१३ डिसेंबर, २००९

मराठी गझल गाणारा मुस्लिम गायक _रफिक़ शेख : अजीम नवाज राही




हवेतला गारठा संपून उन्हे रखरखायला लागली की, मोगलकालीन तलावाच्या काठावर जयंत देशपांडे नावाचा रसिक तरुण रसवंतीचा व्यवसाय थाटायचा़. मध्यरात्रीपर्यंत रसवंतीवर गिर्‍हाईकांची झुंबड असायची़. रंगीबेरंगी लाईटच्या रोषणाईचे प्रतिबिंब जलाशयात पडायचे़. टेपरेकॉर्डरवर जगजितसिंग, चित्रासिंग, पंकज उधास, अनुप जलोटा, मेहदी हसन, गुलाम अली, कुंदनदास यांनी गायलेल्या गझला वाजायच्या़. कधी-कधी कॅसेटवर भाऊसाहेब पाटणकर यांची मराठी शेरोशायरीची मैफल सुरु व्हायची़. रसवंतीलगत असलेल्या बस स्टॅन्डवर त्याकाळी मी पानठेला चालवायचो़. रात्री पानठेला बंद करून मी रसवंतीवर येऊन बसायचो़. मनसोक्त मराठी, उर्दू गझलांचा आस्वाद घ्यायचो़. जयंत देशपांडे यांच्या रसवंतीमुळे गझल श्रवणाच्या कक्षा रुंदावल्या़, हे नमूद करताना गतकाळातल्या आठवणींचा पिसारा नजरेसमोर फुलतो़.
कविवर्य सुरेश भट यांच्या समर्थ लेखणीतून प्रसवलेल्या गझलांना खरा न्याय दिला आर्णी (जि़. यवतमाळ) येथील प्रख्यात मराठी गझल गायक सुधाकर कदम यांनी़. प्रसिध्द मराठी कवी कलीम खान यांच्या रसाळ सूत्रसंचालनाखाली या जोडगोळीचा ‘अशी गावी मराठी गझल’ हा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजला़. इंदूर, उज्जैन, नागदा मध्यप्रदेशातल्या या शहरांमध्ये झालेल्या सुधाकर कदम आणि कलीम खान यांच्या मैफलीच्या आठवणी आजही तिथल्या रसिकांच्या मनात दरवळत आहेत़. सुधाकर कदम यांच्या उगवतीच्या काळात मराठी गझलेच्या प्रांतात आणखी दोन नावे होती़ नाथराव नेरळकर आणि आशालता करलगीकर. हे दोन्ही गायक एकत्रितपणे गायचे़. सुरेश भटांनी कॅसेटच्या माध्यमातून जेव्हा आशालता करलगीकर यांचा आवाज ऐकला, तेव्हा त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, वा ! क्या बात है ! या बाईला ऐकलं पाहिजे ! नंतर मराठी गझलेच्या क्षितिजावर भीमराव पांचाळे यांचा उदय झाला़. अल्पावधीत मराठी गझलेच्या प्रांतावर या प्रतिभासंपन्न गायकाचे साम्राज्य पसरले़.
‘चंद्र नभी गझलेचा’ अलीकडे महाराष्ट्रभर गाजणारी प्रसिध्द गायक रफिक शेख यांची मराठी गझलांची ही मैफल़. आवाजात पाखरपहाटेत दवबिंदूत भिजलेल्या फुलांसारखी मृदुलता, झर्‍यांची नितळ रुणझुण़, निसर्गदत्त गोडव्याला खडतर रियाजाची जोड़. प्रसिद्ध कादंबरीकार राजन खान आणि गुणवंत पाटील यांच्यामुळे रफिक शेख यांची ओळख झाली.रफिक शेख मूळचे बेळगाव कर्नाटकचे़. मातृभाषा उर्दू अन्‌ राज्यभाषा कन्नड़. गायनाचा वारसा त्यांना वडीलबंधू बशीर अहेमद शेख यांच्याकडून मिळाला़. बशीर अहेमद शासकीय अभियंत्याच्या हु‌द्यावर, तरीही त्यांनी गायन कला जोपासली़. महाराष्ट्राच्या सरहद्दीवरचं बेळगाव शहर अन्‌ त्या शहराचं मराठीप्रेम सर्वश्रृत आहे़. रफिक शेख कविवर्य सुरेश भट यांच्या गझलांच्या प्रेमात पडले़. साकारला ‘चंद्र नभी गझलेचा’ हा सुश्राव्य कार्यक्रम़. मराठी गझलांच्या वेडापायी त्यांनी स्टेट बॅंकेतली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली़. मराठी गझलेच्या श्रद्धेपोटी पुणे शहराची वाट धरली़. रफिक शेख यांची मराठी गझलेवरची निष्ठा अन्‌ तिला महाराष्ट्राच्या घराघरांत पोचवण्याचा संकल्प बघता त्यांना पहिल्या सुरेश भट स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़. दोन वर्षांपूर्वी भरतनाट्य मंदिर पुणे येथे सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्या हस्ते समारंभपूर्वक त्यांना हा पुरस्कार देण्यात आला़.

ऐका त्यांच्या आवाजाची एक झलक :

डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची गझल _ तुझ्या गुलाबी ओठांवरती :



‘सच बोलता है मुंहपर चाहे लगे बुरा सा
किरदार उसका हमको लगता है आईना सा

कलियां अगर न होतीं लब्जो की मुठ्ठियो मे
होता ना जिंदगी का चेहरा कभी नया सा

रफिक शेख यांनी गायलेली माझी ही गझल जेव्हा इंटरनेटवर आली, तेव्हा त्यांच्या वेबसाईटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला़. गझलेवर प्रेम करणारे रसिक वेगवेगळ्या देशातले होते़. माझा मुलगा साहीलने इंटरनेटवर जेव्हा ही गझल मला ऐकवली, प्रतिक्रिया वाचून दाखविल्या, तेव्हा मन आनंदाने भरून गेले़. चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेला हा मधाळ आवाजाचा स्वरयात्री़. त्यांच्या गाण्यात एकसुरीपणा नाही़. विविध प्रकृतीच्या गझला पेलताना त्यांच्या आवाजाचे इंद्रधनुष्य अधिकाधिक खुलत जाते़. मराठी गझलेच्या वाटेवरुन खस्ता खात-खात मार्गक्रमण करीत वाटेतल्या गंडांतरांची तमा न बाळगता त्याची ध्येयनिष्ठ स्वरयात्रा सुरू आहे़. त्यांच्यासोबत आहे सुरेश भट, डॉ.श्रीकृष्ण राऊत,अरुण सांगोळे, प्रदीप निफाडकर, इलाही जमादार, बदीउज्जमा खावर यांच्या गझलांची शिदोरी़. मराठी गझलेच्या सेवेसाठी नोकरी ठोकरणार्‍या या ध्येयवेड्या गायकाला मदतीचा हात म्हणून वैदर्भीय गझल रसिकांनी रफिक शेख यांच्या ‘चंद्र नभी गझलेचा’ या मैफलीचे आयोजन करावे, ही माफक अपेक्षा़.

***********************************************************
संपर्क : अजीम नवाज राही : ९४२१३९६६६९

संपर्क : रफिक़ शेख : ९९७०२७९९६८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: