
गझल सम्राट सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी महाराष्ट्राचे आद्य मराठी गझल गायक म्हणून त्यांचा गौरव केला़. स्वतः सुरेश भटांनी स्वहस्ताक्षरात महाराष्ट्राचे ‘मराठी मेहंदी हसन’ म्हणून ३० मार्च १९८१ रोजी शेरा देऊन स्वाक्षरी केली़.सुरेश भटांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त २००९ साली ‘गझल गंधर्व’ या किताबाने पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़. नरेंद्र जाधव यांचे हस्ते ज्यांना सन्मानित करण्यात आले़. मराठी गझल गायकी महाराष्ट्रभर रुजविण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा कलावंत म्हणजे आर्णी गावातील साधा संगीत शिक्षक सुधाकर पांडुरंग कदम़.
१९८१-८२ च्या दरम्यान ‘अशी गावी मराठी गझल’ या तीन तासांच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने कदम यांच्या प्रतिभेची आणि गझल प्रेमाची दखल सुरेश भटांसहित महाराष्ट्राने घेतली़. हिंदी-उर्दू गझल गायकीचा हमखास यशाचा मार्ग सोडून मराठी गझल मैफलींनी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला़. प्रारंभीच्या काळात त्यांच्या अनेक मैफलींचे निरुपण स्वतः सुरेश भटांनी केले़. प्रा़ सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी या काळात पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत कदमांचे कार्यक्रम करण्यात पुढाकार घेतला़. गझल गाताना शब्दप्रधान गायकीला महत्व असते़. सांगीतिक रचनेत शब्दांचे अर्थ उलगडून सांगणारी सुधाकर कदम यांची शैली लोकप्रिय आहे़. छोटा गंधर्व, पंडित जितेंद्र आभषेकी यांचा सहवास त्यांना लाभला़. शौनक आभषेकी यांनी कदमांनी स्वरबध्द केलेल्या रचना अत्यंत तन्मयतेने गायिल्या आहेत़.
कळंब तालुक्यातील दोनोडा येथे १९४९ साली शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला़. प्राथमिक शिक्षण दोनोडा येथे तर पाचवीपासूनचे शिक्षण यवतमाळ येथे झाले़. तबल्याचे शिक्षण दादा पांडे यांचेकडे तर संवादिनीचे धडे वकिलांनी दिले़. पंडित पुरुषोत्तम कासलीकरांकडे गायनाचे शिक्षण घेतले़.हार्मोनियम वादक म्हणून भाग्योदय कला मंडळाच्या ‘शिवरंजन’ ऑर्केस्ट्रात प्रवेश़. जिल्ह्यातील पहिला ऍकॉर्डिअन व मेंडोलिन वादक म्हणून प्रसिध्दी़. १९७२ मध्ये संगीत विशारद पदवी प्राप्त केली. आणि त्याचवर्षी आर्णी येथील श्री म.द. भारती विद्यालय येथे संगीत शिक्षक म्हणून ते रुजू झाले़. शिक्षक व्हायचे नाही, अशी प्रतिज्ञा करुनही नियतीने त्यांना आयुष्यभर मुलांना सारेगम शिकवायला लावले़. गावाचा सांस्कृतिक विकास करण्याचा सर्व ठेका आपलाच आहे, या भावनेतून त्यांनी आर्णीला अनेक उपक्रम सुरु केले़. गांधर्व संगीत एकांकिका स्पर्धा, मराठी गीत-गझल गायन स्पर्धा, कलावंत मेळावे, आकाशवाणी, सांस्कृतिक संध्या, हिंदी-मराठी कवि संमेलने, गायन-वादन कार्यक्रमांचे आयोजन करून १९७२ ते २००३ अशी ३१ वर्षे सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध करण्याचा प्रयत्न केला़.
एवढे सगळे उपदव्याप कमी पडले असावे म्हणून की काय त्यांनी पत्रका्रितेच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटविला़. आर्णी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले़. ‘फडे मधूर खावया’ हा त्यांचा स्फूट लेखसंग्रह प्रसिध्द झाला असून शालोपयोगी गीतांच्या स्वरलिपीचे ‘सरगम’ नामक पुस्तकही त्यांनी छापले आहे’. यवतमाळ जिल्हा शैक्षणिक उठाव मोहिमेअंतर्गत इयत्ता पहिली ते दहावीच्या पाठ्यपुस्तकातील कविता स्वरबद्ध क्रून त्याच्या ‘झुला’ नावाच्या तीन ध्वनिफिती तयार केल्या. पुढे याच कवितांवर आधारित व्हिडिओ कॅसेटचीही निर्मिती केली़. महाराष्ट्रातील हा पहिला व एकमेव उपक्रम होता़
याशिवाय मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली ध्वनिफित ‘भरारी’ ‘अक्षरगाणी’, ‘अशी गावी कविता’ ‘भजनसुधा’, ‘समूहगान’ इत्यादी ध्वनिफिती प्रसिद्ध झाल्या आहेत़. २००३ साली स्वेच्छानिवृत्ती घेऊन सुधाकर कदम पुण्याला स्थायिक झाले आहेत़. स्वतः सोबत आपला मुलगा निषाद (तबला वादक) आणि कन्या भैरवी व रेणू (गझल गायिका) असे संपूर्ण कुटुंबच गझलच्या सेवेसाठी रात्रंदिवस झटत आहे़. पुण्यात आल्यावर पं. शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांच्यासह मुलीच्या आवाजात ‘अर्चना’ ही भक्तीगीतांची व ‘खूप मजा करू’ हा बालगीतांचा अल्बम त्यांनी काढला आहे़.
मराठी गझल आणि गायकीवरील सर्वंकष चर्चेसाठी मासिक गझलकट्ट्याचे आयोजन ते करीत असतात़. मराठी गझल गायकीतील या योगदानाबद्दल त्यांना शान-ए-गजल हा राष्ट्रीय स्तराचा पुरस्कार प्राप्त झाला आहे़. याशिवाय जेसीजचा राज्यस्तरीय विशेष तरुण व्यक्तिमत्व, समाज गौरव, मोतीलाल बंग स्मृती पुरस्कार, कलादूत, कलावंत महाकवी संत श्री विष्णूदास पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे़. फार मोठा माणूस बनायचे स्वप्न बघत जगणारा एक सामान्य शेतकरी पूत्र वादक, गायक, संगीतकार, पत्रकार, लेखक, कलावंत अशा विविध भूमिकांवर आपल्या कर्तृत्वाची मुद्रा उमटवितो. ही असाधारण गोष्ट आहे़. विविध वृत्तपत्रांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे़.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा