१३ मार्च, २००९

सुरेशभट आणि मी : सुधाकर कदम









माझी आणि भटांची पहिली भेट मुंबईला झाली. मी आणि शंकर बडे त्या वेळी मुंबानगरीत हात पाय मारत होतो. 1977-78ची घटना असावी. दिवसभर दूरदर्शन, एच.एम.व्ही संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची भेट अशी भटकंती करुन थकलेल्या अवस्थेत रात्री पंढरीनाथ सावंतांकडे खास माशाच्या कोकणी कालवणाचे जेवण झाल्यावर चर्चा सुरू असताना अचानक पंढरीनाथ सावंतांनी सुरेश भट मुंबईत असल्याचे सांगितले. आम्ही दुसरे दिवशी भटांना भेटायला आमदार निवासात पोहचलो. शंकरची भटांशी नुकतीच ओळख झाली होती. त्याने माझी ओळख करून दिली. लगेच भटांनी सवयीप्रमाणे ‘‘गाऊन दाखवा’’ असा आदेश दिला. बिना साथीने मला जसे जमेल तसे गाऊन दाखवले, हे प्रकरण इथेच संपले. त्यानंतर नागपुरच्या विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उद्घाटनाप्रित्यर्थ गडकरी सभागृहात माझा कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश भट होते.या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी सरोद वादन केले. त्यानंतर मराठी-उर्दू गझला सादर केल्या. माझ्या स्वररचना भटांना आवडल्या. इथून आमची मैत्री सुरु झाली. सुरुवातीला त्यांनी ‘हा ठोकरुन गेला’ ‘कुठलेच फुल आता पसंत नाही’ अशा आणखी तीन गझला स्वरबद्ध करायला दिल्या. एक महिन्यानंतर नागपूरला चक्कर झाली तेव्हा त्यांना ‘ठोकरुन’ व ‘पसंत नाही’ या दोन गझला ऐकवल्या. ‘ठोकरुन’ची बंदिश त्यांना आवडली. पण ‘पसंत नाही’ वर मात्र ‘तू घरंदाज बाईला तमाशात नाचवले’ अशा शेरा मारला. त्यावरुन काहीतरी चुकल्याचे लक्षात आले. माझा पडलेला चेहरा पाहून गझलची शब्दानुरुप बंदिश कशी असायला हवी हे कळावे म्हणून मेहदी हसन, फरीदा खानम, गुलामअली यांच्या ध्वनिफिती देऊन त्यांच्या गायकीचा अभ्यास करायला सांगितले. तो पर्यंत मी अनेक गाणी बसविली होती, अनेक नाटकांना संगीत दिले होते. पंधरा वर्षांचा ऑर्केस्ट्राचा अनुभव होता. तरी सतत वर्षभर या ध्वनिफितीतील बंदि्शी, शब्दोच्चार, शब्दानुसार स्वररचना, शब्दफेक, भावाभिव्यक्ती याचा अभ्यास केला आणि नंतर आमचा मराठी गझला महाराष्ट्रभर पोहचवण्याचा ऐतिहासिक दौरा सुरु झाला. तेव्हाच्या बातम्यांची कात्रणे :









या दरम्यान मी जसा नागपूरला जायचो,तसे भटही आर्णीला यायचे.आर्णीला गझल आणि संगीत याशिवाय दुसरी चर्चा नसायची. 











भटांच्या गझला, माझ्या बंदिशी आणि रंगलेल्या मैफिली असा नुसता जल्लोष असायचा.











आर्णी मुक्कामी लिहून झालेल्या त्यांच्या अनेक गझलांपैकी वानगीदाखल काही :










































माझा तीन तासांचा फक्त मराठी गझल गायकीचा कार्यक्रम तयार झाला,तेंव्हा त्यांनी नागपूरच्या ‘लोकमत’मध्ये स्वखर्चाने दिलेली जाहिरात-






भटांसोबतच्या काही वर्षांच्या सहवासात अनेक मजेदार घटना घडल्या. खरे म्हणजे ‘त्या’ आमच्यातील वैयक्तिक ठेवा  आहेत. एकदा नागपूरला गायक अनिल खोब्रागडे, कादरभाई, गायिका प्रमोदिनी क्षत्रिय, व्हायोलिन वादक प्रभाकर धाकडे वगैरे मंडळी सोबत मैफल जमविण्याचे ठरले होते. मैफल रात्री होती. मी दुपारी भटांकडे पोहोचलो. सायंकाळ झाल्यावर त्यांनी आपण जरा बाहेर जाऊ असे म्हणून व त्यांच्याकडे असलेली हार्मोनियम त्यात टाकून आम्ही निघालो. भटांचा त्या दिवशीचा मूड जरा वेगळाच वाटला. सदैव बोलणारे भट त्या दिवशी अबोल होते. जवळ-जवळ एक तास दिशाहीन भटकंती झाल्यावर हळूच म्हणाले ‘‘सुधाकर आपण कुठं तरी बसू या का? या वेळेपर्यंत 8 वाजले होते. 9 वाजता आमची मैफल ठरली असल्यामुळे मी त्या काळजीत. पण भटांनीच कुठेतरी बसू म्हटल्यावर नाही म्हणणे शक्य नव्हते. म्हणून माझ्या साळ्याकडे-अनिल चांदेकरकडे मोर्चा वळवला. त्याच्याकडे पोहोचल्याबरोबर सौ. चांदेकरांना झुणका भाकर व पोळ्या करण्याचा हुकूम करुन भट बैठकीत एका बाजूला कागद पेन घेऊन बसले. एव्हाना रात्रीचे 10 वाजले. आमच्या मैफलीचे काय झाले ते आपण समजू शकता. थोड्याच वेळात त्यांनी ‘हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’ हा मतला मला दिला व चाल बसत गेली, तिकडे गझल पूर्ण होत गेली. रात्री दोन अडीच वाजता पूर्ण गझल लिहून मला कागद दिला व जेवण वाढायला सांगितले तो कागद हा :










आमची ठरलेली मैफल हुकली पण रात्र मात्र संस्मरणीय ठरली. या गझलने माझ्या प्रत्येक कार्यक्रमात दाद घेतली हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.
- औरंगाबाद, देगलूर, मानवत, नांदेड असा मराठवाड्याचा दौरा आटोपून परत नागपूरला निघालो असताना भटांनी नांदेडला एक तलवार व एक कुकरी विकत घेतली. ती सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. माझ्या दुर्दैवाने आमची एस.टी. बस मधल्या कुठल्यातरी थांब्यावर बंद पडली. एस. टी. बदलणे, त्यात सामान टाकून आसन मिळवणे या प्रकारात तलवार व कुकरी बंद पडलेल्या एस. टी. बसमध्येच राहिली. आमची बस व्हाया यवतमाळ नागपुर असल्यामुळे मी यवतमाळला उतरुन दुस-या बसने आर्णीला जाणार होतो. यवतमाळला मी बसमधून बॅग घेऊन उतरत असताना तलवार व कुकरी कुठे आहे असे भटांनी विचारले तसे मी सामान ठेवायची जागा पाहू लागलो व दोन्ही शस्त्र बंद पडलेल्या एस. टी. त राहिल्याचे लक्षात आले. ही गोष्ट मी भटांना सांगितली तसे भट मिश्किलपणे म्हणाले ‘‘कसा रे तू मराठा? साधी तलवार व कुकरी सांभाळता आली नाही!’’ मी क्षणभर विचार केला अन उत्तरलो ‘‘मी तर तलवार अन कुकरीच गमावली तुम्ही तर अख्खी मराठेशाही गमावली !’’ यावर जोरजोरात हसत त्यांनी ‘‘क्या बात है!’’ असा प्रतिसाद दिला.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे दौरे आटोपल्यावर, पुण्यात ‘अशी गावी मराठी गझल’ नावाचा कार्यक्रम झाल्यावर नागपुरातील रसिक मंडळींनी धनवटे सभागृहात माझा एकट्याचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला मी भटांकडे गेलो. बराच वेळ गप्पाटप्पा झाल्यावर कार्यक्रमाविषयी सांगून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यावर
‘‘मी काहून कार्यक्रमाले यावं? असा प्रश्न भटांनी केला.
‘‘माझा कार्यक्रम आहे म्हणून’’ मी.
‘‘तू कोन टिकोजी लागला का?’’ भट.
‘‘टिकोजी नाही पण तुमचा कोणी तरी लागतो ना?’’ मी.
‘‘तुले तं मालूम आहे का मी ऐ-या गै-याच्या कार्यक्रमाले जात नाही!’’ भट.
अशी गंमत सुरू असताना भटांनी कपाटातली ‘अंगूर की बेटी’ काढली.  मलाही आग्रह केला परंतु दिवसाढवळ्या ‘दारूकाम’ न करण्याचे ठरवल्यामुळे ‘नाही’ म्हणालो. लगेच भट म्हणाले ‘‘आता सांग तू का म्हंतं ते!’’ यावर मी, ‘‘पिदाडांशी जास्ती बोलत नसतो’’असे म्हणताच भट खो खो करुन हसायला लागले व ‘‘लयच चालू आहे रे तू!’’ असे म्हणून पुन्हा जोरजोरात हसायला लागले.
मराठवाडा दौ-याचे वेळी औरंगाबाद मुक्कामी लोकमत कार्यालयातील कार्यक्रम आटोपल्यावर दुसरे दिवशी सकाळीच भटांना गझलचा मुखडा सुचला तो मला दिला. मी चाल बसवायला लागलो व भट लिहायला लागले. चौथा शेर मला त्यांनी दिला परंतु वाचल्यानंतर त्याचा अर्थ उमगायला वेळ लागला. म्हणून मी भटांना म्हटले ‘‘हे शेर गझल मध्ये ठेवू नका, कारण याचा अर्थ पटकन ध्यानात येत नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे शेर वाचला की ऐकणा-याला पटकन कळायला हवा. यावर भट म्हणाले ‘‘कवी कोण आहे? मी का तू?’’ तू आपलं काम कर’’ त्यावेळी मी चूप बसलो. या प्रसंगानंतर काही महिन्यांनी पुण्याला कार्यक्रम होता. आम्ही भटांच्या सासुरवाडीत सदाशिवपेठेत मुक्कामी होतो. कार्यक्रम सायंकाळी असल्यामुळे दुपारी घरीच मैफल जमली. त्यावेळचे सर्व नवोदित गझलकार याप्रसंगी उपस्थित होते. ‘‘मी असा त्या बासरीचा सूर होतो, नेहमी ओठांपुनी मी दुर होतो’’ ही गझल गायला सुरवात केली. यमनमधील या बंदिशीत दुसरा शेर सादर करताना दोन्ही मध्यमांचा वापर केला. गझल संपल्यावर भट म्हणाले ‘‘तो दुस-या शेरात तू कोणता सुर लावला तो काही जमल्यासारखा वाटला नाही’’ माझ्या मनात औरंगाबाद खदखदत होतेच. मी लगेच म्हणालो ‘‘बावाजी संगीतकार कोण आहे? मी का तुम्ही? भटांच्या लगेच लक्षात आले व म्हणाले ‘‘वा औरंगाबादकर!’’. आणि आम्ही दोघेही हसायला लागलो. सुरेश भटांमुळे मी मराठी गझल गायक झालो असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्यामुळेच मला अमरावतीत झालेल्या डॉ. नईमभाईंच्या चर्चेत सहभागी होता आले. इस्लामपूर्व गझलेचा शेर नईमभाईंनी सुरेश भटांना काढून दिला या ऐतिहासिक प्रसंगाला उपस्थित राहू शकलो. भटांमुळेच सुरवातीच्या काळात वर्धेसाठी शेतकरी मेळाव्यात श्री शरद पवारांसमोर कार्यक्रम करु शकलो. बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना नागपूरच्या अधिवेशन काळात रा. सु. गवई यांचे कॉटेजवर अंतुले, जवाहरलाल दर्डा प्रभृतींसमोर कार्यक्रम सादर करु शकलो. सत्कारही स्वीकारु शकलो. शाहीर सुरेशकुमार वैराळकर या प्रसंगी हजर होते. 1982 पासून तिकीट लावून माझे कार्यक्रम सुरू झालेत याचे श्रेयही भटांनाच आहे. ते मला तेव्हाच ‘गझलनवाज़’ म्हणायचे परंतु मेहदी हसन, गुलाम अली, जगजित सिंग सारख्या मंडळीसमोर आपण क:पदा्र्थ असल्यामुळे स्वत:ला ‘गझलनवाज़’ म्हणवून घेणे मला पटले नाही. त्याची गरजही वाटली नाही, वाटत नाही.
आठवणींच्या गराड्यात अनेक आठवणी पिंगा घालीत आहेत. एक महत्वाची आठवण नमुद करुन संपवितो. मिरजेतील नवरात्र संगीत महोत्सवातील कार्यक्रम आटपून महाराष्ट्र एक्सप्रेसने धामणगाव-यवतमाळ असा प्रवास करुन आर्णीला साडेचार वाजता पोहोचलो. तर घरी भटांची तार येऊन पडलेली ‘‘ताबडतोब निघुन अमरावतीला ढवळेंकडे यावे, हृदयनाथ मंगेशकर येत आहेत’’ ही घटना 1981-82 च्या दरम्यानची असावी. त्यावेळी आर्णीहून बाहेरगावी जाण्यासाठी एकही बस नव्हती. पदर पसरून कशीबशी एकाजणाची मोटारसायकल मिळवून वासुदेव भगत या जिवलग मित्राला सोबत घेऊन अमरावतीकडे निघालो. यवतमाळच्या थोडे पुढे जात नाही तो मोटारसायकल बंद पडली. भगत हे कसलेले मेकॅनिक असल्यामुळे कसेबसे सकाळपर्यंत अमरावतीला पोहोचलो. भटांची भेट झाल्यावर रात्री ढवळेंकडे हृदयनाथांसोबत जेवण व माझी मैफल असा कार्यक्रम असल्याचे कळले. सायंकाळी 6 वाजता मंगेशकर आले. सगळ्यांशी गप्पा झाल्यावर भटांनी मला व हृदयनाथांना एका खोलीत नेऊन बसवले. आमची दर्जेदार‘व्यवस्था’करून दिली व ‘चलने दो’ चा इशारा करुन खोलीतून निघून गेले. आम्ही दोघांनी मस्तपैकी आस्वाद घेत संगीत नियोजन, बंदिशी, ध्वनीमुद्रण यावर एक दीड तास चर्चा केली. नंतर सोबत जेवण केले. मैफल जमवली. हृदयनाथ मंगेशकरांसमोर गाणे म्हणजे तोंडाचा खेळ नव्हता. परंतु भटांनी अतिशय समजुतदारपणे आमची अगोदरची ‘‘बैठक’’ जमविल्यामुळे मैफल जमवायला त्रास झाला नाही. मैफिलीनंतरही रात्री दोन वाजेपर्यंत मी आणि मंगेशकर गप्पा मारीत बसलो होतो. हे सगळे भटांमुळेच होऊ शकले.
सर्व सामान्यापेक्षा वेगळं रसायन कवटीत घेवून जन्मलेले एक अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश भट होय. त्यांच्यामधे नेहमी एक कवी, तत्त्वज्ञ वावरायचा त्याच वेळी एक क्षणात रागावणारं, क्षणात गळ्यात पडणारं, क्षणात हसणारं, क्षणात आकांडतांडव करणार अवखळ निरागस व हट्टी मूलही त्यांच्यात हुंदडत असायचं... त्यांच्यातली मिश्किली भल्याभल्यांना कोड्यात टाकायची. सुरेश भटांच्या सहवासातील अनेक वर्षात मी त्यांच्या स्वभावाची जवळ-जवळ सर्व रुपे पाहिली. त्यातील काही रुपे आजही स्वच्छपणे समोर दिसतात. त्यांचे नवोदित गझलकारांना पोटतिडकीने मार्गदर्शन करतांनाचे आणि त्यांच्या आकाशवाणीवरील 65 च्या कराराकरीता केंद्र निदेशकाशी वाद घालतानाचे भट... नवीन गझल लिहीणा-यांमध्ये एखादा फार जवळीक निर्माण करणारा जर परिस्थितीने गांजला असेल तर त्याला स्वत: व आमच्या सारख्यांना सांगून धान्य पुरवणारे कुटूंबप्रमुख भट... एखाद्याचा मुद्दा पटला नाही तर तोंडावर सांगण्याचा सडेतोडपणा व आवडला तर आवर्जून सांगणारे भट... जगण्यातील बिनधास्तपणा व त्यामुळे घडणा-या प्रसंगाला तोंड देणारे बिनधास्त भट... एखाद्या विषयी कसा का होईना गैरसमज झाला तर कोणी कितीही आणि कसेही समजाऊन सांगितले तरी न ऐकता गैरसमज कायम ठेवणारे एक वेगळे भट... जेवताना किंवा काही खाताना इतरांकडे लक्ष न देता ‘‘पार्वती पते हरहर महादेव’’ करणारे लहान मुलासारखे भट... जेवणातील एखादा पदार्थ आवडला तर बनविणा-या सुगृहिणीचे/बल्लवाचार्याचे मनापासून कौतुक करून त्यांची रेसिपी समजून घेणारे खवय्ये भट... भल्या-भल्यांशी पंगा घेणारे भट... स्वत:च्या मुलाच्या- हर्षवर्धनच्या भविष्याच्या काळजीने व्यथित होणारे भट... सामाजिक कार्यात पोटतिडकीने भाग घेणारे भट... सामाजिक, राजकीय व्यंगावर रोखठोकपणे लिहिणारे भट... जेवणापेक्षाही चहा-तंबाखूवर जास्ती प्रेम करणारे भट...सुरेश भटांची अशी कितीतरी रूपं माझ्या स्मरणात  अजूनही दरवळतात.
आमची ही मैत्री म्हणजे एक वेगळं विश्व होतं आम्ही भांडायचो, वाद व्हायचे, प्रसंगी अबोला-रुसवा सुद्धा व्हायचा. शेवटी शेवटी मतभेदांमुळे थोडा दुरावा येत गेला पण मैत्री शेवटपर्यंत टिकून राहिली. त्यांच्या कडू-गोड आठवणी आणि स्वरबद्ध केलेल्या त्यांच्या चाळीस गझला व दहा गीते आजही मला साथ देत आहे. वरून फणसासारखा भासणा-या सुरेश भटांचे अंतरंग अच्छाअच्छांना कळले नाही.केवळ त्यांच्या खाण्या-‘पिण्याची’ चवीने चर्चा करणा-यांना ते कधी कळणारही नाही.या फणसातील गोड गरे चाखण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

सुधाकर कदम

सी-१-सी/१३,गिरीधर नगर,वारजे-माळवाडी,पुणे-५८. मोबा.९८२२४००५०९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: