.jpg)
महाराष्ट्रातील आद्य मराठी गझल गायक म्हणून कवि श्रेष्ठ सुरेश भटांनी ज्यांना नावाजले; त्या सुधाकर कदमांनी विद्यार्थ्यांना गुणगणतं करण्यासाठी ‘सरगम’ हे शालोपयोगी विविध गीत प्रकारांच्या स्वरलिपीचे पुस्तक तयार केलेले आहे़. गीतमंच, एक सूर एक ताल, कविता गायन वगैरे अनेक उपक्रमातून मार्गदर्शन करता करता त्यांनीही विद्यार्थ्यांकरीता सुंदर-सुंदर स्वररचना तयार केल्या़. त्यात बालगीता पासुन तर समुहगीतापर्यंत सर्वच प्रकार आहेत़. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच शाळांमधून ही गाणी समूहाने गायिल्या जात आहे़त; ही त्यांच्या यशाची खरी पावती होय़.
विद्यार्थ्यांना सहज गाता येतील अशा सरळ, सोप्या व गोड स्वररचना या पुस्तकात असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व संगीत शिक्षकांपर्यंत जर हे पुस्तक पोहचले व त्यांनी जर ह्या रचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविल्या तर ही गाणी तमाम विद्यार्थी एका सुरात व एका तालात गाऊ लागतील यात वाद नाही़.
विद्यार्थ्यांवर राष्ट्रीयत्वाचे संस्कार घडून अशी गाणी समुहाने गायिल्या जावी याकरीता केलेला हा प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे़. कारण आपल्या देशात एकत्र जमून समूहाने गाणी म्हणण्याचा प्रघात फार कमी आहे़. याला कारण अशी गाणी आणि त्यांची स्वरलिपी यांचा प्रसार कसोशीने केला जात नाही़. शाळा, संगीत वर्ग, सांस्कृतिक मंच यांचेही प्रयत्न एका दिशेने कधीही होत नाहीत़. अशा प्रयत्नांना एकसूत्रता आणण्यात जर हे पुस्तक यशस्वी झाले तर मला अधिक आनंद होईल़.
(सुधाकर कदमांच्या शालोपयोगी गीताच्या स्वरलिपीच्या पुस्तकातील संगीतकार यशवंत देव यांची प्रस्तावना - १९९५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा