१३ मार्च, २००९

सुरेश भटांची मराठी गझल : डॉ.श्रीकृष्ण राऊत




मराठी कवितेच्या इतिहासाला कविवर्य सुरेश भटांचं नाव विसरता येणार नाही. गझलचा शक्तिशाली आकृतीबंध त्यांनी मराठी कवितेला दिला. स्वत:च्या मराठी गझलांनी त्यांनी मराठी कवितेचं दालन समृद्ध केलं.मराठी कविता अधिक श्रीमंत केली.
एखादं मिशन चालवावं इतक्या निष्ठेने त्यांनी मराठी गझलचा प्रसार-प्रचार केला. उर्दू गझलकारांच्या परंपरेप्रमाणे उस्तादाच्या भूमिकेतून नव्याने गझल लिहिणा-या कवींच्या गझलात दुरूस्त्या सुचविल्या. त्यांना ‘इस्लाह’ दिला. मराठी कवितेच्या परंपरेत एखाद्या जेष्ठ कवीने अशा प्रकारे नव्या कवींच्या रचनात दुरूस्त्या करणे बसणारे नव्हते. म्हणून त्यांच्यावर टीकाही खूप झाली. ‘नव्या कवींची एक पिढी त्यांनी वाया घालवली’ असा इल्जाम त्यांच्यावर लावण्यात आला. पण त्यांनी अशा प्रकारच्या टीकेला भीक न घालता, समीक्षकांच्या तथाकथित विरोधाला न जुमानता आपले मिशन अधिक नेटाने, अधिक जोमाने पुढे नेले.
केवळ गझल ह्या एखाद्या काव्यप्रकाराला वाहिलेली संमेलनं आज भरवली जातात. आणि ती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाइतकीच साहित्येतर कारणांसाठी गाजतातही. मराठीतल्या ह्या गझल प्रेमाचे मूळ कविवर्य सुरेश भटांच्या ‘गझल मिशन’ मध्ये आहे, हे विसरून चालणार नाही.
मराठी गझलचा हा सिलसिला आजपासून जवळपास पन्नास वर्षांआधी सुरू झाला आहे. १९५५ पासून सुरेश भटांनी मराठी गझल लेखनास प्रारंभ केला. एकाहत्तर वर्षांच्या आयुष्यातली पन्नास वर्षे सुरेश भटांनी मराठी गझलला दिली आहेत. तेव्हा कुठे आत्ता आत्ता अलीकडे तिला प्रतिष्ठा प्राप्त होते आहे. गझल प्रेमाच्या वेडाने झपाटलेला हा अर्धशतकाचा कालखंड पाहिला की सहजपणे उर्दूतील श्रेष्ठ गझलकार गालिबचा शेर आठवावा -

‘आह को चाहिए इक उम्र असर होने तक
कौन जिता है तेरी जुल्फ के सर होने तक’

आपल्या आयुष्यातली पन्नास वर्षे मराठी गझलला अदा केल्याची पावती म्हणून मराठी रसिकांनी सुरेश भटांना ‘गझल सम्राट’ हा किताब बहाल केला. हे जग कोणालाच काही फूकट देत नाही. त्याची पुरेपूर किंमत वसूल करून घेते.इतरांच्या यशावर असूयेने जळत आणि आत्मवंचनेने कुंथत राहणा-यांना म्हणूनच तर ते कबीराच्या तो-यात सांगतात -

‘फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही’

इथे आपल्याला चटकन कबीराची आठवण होते-

‘कबीर खडा बजार मे लिए लू काठी हाथ
जो घर जारे आपना चले हमारे साथ’

असे खडे बोल सुनावणा-या कबीराचा ‘एल्गार‘ आणि दंभावर प्रहार करणा-या तुकारामाचा ‘झंझावात’ त्यांच्या गझलेत बेमालूम एकरूप झालेला दिसतो.

‘इथे मागून ही माझी समाधी बांधली गेली
जिथे मी गाडला गेलो अरे ही तीच आळंदी’

ज्ञानेश्वरांच्या समाधीला एक प्रतिमारूप देताना चमत्कारिक इतिहासाविषयी त्यांनी व्यक्त केलेली काव्यात्मक प्रतिक्रिया आपल्याला ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही’याचा पुन:प्रत्यय देणारी आहे.
सुरेश भटांच्या नावावर आजच्या घडीला सहा कविता संग्रह जमा आहेत. ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’ ‘सप्तरंग’ आणि ‘रसवंतीचा मुजरा’अशी त्यांची शीर्षकं आहेत.
यापैकी निव्वळ गझलांचे म्हणता येतील असे संग्रह म्हणजे ‘एल्गार’आणि ‘झंझावात’. भटांच्या स्वभावातील रोखठोकपणा आणि आक्रमकता त्यांच्या गझलांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होते तशीच त्यांच्या संग्रहांच्या ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ शीर्षकांतूनही अभिव्यक्त होते.
मराठी कवितेवरील आक्रमण आणि मराठी कवितेतील वादळ म्हणजे गझल असा आशय सूचविणारी ती शीर्षके आहेत.
सुरेश भटांच्या मराठी गझलांचा प्रवास आजही कालानुक्रमे न्याहाळायचा झाल्यास आपल्याला त्यांच्या ‘रूपगंधा’ या पहिल्या संग्रहापासून सुरूवात करावी लागेल. ‘रूपगंधा’ या त्यांच्या पहिल्या संग्रहात एकूण ७२ कविता आहेत. त्यापैकी फक्त सात रचनाच गझल प्रकारात आहेत.

‘मल्मली तारूण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जिवाला गुंतवावे

रे ! तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे ! तू मला बिलगून जावे!’

‘रूपगंधा’ या शीर्षकाच्या अशा मल्मली श्रृंगारांच्या रेशमी गझलने संग्रहाची सुरूवात होते.उर्दूत एकच विषय उलगडत नेणा-या गझलला ‘मुसलसल गझल‘ म्हणतात. भटांच्या सुरूवातीच्या अनेक गझला या प्रकारात मोडणा-या आहेत.याच संग्रहातल्या विविध विषयाच्या इतर गझला पाहिल्या तरी त्यांच्यात आशयाचे एकत्र सूत्र पाण्यातल्या तरंगासारखे विस्तारताना आपल्याला दिसते.

‘पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी
जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी’

‘वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही’ असं जगणं चाललेलं असताना मृत्यूचं असलेलं स्वाभाविक आकर्षण नंतरच्या संग्रहातूनही त्यांच्या गझलात निनादत राहिलं.

‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’

किंवा

‘मेल्यावरी जगाचे आभार मानले मी
जाऊ दिले मला हे उपकार मानले मी’

सुरूवातीच्या मृत्यूचं आकर्षण परिपक्व होत होत उदात्ततेकडे झुकताना आपल्याला दिसतं.‘रूपगंधा’ या पहिल्या संग्रहातील आणखी एक प्रसिद्ध गझल अशी आहे-

‘माझिया गीतास द्वेषाचा जुना आधार आहे!
माझिया द्वेषास विश्वाच्या व्यथेची धार आहे!

हेलकावे मी पुढे येता मिठी सा-या फुलांची,
हे बरे झाले... इथे माझ्या उरी अंगार आहे!’

नंतरच्या गझल लेखनाची नांदीच एकप्रकारे या गझलच्या ओळीतून आपल्याला जाणवते.
फुलांच्या मिठीचा नाजुक साजुक श्रृंगार आणि उरात विश्वाच्या व्यथेचा धगधगता अंगार अशा दोन धृवात सुरेश भटांच्या सर्व गझला हेलकावत राहिल्या.
गझल लेखनाला प्रारंभ केल्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’ हा गझल संग्रह १९७४ साली प्रसिद्ध झाला. ह्या संग्रहात एकूण ८२ कविता आहेत. त्यापैकी ३४ कविता ह्या गझल प्रकारातील आहेत.
ह्या संग्रहातील बहुतांश गझला देखील एकच आशय उलगडून दाखविणा-या आहेत. प्रत्येक शेर आशयदृष्ट्या स्वतंत्र असलाच पाहिजे अशी गझलची आग्रही व्याख्या ‘रंग माझा वेगळा’ प्रसिद्ध होईपर्यंत तरी भटांनी स्वीकारल्याचे त्यांच्या गझल लेखनातून जाणवत नाही.

‘समजावुनी व्यथेला समजावता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले’

किंवा

‘जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही’

किंवा

‘दिवस हे जाती कसे अन् ऋतू असे छळतात का
विसरतो आहे तुला पण आसवे ढळतात का?’

किंवा

‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले!
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले!’

-अशी कितीतरी उदाहरणे घेता येतील. माधव जूलियनांनी दिलेल्या संज्ञेत बोलावयाचे तर अशा सर्व गझला ‘एक पिण्डी भावगीतासारख्या’ उलगडत जाणा-या आहेत.

‘रंग माझा वेगळा’ हे भटांच्या काव्यप्रवासाचे एक महत्त्वाचे वळण आहे. ज्या वळणावर त्यांचे गीत लेखन मागे सुटले आहे. आणि ‘मुसलसल गझल’ देखील मागे पडली आहे.आणखी एक महत्त्वाची गोष्ट ‘रंग माझा वेगळा‘ नंतर घडलेली आपल्याला आढळते. एखाद्या गझलेत जास्तीत जास्त नऊ शेर लिहिणारे भट मात्र ‘एल्गार’ मध्ये सुचतील तेवढे तेरा शेर एकाच गझलमध्ये घालताना दिसतात.आशयदृष्ट्या शेरांची विविधता लक्षात घेतली तरी एकसंध काव्यकलाकृतीला उणेपणा आणत एखादा शेर गझलची विण सैलसर करतो.
निव्वळ गझलांचे असलेले भटांचे दोन संग्रह म्हणजे ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’.
‘एल्गार‘मधे ११९ कविता आहेत. त्यापैकी ९४ गझल प्रकारातल्या आहेत. तर झंझावातामध्ये एकूण ९६ कविता आहेत आणि त्यापैकी ७३ गझला आहेत.
संख्यात्मक वाढीच्या दृष्टीने ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ हे त्यांच्या गझल प्रकारातले महत्त्वाचे पडाव आहेत. पण गुणात्मक वाढीच्या दृष्टीने मात्र ते ‘रंग माझा वेगळा’ इतके गोळीबंद गझल देणारे वाटत नाहीत. आकाराच्या बाह्य अंगाने त्याचे महत्त्वाचे कारण सूचतील तेवढे शेर एका गझलेत घालणे हे जसे असावे, तसेच अंतरंगाच्या अंगाने तपासून पाहिले तर त्याच त्या लाडक्या आणि आवडत्या प्रतिमांची पुनरावर्तने हे दुसरे कारण असावे..
‘झंझावात’च्या प्रस्तावनेत भटांनी लिहीलेले एक वाक्य आहे ‘मानवी प्रेम जगाला सुंदर बनवते, पण ज्या जगात प्रेम, चंद्र, चांदणे, तारे, फुले, संगीत, साहित्य आणि अजून कितीतरी सुंदर गोष्टी आहेत. ते जग हृदय असलेल्या जिवंत माणसांनी जगण्याच्या लायकीचे बनवले पाहिजे’.
या त्यांच्या वाक्यातील प्रेम, चंद्र, चांदणे, तारे, फुले, संगीत, साहित्य ही जी यादी आहे. त्यात अश्रु आणि स्वप्ने मिळवली की तेच त्यांच्या गझलातील प्रतिमा विश्वाचे वर्तुळ पूर्ण होते.
आणि दुसरीकडे सामान्य माणसांच्या दु:ख दारिद्र्याचा कैवार घेण्यासाठी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक दंभावर घनाघाती प्रहार करताना त्यांच्या गझला जेव्हा चीड, संताप व्यक्त करतात तेंव्हा त्यांच्यातली सूचकता नष्ट होऊन त्यांच्या शब्दांचा स्वर अधिक चढा झाल्यासारखा जाणवतो. त्यांना अपेक्षित काव्यातील प्रासादिकतेलाही तो कधी कधी ढोबळपणाची बाधा आणत तर नाहीना,असे वाटते.
‘सप्तरंग’ या त्यांच्या शेवटच्या संग्रहात एकूण ८० कविता आहेत. त्यापैकी ४६ गझला आहेत. एकूण समाविष्ट कवितांच्या तुलनेत हे प्रमाण बरेचसे ओसरल्या सारखे वाटते. ब-याचशा जुन्या कविता ज्या इतर संग्रहात समाविष्ट होऊ शकल्या नाहीत त्या या संग्रहात समाविष्ट करून संग्रह सिद्ध केल्यामुळे ते घडले असावे.
‘रसवंतीचा मुजरा’ ह्या अखेरच्या संग्रहात एकूण ८३ कविता आहेत.त्यापैकी केवळ ६ गझला आहेत. सुरेश भटांच्या नावावर असलेल्या ह्या सहा संग्रहात समाविष्ट एकूण ५११ कवितांपैकी २६१ गझला आहेत.
‘सप्तरंग’ ह्या संग्रहात समाविष्ट ‘ह्म्द’(पृ.३९) ‘न आत शरीफ’(पृ.४०) आणि ‘पाच वर्षांनी!’(पृ.६६)आणि ‘खुलासा’(पृ.७६)दोन हझला अशा चार रचनांचा आकृतिबंध गझलांचाच आहे.त्यांना धरून गझलांची संख्या २६५ होईल.‘न आत शरीफ’ ही रचना ‘झंझावात’ ह्या संग्रहातही पृ.५० वर समाविष्ट आहे.
वरील आकडेवारीत मुसलसल गझलांचाही समावेश आहे.ज्यांना ‘रंग माझा वेगळा’नंतरच्या कालखंडात सुरेश भट गझलांच्या फॉर्म मधल्या कविता म्हणत असत.
‘सप्तरंग’ वाचताना आपण ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ मधल्या गझलाच पुन्हा पुन्हा वाचतो आहोत की काय असा भास व्हावा एवढा प्रतिमांचा सारखेपणा जाणवतो.
एकंदर गझलात हे जिथे जिथे नाही तिथे प्रतिमांचे नावीन्य आणि आशयाची उत्कटता आपल्याला थेटपणे भिडते. त्या ओळी आपल्या स्मरणात राहतात आणि भाषिक उपयोजन करण्याएवढे सुभाषितत्वही त्यांना लाभते उदाहरणार्थ -

‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.’

किंवा

‘संपली ती रात्र होती मानतो आम्ही, परंतू
जो निघाला सूर्य त्याचा चेहरा काळा कशाला?’

किंवा

‘चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेंव्हा?’

किंवा

‘राग नाही तुझ्या नकाराचा
चीड आली तुझ्या बहाण्याची!’

किंवा

‘अता आजन्म कोणाला कुणी सांगायचे नाही-
कुणापाशी कुणी वेडा प्रवासी थांबला होता.’

भटांच्या सहा संग्रहातल्या मुसलसल आणि गैर मुलससल अशा दोन्ही प्रकारच्या गझलांची एकूण संख्या २५४ इतकी आहे. त्यासाठी त्यांनी पन्नास वर्षे सातत्याने गझला लिहिल्या आहेत.
१९७४ मध्ये ‘रंग माझा वेगळा’ प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या निधनापर्यंत तीन दशकं त्यांच्या गझलांनी मराठी कवितेवर चेटूक केले आहे.
भटांच्या गझलांचा हा ताळेबंद मांडताना त्यांनीच केलेल्या कवितेच्या यशाची एक व्याख्या सहजपणे आठवली. ‘झंझावात’च्या प्रस्तावनेत ते लिहितात - ‘जी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर रसिकांच्या कायम स्मरणात राहते, जिचा नेहमीच्या जनजीवनात प्रत्यय येतो, ती यशस्वी कविता!’
आपल्या गझलांचे समर्थन करण्यासाठी भट आज हयात नाहीत पण काळाच्या कठोर समीक्षेला पुरून रसिकांच्या स्मरणात पिढ्यानुपिढ्या उरेल एवढे गुण त्यांच्या गझलात नक्कीच आहेत म्हणूनच तर त्यांच्या ह्या ओळी अधिक अर्थपूर्ण वाटतात-

‘जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणा-या पिढ्यांशी बोलतो आम्ही!’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: