२४ ऑक्टोबर, २०१२

"अ" कारान्त स्वरकाफिया : एक चर्चा




‘गझलकार’ समुहावर दि ५ एप्रिल ते ४ मे २०१२ अशी महिनाभर

अ" कारान्त स्वरकाफिया असलेली रचना गझल असते का?

ही चर्चा गंभीरपणे झाली.त्यात व्यक्त झालेली मते संदर्भाकरिता उपलब्ध व्हावीत ह्या उद्देशाने ही संपूर्ण चर्चा येथे देत आहोत. फेसबुकच्या समुहावरील जुन्या पोस्ट शोधणे तसे साधे काम नाही. ब्लॉग्जच्या लिंक्सवर जुन्या पोस्ट ज्या सहजतेने उपलब्ध होतात तसे फेसबुकसमुहावर होत नाही. म्हणून ही चर्चा प्रस्तुत विशेषांकात सर्व तशीलासह समाविष्ट केली आहे.

******************************************************************


डॉ.कैलास गायकवाड :

चर्चेचा प्रस्ताव : "अ" कारान्त स्वरकाफिया असलेली रचना गझल असते का?

काफिया हे गझलेचे सौंदर्यस्थळ आहे.काफिया जितका पक्का तितके जास्त नादमाधुर्य,तितकी चांगली लय गजलेस प्राप्त होते.मात्र त्यातही सूट घेतली जावून ''आ'',''ई'' आणि ''ऊ'' कारान्त स्वरकाफिये घेवून गझल लिहिल्या जातात.उर्दू व मराठीतही स्वरकाफिया घेवून गझल केली जाणे आता सवयीचे झाले आहे. परंतु ''अ'' हा स्वरकाफिया घेवून केलेली गझल,गझल ठरते का?

माझ्या मते '' नाही'' ..... कारण काफिया म्हणजे स्वरसाम्य.... 'अ' कारान्त स्वरकाफियात हे स्वरसाम्यच रहात नाही कारण प्रत्येक अक्षरात 'अ' हा अध्याहृत आहेच... म्हणजे प्रत्येक काना,मात्रा,उकार नसलेले अक्षर काफिया होईल वा गझलेचे सौंदर्यस्थळच नष्ट होईल...

जर 'अ' हा स्वरकाफिया ग्राह्य धरला,तर, झाड, वाव,टोक,कोर, माज, ताण, हे सगळे शब्द काफिये होतील.... व असे काफिये असलेली गझल म्हणजे..... असो.


गझलकार या राऊत सरांच्या ब्लॉगवर मनिषा साधू यांची ही गझल 'अ' कारान्त स्वरकाफिया असलेली गझल आहे. ही गझल आहे किंवा कसे? या बाबत एक निखळ चर्चा व्हावी हा मनोदय.

इथे अनंत घाव मी जपून ठेवले
प्रचंड आज दाह मी जपून ठेवले

विखुरलेस चांदणे इथे तिथे तुझे
कितीक चंद्र हाय मी जपून ठेवले

मागतेस काय आज मागची फुले
तसे कुठे गं काय मी जपून ठेवले

काल तू जिथे हळुच ओठ टेकले
अर्धचंद्र लाल मी जपून ठेवले

आपुलेच यार दोस्त भेटलो तरी
मैफलीत पाय मी जपून ठेवले

हाय व्यर्थ वाटतसे प्रीत ही अता
हाय रे कुणास मी जपून ठेवले

झेलले कितीक कष्ट काल मायने
खरखरीत हात मी जपून ठेवले

पोचतो कधी मधी स्वत:स भेटण्या
मनात एक गाव मी जपून ठेवले.

--मनिषा साधू.

ही गझल इथे उपलब्ध आहे.

http://gazalakar.blogspot.in/2011/10/blog-post_5660.html


संदीप पाटील:  

माझ्या पण वाचण्यात अश्या खूप सा~या गझल आल्या आहेत ..जास्तीत जास्त मराठीमधून ..माझा हि हा प्रश्न आहे ..पण विचारावा कुणाला म्हणून .. अजून पर्यंत बोललो नव्हतो .. इथे हा धागा वाचून आनंद झाला


रमेश ठोंबरे :

अश्या प्रकारच्या गजला मोठ्या प्रमाणात वाचनात येतात पण मला अश्या प्रकारची गजल रुचत नाही
कैलाश्जी आपण म्हणता त्याप्रमाणे काफिया हे गजलेचे सौंदर्य स्थळ, यात शंका नसावी. मग याबाबतीतच जर तडजोड केली तर गजलेतील मजाच निघून जाते.


श्रीकृष्ण राऊत :

डॉ.कैलास गायकवाड,

चर्चेचा मुद्दा चांगला आहे...

बघा किती गझलकारांचा

चर्चेत खरोखर रस आहे....

आणि अभ्यासही...

ममता सिंधुताई :

जाणकारांनी लिहावे...आम्ही वाचतोय...


सुधाकर कदम :

या समुहावर गझल लिहीणार्‍या तसेच छायाचित्रे टाकणार्‍या सर्वच मित्रांनी या बाबतीतील आपापली मते मांडावी अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे.कारण हे ’गळू’ फुटणे अतिशय आवश्यक आहे,आणि ते चर्चा करूनच फुटू शकते.स्वामीजींसारख्या मराठीच नव्हे तर इतरही अनेक भाषांचा गाढा अभ्यास असणार्‍या व्यक्तीने यात मनमोकळेपणाने आपले मत मांडल्यास त्याचा फायदा गझल लिहीणार्‍यांना निश्चितच होईल असे मला वाटते.

मनिषा नाईक : 

अशा गझला माझ्या देखिल वाचनात आल्या आहेत, परंतु हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.. या विषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल.

धोंडोपंत आपटे :

मराठी गजलेला दालने उघडून जर मोकळा श्वास घ्यायची इच्छा आणि सुधारणेची कास धरण्याची मानसिकता असेल, तर हा बदल स्वीकारलाच पाहिजे. नव्हे त्याशिवाय पर्यायच नाही.

अन्यथा पाच पन्नास शब्दांची चंची उघडून तीच तीच पाने पुन्हा चघळत बसावे लागेल.

कुठल्याही गोष्टीत, मग ती गझल असो किंवा अन्य काहीही, माणसाच्या प्रगत मनोवृत्तीनुसार बदल होणे अपेक्षित असते.

आणि अशा प्रकारे विपुल शब्दधन असलेली गझल झाली तर कल्पनेची आणि विचारांची भरारी मारायला गझलकारांनाही चांगली संधी मिळेल.

बरं, असे केल्याने गझलेचे सौंदर्य कमी होतं, हा जावईशोध जरा मोहसिन, बशीर आणि फ़राज़च्या गझलांना लावून पाहिला तर त्याची प्रचीती येते की नाही ते कळेल.

हे म्हणजे साडी नेसणारीने जीन्स घातली तर तिचं सौंदर्य रसातळाला गेलं असं म्हणण्यासारखं आहे.

We need to come out of this fundamentally wrong belief.

I am for development.... of anything... in any form and manner whatsoever and Gazal is not an exception to it.

P.S.- My comments have no relevance to the Gazal posted by Ms. Manisha Sadhu

श्रीकृष्ण राऊत :

रमेश ठोंबरे,

अश्या प्रकारच्या गजला मोठ्या प्रमाणात वाचनात येतात पण मला अश्या प्रकारची गजल रुचत नाही
कैलाश्जी आपण म्हणता त्याप्रमाणे काफिया हे गजलेचे सौंदर्य स्थळ, यात शंका नसावी. मग याबाबतीतच जर तडजोड केली तर गजलेतील मजाच निघून जाते.

१.गजल हा शब्द गझल असा लिहावा.

२.‘गजलेतील मजाच निघून जाते’म्हणजे नेमके काय होते?

आणि ‘मजा’ येते तरी कशाने?

३.काफियांचे अ-कारान्त असणे वा नसणे या इवल्याशा बाबीचा गझलेतील आशयाला बाधत नाही.

उर्दूतले नियम जसेच्या तसे स्वीकारून आपण ‘लकीर के फकीर’होऊ नये.


डॉ.कैलास गायकवाड :

गझल ही विधा कवितेपासून वेगळी कश्यामुळे आहे? तर तिच्या तंत्रबद्धतेमुळे.... अलामत,काफिया,रदीफ,एकचवृत्त असणे... यासगळ्या बाबीँमुळे.....

यात अक्षरगणवृत्ताची सूट घेवून मात्रावृत्तात लिहीले जाते...... मान्य..तरीही ती गझलच ठरते

रदीफची सूट घेवून गैरमुरद्दफ गझल लिहिली जाते... तरीही ती गझलच असते...

चांगल्या आशयाच्या एखाद्या शेरात अलामतीची सूट घेवून गझल लिहिली जाते... तरीही ती गझलच असते.

काफियात सूट घेवून ''आ'' , ''ई'' आणि ''ऊ'' कारान्त गझला लिहील्या जातात..त्याही गझलाच असतात... कारण गझलेचा आत्मा ''काफिया'' हा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात अबाधित राहीला आहे.

परंतु,जेव्हा ''अ'' कारान्त स्वरकाफिया येतो,तेव्हा आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे की, प्रत्येक अक्षरात 'अ' हा अध्याहृत आहेच. प्रत्येक व्यंजनात ''अ'' हा काफिया आहेच.

गझलेचे शेर जेव्हा लिहिले,वाचले .... सादर केले जातात, तेव्हा एकाच स्वरसाम्याचे काफिये,मतल्यातून वाचल्या/ऐकल्यावर ,जेव्हा त्याच स्वरसाम्याचा काफिया पुढील शेरात येतो,तेव्हा त्याच्या आशयास्,व तो आशय या काफियाच्या शब्दासोबत चप्खलपणे जोडणार्‍या शायराच्या शायरीस आपसूकच ओठावर दाद येते. ( हीच शायरीची/गझलेची मजा.. असं मला वाटतं )

ही बंधने हेच गझलेचे सौंदर्यस्थळ आहे. व कुणी गझलच लिहावी असं काही नाही आहे. आपल्या अभिव्यक्तीसाठी कविता,मुक्तछंद्,ललित्,कथा,स्फुट.... आदि कितीतरी मार्ग आहेतच की.

त्यामुळे गझल यावी,ती गझलेचे नियम पाळूनच यावी,असे माझे स्पष्ट मत आहे.

धोंडोपंत यांनी,फराज्,मोहसिन्,बशर यांची नांवे घेतली आहेत. त्यानी स्वरांचा काफिया वापरला आहे...पण ''अ'' कारान्त स्वरकाफिया नव्हे.

उर्दूतले नियम असोत अथवा फार्सीतले..... ते नियम आहेत म्हणून गझल ही गझल आहे.... अन्यथा गझलेस कवितेपासून वेगळे करताच येणार नाही.

आपणा सर्वांना वानगी दाखल ''अ'' कारान्त स्वरकाफियाची ही तुमच्या लेखी असलेली.. वा माझ्यालेखी नसलेली गझल देत आहे.असल्या रचनेस ''गझल'' संबोधणे कितपत योग्य आहे ते आपणच ठरवा.

आजही पाऊल ओढत
कालचे ते जीवनांगण

राज्य माझे सापडेना
शोधतो पत्त्यांत बावन

येत ना बाहेर हल्ली
आसवे झालीत सावध

आजही सामिष आहे
हीच आहारात गंमत

गाळुनी रदिफास केली
''त्या'' च यमकाचीच गज्जल.



श्रीकृष्ण राऊत : 

कैलास,

‘प्रत्येक व्यंजनात ''अ'' हा काफिया आहेच.’

असे जे तू लिहिले ते चुकीचे आहे.

मराठी वर्णमालेत

व्यंजन+स्वर = अक्षर होते.

केवळ व्यंजन लिहिताना त्याचा पाय लंगडा करून लिहितात.

व्यंजन म्हणजे स्वरांशिवायचे अक्षरचिन्ह.

हे लक्षात घेतले पाहिजे.

अ,आ,इ,ई.उ,ऊ ए,ऐ,ओ,अं अ:

ह्या पैकी एखादा स्वर स्वीकारल्याशिवाय अक्षर पूर्ण होत नाही.

काफियाच्या शब्दातल्या शेवटच्या अक्षरात वरीलपैकी एखादा स्वर असतोच.

उर्दू लिपीतल्या वर्णमालेच्या व्यवस्थेनुसार उर्दूत शब्दातील शेवटच्या अक्षरातील

आ,ई.ऊ एवढ्याच स्वरांना स्वर काफिया म्हणून मानतात.

स्वर काफिया म्हणून काही स्वरांना स्वीकारावे आणि काहींना नाकारावे. हे

लॉजिकली पटत नाही.प्रत्येक अक्षर जर स्वरांशिवाय

पूर्ण होत नाही.तर मग ही विषमता का?

मराठी गझल अजूनही पुरती विकसित नाही.ती विकसनशील आहे.

ह्या वळणावर तिच्या विकासाच्या सर्व शक्यता पडताळून पहाव्या.

मात्रावृत्त,गैरमुरद्दफ,अलामतींची सूट ही मोकळिक देखील आपण एकदम

स्वीकारलेली नाही.त्याला काही काळ लागला.

तसा तो जाऊ द्यावा लागेल...

उत्कृष्ट आशय असलेल्या ‘अ’कारान्त स्वर काफियांच्या अनेक गझला काळाच्या

प्रवाहात मराठीत लिहिल्या गेल्या की हा प्रश्न आपोआपच निकालात निघेल.

१.अगोदर नियम

२. मग नियमांचे अपवाद

३. नंतर अपवादांचे नियम

अशी कोणत्याही शास्त्राची उत्क्रांती असते. गझलचे शास्त्रही त्याला अपवाद नाही.

दुसरीकडे गझलचे सर्व नियम तंतोतंत पाळून लिहिलेल्या गझला

उत्कृष्ट काव्याअभावी वाचवतही नाहीत,असा अनुभव चोखंदळ वाचकांना वारंवार

येतो आहे.त्याचाही अर्थ आपण समजून घेतला पाहिजे.


डॉ.कैलास गायकवाड : 

छंदोशास्त्रात काव्याच्या शेवटचं अक्षर हे -ह्स्व असेल तर ते गेयतेला बाधक ठरतं. प्रचलित सगळी वृत्ते दीर्घ अक्षर अंतिम अक्षर असलेली आहेत. आणि म्हणूनच दीर्घ स्वरकाफियाला ,म्हणजेच '' आ'', ''ई'' आणि 'ऊ'' ला मान्यता आहे. मी प्रत्येक ''अक्षरात'' ''अ'' हा स्वर अंतर्भूत असतोच असं ना लिहीता व्यंजनात असं लिहीलं आहे.... हा मुद्दा या चर्चेत गौण आहे.... मुद्दा असा आहे की.... ''अ'' कारान्त स्वरकाफियाची गझल कविताच होईल. ज्या ''काफिया'' वर आधारीत गझलेचा फॉर्म आपण स्वीकारला आहे.....तो काफियाच नष्ट झाल्याने अशी रचना गझल होतच नाही हे आपण मी दिलेल्या उदाहरणावरुन पाहू शकता. गझलेच्या याच ''कॉम्पेक्ट्नेस'' मुळे अभिव्यक्तीवर येणार्‍या मर्यादेमुळे व्यथित होवून गालिब लिहीतो....... बक़द्रे शौक़़ नहीं ज़र्फ़े-तंगनाए-ग़ज़ल
कुछ और चाहिए वुस‌्‌अत मेरे बयाँ के लिए

श्रीकृष्ण राऊत : 

कुणीही अभिजात कवी छंदशास्त्रातले नियम पाळण्यासाठी केवळ लिहीत नाही.

त्याची प्रतिभा छंदशास्त्र वाकवते.

अर्थात तेवढी धमक प्रतिभेत पाहिजे.

गेयतेला बाधक ठरणार्‍या अनेक गोष्टी चांगल्या गझलेत येऊ नये असे थोडेच आहे.

केवळ गायनासाठी कच्चा माल पुरवायचा असल्यास बात निराळी.

दुष्यंत कुमारांच्या गझला गायिल्या गेल्या नाहीत तरी काही फरक पडला नाही.

आणि केवळ गायनामुळे प्रसिद्दी मिळालेल्या शायरांचे गझलसंग्रह चाळून काहीच

हाती लागत नाही...

गजल मे बंदिशो अल्फाज ही नही काफी

कुछ जिगर का खून भी चाहिये असर के लिये...


डॉ.कैलास गायकवाड :

आपण म्हणत आहात ते प्रत्येक काव्यासाठी लागू आहे. छंदशास्त्राचे नियम पाळून लिहिलेल्या गझलांत दम नसतो.... हा मुद्दा जरी ग्राह्य धरला तरी याचा अर्थ गझलेचे नियम न पाळता दमदार गझल लिहावी असा होत नाही.

गझल दमदार असावी आणि ती गझलचे सर्व तंत्र पाळून केलेली गझल असावी.

आणि प्रतिभावंताला काय गझलच्या तंत्रामुळे अभिव्यक्तीवर मर्यादा येत असतील तर गझलच लिहावी असं थोडंच आहे... कविता,मुक्तछंद्,पोवाडा,अभंग्,लावणी,कथा,ललित्,स्फुट्लेखन्,चारोळी असे अनेक प्रकार आहेतच .

प्रत्येक काव्यप्रकाराचे नियम आहेत आणि गझलेचे नियम स्वयंस्पष्ट आहेत.
'अ' कारान्त स्वरकाफिया असलेली गझल लिहीणे म्हणजे, ''आठ'' ओळींची चारोळी लिहील्यासारखे होईल.


श्रीकृष्ण राऊत : 

मात्रावृत्त,गैरमुरद्दफ,अलामतींची सूट ही मोकळिक देखील आपण एकदम

स्वीकारलेली नाही.त्याला काही काळ लागला.

तसा तो जाऊ द्यावा लागेल...

उत्कृष्ट आशय असलेल्या ‘अ’कारान्त स्वर काफियांच्या अनेक गझला काळाच्या

प्रवाहात मराठीत लिहिल्या गेल्या की हा प्रश्न आपोआपच निकालात निघेल.

१.अगोदर नियम

२. मग नियमांचे अपवाद

३. नंतर अपवादांचे नियम

अशी कोणत्याही शास्त्राची उत्क्रांती असते. गझलचे शास्त्रही त्याला अपवाद नाही.


कैलास,

वाट पहा....काळ जाऊद्या...

डॉ.कैलास गायकवाड :

हरकत नाही सर, वाट पाहू या...


श्रीकृष्ण राऊत : 

‘गझलचे सर्व तंत्र’

ही संकल्पना स्थितीशील नाही... नव्हती...नसेल...

ही गतीशीलताच त्याचे उत्तर आहे.

कैलास गायकवाड आणि श्रीकृष्ण राऊत

ह्या ’डॉं.’ ची ती बांधील नाही...

धोंडोपंत आपटे : 

वा वा दोन्ही डॉक्टर........ क्या बात है......... मजा आली.

दोन्ही डॉक्टरांना धन्यवाद.

डॉ.कैलास गायकवाड : 

कोई ये कह दे गुलशन गुलशन
लाख बलाएँ एक नशेमन

कामिल रेहबर क़ातिल रेहज़न
दिल सा दोस्त न दिल सा दुशमन

फूल खिले हैं गुलशन गुलशन
लेकिन अपना अपना दामन

उमरें बीतीं सदियाँ गुज़रीं
है वही अब तक अक़्ल का बचपन

इश्क़ है प्यारे खेल नहीं है
इश्क़ है कारे शीशा-ओ-आहन

खै़र मिज़ाज-ए-हुस्न की यारब
तेज़ बहुत है दिल की धड़कन

आज न जाने राज़ ये क्या है
हिज्र की रात और इतनी रोशन

आ कि न जाने तुझ बिन कल से
रूह है लाशा, जिस्म है मदफ़न

काँटों का भी हक़ है कुछ आखि़र
कौन छुड़ाए अपना दामन

--जिगर मुरादाबादी.

क्रांतिताई,ही 'अन' हा शब्दसमूह शेवट असलेली गझल आहे.... स्वरकाफियाची गझल नाही.


धोंडोपंत आपटे :

मात्रावृत्त,गैरमुरद्दफ,अलामतींची सूट ही मोकळिक देखील आपण एकदम

स्वीकारलेली नाही.त्याला काही काळ लागला.

तसा तो जाऊ द्यावा लागेल...

उत्कृष्ट आशय असलेल्या ‘अ’कारान्त स्वर काफियांच्या अनेक गझला काळाच्या

प्रवाहात मराठीत लिहिल्या गेल्या की हा प्रश्न आपोआपच निकालात निघेल.

१.अगोदर नियम

२. मग नियमांचे अपवाद

३. नंतर अपवादांचे नियम

अशी कोणत्याही शास्त्राची उत्क्रांती असते. गझलचे शास्त्रही त्याला अपवाद नाही.>>>>>>

क्या बात कही है........ Hats Off Doctor

धोंडोपंत आपटे : 

नुसत्या तंत्रशुद्धतेपेक्षा समृद्धीचा विचार गझलेला उंचीवर नेईल असं आमचं प्रामाणिक मत आहे.

एखाद्या शेरात समजा अलामत चुकली पण तो शेर जर लाखमोलाचा असेल तर त्याचा स्वीकार झाला पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे, नियमांच्या दोरखंडांनी गझल जेवढी करकचून बांधायला जाऊ तेवढी ती गुदमरेल / गुदमरते.

हे वैयक्तिक मत आहे. टीकेस खुले आहे.


डॉ.कैलास गायकवाड : 

आपले म्हणणे त्रिवार मान्य आहे पंत.... अलामतभंग,गैरमुरद्दफ असणे, ... आ,ई,ऊ कारान्त स्वरकाफिया असणे वगैरे बाबी मान्य करुनसुद्धा गझल..गझलच असते.... इतकेच नियम शिथिल करणे हे गझलचा फॉर्म अबाधित ठेवणे होय.... या पुढे जावून अ कारान्त स्वराकाफिया घेणे,हे गझलचे गझलपण नष्ट करणे होय. असो.. वाट पाहू या.

श्रीकृष्ण राऊत :

डॉ.कैलास गायकवाड,

‘गझलचे सर्व तंत्र’

ही संकल्पना स्थितीशील नाही... नव्हती...नसेल...

ही गतीशीलताच त्याचे उत्तर आहे.

श्रीकृष्ण राऊत,कैलास गायकवाड किंवा कोणत्याही

’डॉं.’ ची ती बांधील नाही...

क्या करे गर इन्तजार न करे...


रणजित पराडकर : 

संपूर्ण चर्चा वाचली. छान वाटलं. सर्व सहभागी वरिष्ठ मार्गदर्शकांचे ह्या मंथनासाठी आभार.

पण मला असं वाटतं की, 'वाट पाहू', असं म्हणून मुद्दा सोडून न देता त्याला अश्या प्रकारच्या वैचारिक चर्चा करून (फोरमवर अथवा खाजगीत) पूर्णत्त्वास न्यावे. आज मराठी गझलेची मदार आपण लोकच सांभाळत आहात. माझ्यासारखे कित्येक उत्साही 'वूड बी' गझलकार आपल्याकडूनच बोध घेणार आहेत. पुढचा रस्ता आपणच बांधणार आहात. त्यामुळे तो अर्धवट सोडू नये. नाही तर उत्साही लोक त्याला हवा तिथे, हवा तसा वळवतील.

माझंही मत -

माझ्या मते, गझल हा गायनाचा प्रकार आहे. त्यामुळे काफियाचा विचार त्या अंगाने करायला हवा. प्रत्येक शेर काफियाच्या जागेवर एक टप्पा गाठत असतो. अनेकदा, गाताना ह्या ठिकाणी किंचित थांबतातही, कधी काफियाची जागा (स्वर) लांबवतातही. त्यामुळे ती जागा दीर्घ स्वराची असल्यास अधिक समर्पक वाटेल, असं मला वाटतं. 'स्वरकाफिया' हा प्रकार कमजोर काफियाचा समजला जातो, असंही मी ऐकलं आहे. 'शुद्ध काफिया'च्या गझला गाण्याकडे गायकांचा कल अधिक असतो. अश्या परिस्थितीत, 'अ-कारान्त' स्वरकाफियाची गझल तर अजुनच कमजोर वाटेल, असं मलाही वाटतं.

 "गझल हा गायनाचा प्रकार आहे." ह्या वाक्यास "गझल हा गायनाचाही* प्रकार आहे." असे वाचावे.


श्रीकृष्ण राऊत :

रणजित,

मला सहज भटांचा शेर आठवला-

‘घाई करून घ्यावी त्यांची प्रमाणपत्रे;
मागून न्याय होतो,आधी मिळे निवाडा.’

************************************************************************************************************************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: