रुपेश देशमुख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रुपेश देशमुख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२० डिसेंबर, २००८

स्मशान



शोधून सापडेना साधे निशाण माझे;

बेवारशाप्रमाणे हे वर्तमान माझे.


पुतळे उभारले अन् केल्यात फक्त चर्चा;

तुम्ही विचार कोठे केले महान माझे?


कर्तव्यदक्षतेचा अहवाल सांगतो की

अद्यापही सुरक्षित आहे मकान माझे.


तेजीत जीवनाचा बाजारभाव यंदा;

मी काढले विकाया सारे इमान माझे.


मी वारसा जगाच्या आदीम प्रेरणेचा;

प्रत्येक माणसाच्या हृदयात स्थान माझे.


माझ्या मताप्रमाणे केव्हाच वारलो मी;

आता जिवंत आहे येथे स्मशान माझे.


रुपेश देशमुख

९९२३०७५७४३

८ ऑक्टोबर, २००८

प्रभारी : रुपेश देशमुख


पायात त्राण नाही आता चुकेल वारी:
थोडी तरी विठोबा बाकी असो उधारी.

आकांत मांडल्याने उपयोग काय झाला;
चुपचाप सोसण्याची ठेवा अता तयारी.

चैनीत राहण्याचा परिणाम हाच होतो;
आली अता नशीबी कायम उपासमारी.

इतकी प्रचंड भीती ही वाटते जिवाला;
माझ्या मधून आता होणार मी फरारी.

भोगून अर्ध-सत्ता आभार मानले मी;
आजन्म जीवनाने मज ठेवले प्रभारी.

मो. ९९२३०७५७४३

२५ जून, २००८

एक फोन कर






नको उभारू असा दुरावा एक फोन कर;
ठरेल खोटा तुझाच दावा एक फोन कर.

असे कशाला एकएकटे झुरायचे तू;
अर्धा वाटा मला मिळावा एक फोन कर.

नकोस बोलू एक शब्दही... फक्त रिंग दे;
तुझा अबोला मला कळावा एक फोन कर.

म्हणायची हक्काने मजला, 'घरी निघुन ये..'
पुन्हा येउदे असा बुलावा एक फोन कर.

'क्षणोक्षणी मी तुझी आठवण काढत असते'
ह्या गोष्टीला काय पुरावा? एक फोन कर.

- रुपेश देशमुख
9923075743

११ मार्च, २००८

आपण दोघे

कधी संयमी, कधी अनावर आपण दोघे;
हो-नाहीच्या उंबरठ्यावर आपण दोघे.

क्षुल्लक कारणांवरुन भांडण करतो;
स्वत:च हसतो नंतर त्यावर आपण दोघे.

बोलायाचे तेच बोलतो नेमके तरी,
उगीच करतो आवर-सावर आपण दोघे.

कशास येतो अहंकार हा आपल्यामधे;
शोधू उत्तर ह्या प्रश्नावर आपण दोघे.

माहिती कहाणीस ह्या शेवट नाही;
कधी न घेतो तरी मनावर आपण दोघे.


- रुपेश देशमुख
9923075743