरे!'

' संस्था' म्हटली की राजकारण आलेच. गजलच्या प्रचार आणि प्रसाराला 'वाहून' घेतलेल्या संस्थाही त्याला अपवाद नाहीत. या राजकारणग्रस्ततेचे सर्वाधिक दुष्परिणाम सेकंड जनरेशनला भोगावे लागले. थर्ड जनरेशन त्यापासून बऱ्यापैकी मुक्त होऊन 'आपली' गजल लिहिते आहे.

सुरेश भटांनी पाया खणला. सेकंड जनरेशनने पायाभरणी केली, थर्ड जनरेशन उभारणी करते आहे आणि चौथी किंवा पाचवी जनरेशन कळस चढवेल, असा विश्वास वाटतो आहे. मराठी गजलचा प्रवास नक्कीच आशादायक आहे, यात शंका नाही!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: