Related Posts Plugin for WordPress, Blogger...

२७ सप्टेंबर, २००९

‘आम्ही’ : पुरुषोत्तम पाटील


कविवर्य सुरेश भटांनी आपल्या काव्यलेखनाच्या प्रथमार्धात ज्या एकापेक्षा एक सरस गझला दिल्या, त्यापैकी 'आम्ही' ही एक अविस्मरणीय गझल आहे. 'कविता : विसाव्या शतकाची' या ग्रंथाच्या संपादकांनी त्यांच्या काव्याविषयी जे मूल्यमापन केले आहे, त्याच्याशी कुणाचे दुमत होईल, असे नाही. 'सुरेश भटांनी मराठी गझलेचे पुनरुज्जीवन केले नाही, तर तिला नवी कांती दिली. नवे चैतन्य दिले. भटांच्या कवितेचे नाते माधव जूलियन किंवा मर्ढेकर-मुक्तिबोध यांच्या कवितेशी नसून, केशवसुत-कुसुमाग्रज, श्रीकृष्ण पोवळे यांच्या कवितेशी आहे.' त्यांची कविता 'रोमँटिक, राजकीय-सामाजिक' असल्याचे नोंदवून, तिच्या उदंड लोकप्रियतेचे रहस्य 'गेयता, प्रासादिकता, विरोधाभास, परिचयाच्या वस्तूंना दिलेले प्रतीकरूप' यांत असल्याचे संपादकांनी स्पष्ट केले आहे.

'मी' नव्हे 'आम्ही'


या 'आम्ही'चा प्रथमोद्गार कविवर्य केशवसुतांनी काढला. त्यांची 'आम्ही कोण?' ही कविता आठवावी. त्यात व्यक्त झालेला 'अहं'कार वैयक्तिक नव्हता, हे तर स्पष्टच आहे. एकूण साऱ्याच प्रतिभावंतांचे आणि विशेषतः कवींचे आपल्या प्रतिभाशक्तीच्या सामर्थ्याचे, सार्थ आत्मविश्वासाचे ते गौरवपूर्ण प्रतिज्ञापत्रच होते!
या आत्मविश्वासाची जात सुरेश भटांच्या 'आम्ही'ची देखील आहे; पण हे 'आम्ही' वेगळे आहेत.
समाजाच्या कल्याणासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सारे आयुष्य ओवाळून टाकणारे सामाजिक क्रांतिकारक, देशभक्त या 'आम्ही'त कवीला अभिप्रेत आहेत. असा अपार त्यागमय जीवनाचा वसा घेऊन येणाऱ्या महानुभावांनीच या मानवी जीवनाला आधार दिला आहे. 'जगाच्या कल्याण | संताच्या विभूती'मधले संत आध्यात्मिक कृतार्थता अनुभवणारे, समयज्ञ असे असले, तरी भटांच्या 'आम्ही'मधले जीवनवीर हे सतत 'संघर्षरत' आहेत. 'वैयक्तिक सुखां'चा त्याग हा या दोन्ही जीवनानुभवांतील समान धागा आहे.

सुखाशी भांडतो आम्ही

या गझलेच्या सुरुवातीलाच आपली जीवनधारणा अगदी खणखणीत शब्दांत कवीच्या 'आम्ही'ने व्यक्त केली आहे.

जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही;
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही.


बहिणाबाई चौधरींनी म्हटले होतेच--'दुःखाला होकार अन् सुखाले नकार'; पण इथे नुसता दुःखाचा होकार-स्वीकार नाही. एखाद्या नशा पेयाप्रमाणे जगातल्या दुःखाचे प्राशन करावे, अशी धुंदी आहे. 'झोकुनी' या शब्दाने ती व्यक्त झाली आहे. सुखही नकोच आहे. त्याच्याशी भांडणच. 'झोकुनी' आणि 'भांडण' या शब्दांची योजना आपल्या भूमिकेतील तीव्रता व्यक्त करण्यासाठी आलेली आहे. त्यापुढच्या ओळीत 'स्वतःच्या झाकुनी भेगा | मनुष्ये सांधतो आम्ही' ही भूमिका तीव्रतर झाली आहे. जगाची दुःखे पचवताना चिरफाळून जाणे, फाटून जाणे अपरिहार्य असते; पण या जखमा झाकून माणसा माणसांत सौहार्द निर्माण करण्यासाठी धडपडावे लागते. हीच ती 'सांधण्या'ची क्रिया. इथेही 'भेगाळणे' व 'सांधणे' विरोधन्यासाने आलेले. भेगाळण्याची यातना स्वतःसाठी आणि 'सांधण्या'चे कौशल माणसा माणसांतील भेदभाव, वैर मिटवण्यासाठी

सर्वस्व त्यागाची जिद्द

हे व्रत तसे फार कठीण आणि कठोर आहे. बोलणारे खूप, वल्गनांना अंत नसतो; पण प्रत्यक्षात कृती मात्र शून्य, असाच प्रकार बहुतांशी आढळतो. शब्दांना किंमत यायची असली तर 'बोले तैसा चाले'ची कृती घडावी लागते. तुकोबांचाही तो आग्रह होता. महात्मा गांधींच्या शब्दांत आणि कृतीत असा समवाय होता. म्हणून त्यांच्या मोजक्या शब्दांनाही वज्रप्रहाराचे सामर्थ्य लाभे. इ. स. १९४२ च्या चळवळीतील 'करा किंवा मरा' (Do or die) हा आदेश सर्व भारतभर स्वातंत्र्यलढ्याचा वणवा पेटवणारा ठरला, हे आठवते. कवी म्हणतो-

फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे;
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही.


शब्दाच्या सत्याचे दिव्यत्व अनुभवायचे असेल, तर स्वतःचा संसार जाळून टाकावा लागतो. भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामात अनेकांनी आपली घरेदारे सोडली, मुलाबाळांचा वियोग स्वीकारला. भूमिगत झाले. काहींना तुरुंगवास लाभला. देशासाठी तुरुंगात जावे, अशीच मनीषा अनेकांची होती.

तुरुंगातील स्वप्नांची अम्ही धुंडाळितो स्वप्ने;
वधस्तंभासवे दाही दिशांना हिंडतो आम्ही.


काहींची ही स्वप्ने साकार झाली. काहींना अधिक छळवादाला तोंड द्यावे लागले. काहींना फाशी दिले गेले. देशासाठी पत्करलेल्या या मरणमिठीतही सार्थकतेच्या आनंदाचा जल्लोश होता. केव्हाही मरणाला सामोरे जावे लागणार, यासाठी मनाची तयारी देशभक्तांनी आधीपासूनच करून ठेवली होती. जणू वधस्तंभ बरोबर घेऊन फिरण्यासारखेच हे होते. (ख्रिस्तालाही आपला क्रूस स्वतःलाच वाहून न्यावा लागला होता.) पण त्यात अवघडलेपण नव्हते. धिटाई होती. अभिमान होता. हे हौतात्म्य वाया जाणार नाही, याची खात्री होती.
सर्वस्वत्यागाच्या जिद्दीच्या या आविष्काराने मन भारावून गेल्याशिवाय राहत नाही. हे सारे कशासाठी? या संघर्षाचे प्रयोजन काय? मला 'नर्मदा बचाव आंदोलना'च्या मेधा पाटकरांच्या आवाहन-पत्रकात त्यांनी उद्धृत केलेल्या काव्यपंक्तीचे स्मरण होते.

"इसलिए राह संघर्ष की हम चुने
जिंदगी आँसुओं में नहाई न हो|
शाम सहमी न हो, रात हो न डरी
भोर की आँखे फिर डबडबाई न हो|"


'आम्ही'च्या नायकांनाही हेच करायचे आहे ना?
माणुसकीचे व्यापक अभियान
'आम्ही'चे कार्यक्षेत्र मर्यादित नाही . कुठेही माणुसकीच्या सेवेचे पवित्र काम करता येते. त्यांच्या दृष्टीने ते तीर्थक्षेत्रच होते.

कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला;
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही.


या ओळींतून कवीने पंढरीच्या विठोबाची आठवण करून दिली आहे. वास्तवातील विठोबा चंद्रभागातीरी, पंढरपुरी वास्तव्य करतो; पण 'आम्ही'चे नायक म्हणतात-- 'की जिथे आम्ही आमच्या कार्याचा झेंडा रोवतो, तिथेच विठोबा येतो-नाचतो. विठूचे वास्तव्य आणि चंद्रभागेचा किनारा असा आमचा संन्निध आहे. धार्मिक क्षेत्रात भक्तीच्या जिव्हाळ्याला जेवढे स्थान आहे तेवढेच समाजसेवक, देशभक्त यांच्या अपार निष्ठेला समाजजीवनात आहे, असेच कवीला सुचवायचे असावे. कवी पुढे म्हणतो--

दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी;
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही.


इथे भेदभाव नाही. माणसे कोणतीही असोत. कुठलीही असोत. त्यांचे जीवन आम्ही सुखमय, सुंदर करतो. त्यांचे कोंदटलेपण नाहीसे करतो. विशाल आभाळ देतो, तेही सोनेरी- असा 'आम्ही'चा सार्थ दावा आहे. 'सोनेरी आकाशा'ची औचित्यपूर्ण प्रतिमा वापरून, कवीने संबंधित आशय अधिक परिणामकारक केलेला आहे. प्रत्येक वस्त, मानवी अस्तित्वाचे प्रत्येक ठिकाण आनंदनिधान व्हावे, ही असोशी या प्रयत्नांमागे आहे. ज्ञानेश्वरांच्या 'पसायदाना'तही असेच व्यापक आवाहन आहे. 'सर्व सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः|' अशी ही औपनिषदिक प्रार्थना आहे. तिच्याशी हे 'आम्ही ' आपल्या कार्याद्वारे एकरूप झालेले आहेत. याही पुढे जाऊन 'आम्ही' उज्ज्वल, आशादायक भविष्याच्या उषःसूक्ताची लकेर छेडतात. ती मधुर आहे. 'हाका उषेच्या वाटतो आम्ही'! 'उषेच्या हाका' या अभिनव प्रतिमेने केवढे सौंदर्य त्यांच्या भूमिकेला बहाल केले आहे! रात्र संपली आणि आता ही सकाळी साद आम्ही घालतो आहोत. येणाऱ्या प्रकाशाची ग्वाही देत आहोत. सर्वत्र लख्ख उजाडणार आहे., याचा विश्वास देत आहोत. अशी आश्वासक सूचना 'उषेच्या हाका'तून मिळते आणि या हाका वाटणारे हात मूर्तिमंत आत्मविश्वास असलेल्या 'आम्ही'चे आहेत!


नाते नव्या पिढीशी

'आम्ही'च्या माणुसकीला व्यापक अभियानाची कदर सध्याच्या चालू पिढीला नाही, याची कुरतडणारी खंत आणि नव्या पिढीबद्दलचा आशावाद व्यक्त करणारे असे कवितेचे शेवटचे कडवे आहे.

जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा;
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही.


तसा 'भूतकाळ' गतप्राण झालेला आणि 'वर्तमान' जाणूनबुजून आंधळा आणि बहिरा झालेला आहे. ज्या जिद्दीने आणि त्यागमय वृत्तीने आम्ही 'चागल्या'साठी संघर्ष केला, तिकडे आजच्या पिढीने दुर्लक्ष केले आहे, याची खंत नाही म्हटले तरी वाटत राहतेच. वर्तमान पिढीची ही बधिरता, संवेदनशून्यता अस्वस्थ करणारी. तरीही ज्याबद्दल निश्चित आशा वाटावी, अशी एक गोष्ट आहे. ती म्हणजे उगवती पिढी, नवी तरुण पिढी. उत्साहाने सळसळणारी. तेजस्वी! कवीच्या शब्दांत 'विजा घेऊन येणारी' तिच्याशी संवाद साधायचा. मनातले बोलायचे. कारण आपला त्यागाचा वारसा तीच समर्थपणे सांभाळील, याची खात्री 'आम्ही'ना वाटते.
सुरेश भटांच्या निवडक उत्तमोत्तम गझलांपैकी 'आम्ही' ही एक आहे. तिच्यातील आशय मनावर आदळताना ठिणग्या उडतात. गझल असल्यामुळे तिची बांधणी कमालीची रेखीव; पण बांधणी वाटू नये एवढा सहज-स्वाभाविक आविष्कार. विरोधन्यासाचा परिणामकारक वापर. या सर्व विशेषांमुळे रसिकांच्या मनाचा ती सहज कब्जा घेते.

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ
सीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP