१३ नोव्हेंबर, २००९

आशीर्वाद : गुरुवर्य पुरुषोत्तम कासलीकर

गुरुवर्य पुरुषोत्तम कासलीकर यांना साथ करतांना सुधाकर कदम

सुधाकर बद्दल लिहितांना मला बालवयातील सुधाकर आठवतो आणि त्या जुन्या आठवणीने मन भरुन येते़.
सुधाकरचे वडील श्री पांडुरंग पंत कदम हे त्यावेळचे एक चांगल्यापैकी संवादिनी (हार्मोनियम) वादक आणि संगीत कलेचे अव्वल दर्जाचे जाणकार! माझ्यावरील त्यांचा लोभ म्हणजे जणू बंधू प्रेमच!सुधाकरला बालपणीच माझ्याकडे सोपवून एक दर्जेदार गायक म्हणून त्याला तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आणि मी ही ती आनंदाने स्वीकारली़.
संगीताचे प्राथमिक धडे सुरू झाले.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या नुसार हा छोटा बालक या क्षेत्रात छान चमकू लागेल, असे सर्वांनाच वाटू लागले़.
लहानपणी त्याचा बराच वेळ माझ्या घरीच जात असल्यामुळे याच वयात त्याचे कान संगीताच्या दृष्टीने छान तयार झालेत़. आणि अल्पावधीतच त्याने संगीत विशारद ही पदवी परीक्षा उच्च श्रेणीने उत्तीर्ण केली़. आनुवंशिक रीतीने वडिलांचे सुंदर हार्मोनियम वादन त्याच्याही हातात आले. आणि यामुळे तो या क्षेत्रात आधकच लोकप्रिय होऊ लागला़.
तथापि, त्याला ‘ग’ ची बाधा कधीही होऊ शकली नाही हे विशेष! मला चांगलं आठवतं; माझी सर्वच काम तो अगदी निःसंकोचपणे करीत असे़. त्याच्या वागण्यात-चेहर्‍यावर नाराजी - कंटाळा मी कधीच बघितला नाही़.
कामाची सचोटी, सत्यता, विश्वास आणि वागण्यातील प्रामाणिकपणा या त्याच्या वाखाणण्यासारख्या गुणामुळे तो आमच्या घरी सर्वच वडील मंडळींचा आवडता होता़.
माझ्या सोबत तर तो सावली सारखा राहत असे़. त्याच्या गुरुसेवेला तोड नाही; हे एकच वाक्य त्याचा गौरव दर्शविण्यास पुरेसे आहे़.
सतत संगीत कलेचा ध्यास, माझ्या गायनाचे वेळी ‘संवादिनी’ची बेलामूम साथ, सवड मिळेल तेव्हा उत्तमोत्तम बंदिशीबाबत चर्चा, नाट्यगीतांची खास तालीम हे त्याचे गुण त्यावेळी इतरांकरिताही अनुकरणीय होते़.
अर्थात, त्यावेळचे वातावरणही अशा कलाकारांना पोषक असे होते़. थोडक्यात म्हणजे आम्हा सर्व संगीत प्रेमींचे एक कौटुंबिक वातावरण होते़. गरिबी, मानपान, द्वेष, कटूता या सारख्या वाईट गोष्टींना त्यात थारा नसे़.एक उच्चस्तरीय कलाकार होण्याकरिता अशा प्रकारच्या सशक्त वातावरणाची नितांत आवश्यकता असते़.
गायन, वादन या प्रमाणेच संगीत दिग्दर्शक म्हणूनही सुधाकरने उत्तम लौकिक प्राप्त केला; हे खचितच भूषणावह आहे़.
मराठी गझल-गीतांना मोहक आणि अनुरुप अशा चाली देऊन तो गझल प्रेमीजनांची मन आनंदित करितो़, जिंकून घेतो़. त्याचा हा कार्यक्रम म्हणजे रसिक मंडळींना एक पर्वणीच असते़.शालेय विद्यार्थ्यांकरिता सुलभ आकर्षक आणि मधुर चालींची गीते तयार करुन त्याने या शैक्षणिक क्षेत्रात अतिशय अनमोल असे कार्य केले आहे़.
गोड, मनमिळावु स्वभाव, कलेची सचोटी, जिद्द, कलाकारांबद्दलचा नितांत आदर, मित्र-परिवार, सतत कष्ट करण्याची तयारी ह्या त्याच्या अनुकरणीय गुणांमुळे तो आज पुण्यासारख्या मोठ्या आणि आदर्श शहरात एक मान्यवर कलाकार म्हणून संगीत क्षेत्रात आपले स्थान सुशोभित करीत आहे. याबद्दल त्याचे कौतुक करण्यास शब्द अपुरे पडावेत! या गौरवबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून या क्षेत्रात असेच बहुमोल कार्य करण्यास परमेश्वर त्याला उदंड आयुरारोग्य देवो ही ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: