डी.एन.गांगण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
डी.एन.गांगण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२७ सप्टेंबर, २००९

दोन गझला : डी.एन.गांगण



डी.एन गांगण
९३२३७९५९९६

१.आपण

किती खरे अन् किती झूट वावरतो आपण;
विनामुखवटे बहुरुपियाही बनतो आपण.

खरा चेहरा घेउनी कोणी हिंडत नाही;
स्वत: स्वत:चा बनुन तोतया फिरतो आपण.

दु:ख कशाला करावयाचे दुरून आता;
नात्यानेही तसे जवळचे नव्हतो आपण.

स्वप्नांमागुन स्वप्ने तुटती समोर अपुल्या;
तरी शेवटी स्वप्नांसाठी जगतो आपण

नश्वर आहे देह आपुला माहित असुनी,
अन् वरवरच्या रुपास बघुनी भुलतो आपण;

जीवन म्हणजे नाटक असते या जगण्याचे;
अन् “जन्माचे नाटक झाले” म्हणतो आपण.

सिध्द कराया मीही आहे एक असामी;
नको नको ते उपद्व्यापही करतो आपण.

कोण कुणाचा हेच पाहुनी मत देताना
स्वत्वहीन अन् तत्वहीनही बनतो आपण.

२.तार

( तरही गझल - जुल काफिया )

‘ मी त्या भल्या पहाटे लावून दार आले
हातात आसवांचा वाहून भार आले’
- सुलभा कामत

मी त्या भल्या पहाटे लावून दार आले;
हातात आसवांचा वाहून भार आले.

ज्यांच्यावरीच होता विश्वास ठेवला मी;
त्यांच्याच संगिनींचे झेलून वार आले.

जाऊ अता कशी मी, परतून त्या ठिकाणी...
टाळून ‘बाल्य’ माझे चालून फार आले.

सामील गाव झाला माझा यशात जेव्हा;
कोणी न आप्त माझे घेऊन हार आले.

मी दु:खही स्वत:चे नेले स्वत:बरोबर;
कोणावरी न माझा, टाकून भार आले.

‘निर्माल्य’ जीवनाचे, मृत्यूस वाहिले मी
शब्दांत फक्त एका, सांगून सार आले

बदसूर साज होता, जुळवूनही जुळेना
मी एवढयाचसाठी, तोडून तार आले.

८ ऑक्टोबर, २००८

वादळाला अडविणेही शक्य आहे : डी.एन.गांगण




वादळाला अडविणेही शक्य आहे;
अन् विजांना झेलणेही शक्य आहे.

तू तिथे आहेस, तोवर प्यास माझी-
मृगजळाने भागणेही शक्य आहे.

तू नको विश्वास ठेवू आरशावर;
तो चहाडी लावणेही शक्य आहे.

जीवघेणी रात्र आहे पौर्णिमेची;
चांदण्याने पोळणेही शक्य आहे.

तोकड्या हातांत आहे जिद्द मोठी;
चंद्र हाती लागणेही शक्य आहे.

संपली नाती अशी की काय सांगू-
सावली मज टाळणेही शक्य आहे.

मो. ९३२३७९५९९६

७ जुलै, २००८

मी मला जाळीत आलो

मी मला जाळीत आलो;
शब्द पण पाळीत आलो.

ना मिळाले फूल तेव्हा;
स्वप्न मी माळीत आलो.

भेट घेण्या माणसांची;
मी जुन्या चाळीत आलो.

वाटले स्वर्गात जावे;
मी तुझ्या आळीत आलो.

एवढा आनंदलो की
आसवे ढाळीत आलो.

जे घडायाचेच होते,
व्यर्थ ते टाळीत आलो.

- डी.एन.गांगण
९३२३७९५९९६

६ मे, २००८

असेना जिंदगी खडतर

असेना जिंदगी खडतर, जगायाचे सरावाने;
असेना वाट वळणांची, वळायाचे सरावाने.

पुन्हा ती शक्यता नाही,नसे मज ती अपेक्षाही;
तरीही भेट झाली तर हसायाचे सरावाने.

तुझी केली प्रतीक्षा,पण कुठेही थांबलो नाही;
उन्हातान्हातही आता रमायाचे सरावाने.

जरी हे बेभरवशाचे ऋतूंचे वागणे आहे;
कळ्यांनी मात्र वेळेवर फुलायाचे सरावाने.

कुणाच्या राग लोभाची कशाला मी करू पर्वा;
मला जे भावले, ते ते लिहायाचे सरावाने.

जरी आम्ही दिल्या होत्या शिव्याही एकमेकांना,
तरी सत्तेत जोडीने बसायाचे सरावाने.

सदा यांच्या दिवाळीला कुणाची झोपडी जळते;
गरीबांनी कशासाठी जळायाचे सरावाने.


- डी.एन.गांगण
९३२३७९५९९६