२४ ऑक्टोबर, २०१२

मयुरेश साने : पाच गझला



१.

जगायचे ही जबाबदारी

कशी सरावी हयात सारी;
जगायचे ही जबाबदारी.

जगात येणे निघून जाणे;
जसे कुणी हारतो जुगारी.

पुन्हा तुझे स्वप्न सोबतीला;
पुन्हा नव्याने सुरू उधारी.

तुझाच मी अंश अंश देवा;
पुढ्यात का मी तुझ्या भिकारी.

पिऊन ही वाढतेच आहे;
जगायची ही तहान न्यारी.

सरळपणाला मिळेल शिक्षा;
तुझे गुन्हे ही तुझी हुशारी.

२.

खूप रडलो बस अता मी रडत नाही

दुख्ख आता पापणीला छळत नाही;
खूप रडलो बस अता मी रडत नाही.

शेवटी उरली तिजोरी बंद दु:खे;
ठेव सौख्याची मला परवडत नाही.

जन्म अख्खा वाहण्यासाठीच नसतो;
आसवांना एवढेही कळत नाही.

धुगधुगी हरवून बसला कोळसा की;
पेटवावा लागतो...तो जळत नाही.

वाटते कमळा प्रमाणे मी फुलावे;
राहणे चिखलातले पण मळत नाही.

जीवनाची सावकारी काय सांगू;
हात जोडा पाय पकडा टळत नाही.


३.

ओळखीच्या माणसांना ओळखीचा त्रास होता


समजलो सहवास ज्याला तो खरा आभास होता;
ओळखीच्या माणसांना ओळखीचा त्रास होता.

घेतले होते जरी मी भरभरुनी श्वास ताजे;
जीवनाची कोठडी अन् मृत्युचा गळफास होता.

चालले मागील पानातुन पुढे आयुष्य माझे;
तोच तो कंटाळवाणा लांबलेला तास होता.

जन्मभर ओल्याच होत्या पापण्यांच्या ओंजळी अन्
जन्मभर माझ्या तृषेला मृगजळाचा ध्यास होता.

पाहिले जेव्हा तुला मी बस् पहातच राहिलो गं;
पण किती कोट्यावधीचा अर्थ त्या शून्यास होता.

५.

आसवांच्या स्वागताला हुंदक्यांनी यायचे

आठवांचा गाव आल्यावर असे चालायचे;
आसवांच्या स्वागताला हुंदक्यांनी यायचे.

आपले नाते जणू की पान गळतीचा बहर;
मी तुला माळायचे अन् तू मला टाळायचे.

तान मुरक्या शब्द सारे चांगले असले तरी;
फक्त आलापात असते जे खरे सांगायचे.

लावला नाहीस तू ओठी जरी प्याला कधी;
पण तुझ्या ओठात माझे जन्म फेसाळायचे.

साद होती बोलकी पडसाद होता बोलका;
पण तरी हातात नव्हते हात हाती घ्यायचे.

३ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

Khupachh sunder aahet...

Vrushali.

Unknown म्हणाले...

Khupach sunder ahet...

Vrushali

Unknown म्हणाले...

Khupach sundar aahet........