संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया ॥
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ॥
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ॥
गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेवर लिहिण्यापूर्वी हा अभंग आठवला. हा अभंग घेऊन लेखाची सुरूवात याकरिता केली, की यातील देवालयाचे रूपक मराठी गझलेला आणि मराठी गझलकारांना खर्या् अर्थाने लागू पडते. घर असो की देवालय कुठलीही इमारत ही एक रचना असते. रचनाशास्त्राचे नियम पाळूनच ती साकार होते. त्याच प्रमाणे गझल ही सुद्धा नियमांनी बांधलेली एक पद्धतशीर वृत्त रचना आहे. पहिला शेर हा तिचा पाया आहे. अन्य शेर हे तिच्या आशयाचे विस्तारलेले प्रशस्त आवार आहे. गझलेतले काही शेर हे खांबासारखे आधारभूत असतात. तर शेवटचा किंवा विशिष्ट शेर हा गझलेचा कळस वाटतो.जो आशयाची उंची गाठतो.
उर्दूतून गझल जरी आली असली तरी ती हिंदी भाषेचा प्रवास करत मराठीच्याही मोहात पडली. फार आधी माधव ज्यूलियन यांच्या सारख्या कवी श्रेष्ठांनी गझलेला मराठीचा पाया दिला पण गझलेचे आवार प्रशस्त केले ते कविश्रेष्ठ सुरेश भटांनीच. मराठी मुलखाच्या प्रशस्त आवारात गझलेचा मुक्त संचार होऊ लागला. प्रत आणि प्रमाण दोन्ही बाबतीत मराठी मुलुखात गझल लिहिली जाऊ लागली.
गझल हा वृत्तबद्ध रचनेचा काव्यप्रकार आहे. म्हणजे त्याला रचनेचे निश्चित नियम आहेत, शिस्त आहे, मर्यादा आहेत, बंधने आहेत. या सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळतांना 'मढे जैसे श्रृंगारिले' असे होता कामा नये. याचाच अर्थ नियमांच्या शिस्तीच्या, मर्यादांच्या
या काव्य प्रकारात चिंतनाची 'जान' ही असायला हवी.आणि आशयाचा 'प्राण' ही असायलाच हवा. असे झाले तरच गझल सजीव व आशयसंपन्नतेने देखणी होते.
गझलमें बंदिश- ओ-अल्फाज ही नही काफी
कुछ जिगर का खून भी चाहिए असर के लिए ।
असं जे गझलच्या बाबतीत म्हटल्या जाते ते उगाच नाही. गझलची प्रकृती आणि तिचे चैतन्य सांगणारा हा शेर आहे.
अभ्यासोनी प्रकटावे । नाही तरी झाकोनी असावे ।
समर्थ रामदास स्वामींचा हा सल्ला गझलतंत्र हाताळतांना खर्याश अर्थाने मार्गदर्शक ठरतो. कारण उर्मी, अभ्यास, प्रयोग आणि काहीकाळ साधनेत घालविण्याची तयारी व धैर्य ज्यांच्या स्वभावात असते;त्यांनीच गझलेच्या वाट्याला जावे. गझल लिहिण्याचे धाडस करावे. गझल लिहिणार्याम जाणकारांच्याही याच अपेक्षा गझल लेखनाच्या बाबतीत असतात. ज्याला स्वत:च्याच लेखनाकडे साक्षीभावाने पाहता येते. स्वतःच्या कवितेचा आस्वादकच नव्हे तर परीक्षक होता येते, समीक्षक होता येते, त्यानी गझलेच्या वाट्याला जावे. गझल त्यांना नक्कीच प्रसन्न होते.
केशवसुत कवितेला वीज म्हणतात. ते गझलेला अधिक लागू पडते. गझलेची शिस्त
नाकारणार्यां ना गझलेची वीज चटका तरी देते. नाही तर खाक तरी करून टाकते. म्हणून कदाचित हौसेने गझलेच्या वाट्याला जाणारी मंडळी असे झटके बसल्यावर, भ्रमाचे फुगे फुटल्यावर माघारी वळतात. गझलेचं गणित हे अंकगणिताहून अवघड असते. ते उर्मी आणि अभ्यास यांच्या समतोलाने साधते. कुठलीच तडजोड गझलेच्या शिस्तीला मान्य नसते. नसेलच जमत तर गझल लिहूच नये. साधनेने जमले तरच लिहावे, पण तडजोड आणि शिस्तीचा दंभ या दोघींना गझल नेहमीच नाकारते. गझलेला तंत्राची शिस्त नाकारणारा खपतच नाही. पायात रुतलेला काटा जसा निघेपर्यंत खुपावा तशी गझलेलाही बेशिस्त खुपत असते.
गझलेच्या बाबतीत वर उल्लेखिलेले अभिव्यक्ती तंत्राचे शासन आणि आशयातील अनुशासन जे फार थोडे मान्यवर पाळतात त्यातील एक दमदार नाव आहे श्रीकृष्ण राऊत. गझलेची तेजस्वीता ते आपल्या स्वयंभू प्रतिभेने पेलतात. अभ्यासोनि प्रगटण्याच्या शिस्तीत राऊतांची गझल तडजोड करत नाही. याचमुळे ज्ञानपीठ विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज श्रीकृष्ण राऊतांचे गझलेचे प्रभुत्व आपल्या पत्रातून मनमोकळेपणाने अधोरेखित करतात. तर पु. ल. देशपांडे 'तुम्हाला गझल रचनेची नस सापडली आहे' असं लिहून कळवितात. कवी ना. घ. देशपांडे आणि मंगेश पाडगांवकर पत्रातून विस्तृतपणे राऊतांच्या गझलेला दाद देतात.‘गुलाल आणि इतर गझला' या संग्रहातील आणि अन्य असंग्रहित गझला वाचल्यावर श्रीकृष्ण राऊतांच्या गझलातील आशयाची उंची, खोली आणि प्रशस्तता कळल्यावाचून राहत नाही.
आयुर्वेदात जे 'अर्काचे' महत्व तेच साहित्यात कवितेचे-गझलेचे महत्त्व आहे. सामान्य अनुभवाचे असामान्य चिंतन आटवून आटवून अचंबित करेल असा औषधी परिणाम करणारा आनंददायी, विस्मयकारक, तर कधी धक्कादायक सौंदर्यानुभव देण्याचे सामर्थ्य राऊतांच्या गझलेत ठायीठायी अनुभवायला मिळते.राऊतांच्या गझलेचा प्रत्येक शेर 'सूत्राचे' काम करतो. 'घागर में सागर' म्हणावा तसा त्यांच्या गझलेतील शेर असतो. एखादं भलं मोठं पुस्तक वाचून होणारा आनंद राऊतांच्या गझलेतील अनेक सुट्या शेरांमध्ये मिळ्तो. शेर जर इतका आशय संपन्न असेल तर पूर्ण गझलेची शक्ती किती स्फोटक, दाहक, मोहक असेल हे त्यांच्या गझलेच्या आस्वादकाला, रसिकाला नि समीक्षकाला नक्कीच जाणवल्या वाचून राहत नाही.
भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार प्रसिद्ध लेखक द.मा.मिरासदार यांच्या कडून स्वीकारताना
रोजच्या जीवनातील, जगण्यातील सौंदर्य, व्यंग, विसंगती, दंभ, सच्चेपणा, सुख-दुःख, विरह, मीलन, त्याग, भोग, आक्रमकता, समता-विषमता अशा सर्वच भावना राऊतांच्या गझलेच्या चिमटीत बंदिस्त होतात. त्यांच्या गझलेचा सुटा शेर स्वतंत्र कविता होण्याची क्षमता घेऊन जन्माला येतो. स्वतंत्रपणे उद्धृत करण्याचा मोह व्हावा असे अनेक 'सूत्रमय' शेर ‘गुलाल आणि इतर गझला’ मध्ये वाचायला मिळतात.
तशी कविता अनेक प्रकारात लिहिली जाते. पण जीवनदर्शन आणि जीवनविषयक तत्वज्ञान गझलेत फारच दाहक व मोहकपणे व्यक्त होते. गझलेचे हे विशेष म्हणता येईल.असे जीवनाविषयक तत्वज्ञान व जीवनदर्शन ज्यांच्या गझलातून ठळकपणे अभिव्यक्त होते, त्या गझलकारांमध्ये राऊत हे फार महत्वाचे गझलकार आहेत. दैनंदिन जीवनात अतिशय मिश्किल, विनोदी व अघळ-पघळ असणारे राऊत स्वभावतः अंतर्मुख प्रवृत्तीचे व प्रकृतीचे आहेत, अंतर्मुखतेच्या या अलवार मातीतून त्यांच्या गझलेचा मळा फुलतो. त्यांच्या गझलेचं प्रत्येक झाड माथ्यावर आशयाचे प्रशस्त आकाश पेलते.
जीवनातील प्रत्यक्षातला उन, वारा, पाउस, थंडी, वादळे, शांती, श्रृंगार-अंगार,योग-भोग, आसक्ती-विरक्ती कशालाच न टाळता राऊतांची गझल अनुभवाच्या तळाशी आणि अनुवादाच्या पृष्ठभागावर अतिशय सच्चेपणाने अभिव्यक्त होत राहते. म्हणूनच अनुभवाचे व त्यातून घडणार्याठ जीवनदर्शनाचे साक्षात्कार करविण्याची विलक्षणता राऊतांच्या गझलेत आहे.
अनुभव, आकलन, चिंतन आणि अभिव्यक्तीच्या सलगतेतून साकारणारी कलाकृती प्रत्ययकारी असते. प्रतीतीचा शब्द हा नेहमीच अनुभवाच्या ओठातून फुटतो. म्हणूनच तो परिणामकारक सिद्ध होतो.निर्मितीची घटना ही ज्यांच्या संबंधात घडते त्यांच्यासाठी ती सुखासुखी नसतेच.अनुभवातील मोहकता-दाहकता गझलेतून अथवा कुठल्याही कलाकृतीतून अभिव्यक्त होतांना तितक्याच तीव्रतेने उमटत असेल तर ती कलाकृती अस्सलच असते. रसिक वाचकाला शब्दांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवाचा अर्थातून भावानुभव देणे हे सोपे नसतेच मुळी. ते प्रतिभावंताला शक्य असते. निर्मितीपूर्वीचं भावसंक्रमण ज्याला तोलता येतं, पेलता येतं, त्या मोरपंखी किंवा अग्नीपंखी अनुभवातील रग-धग ज्याला अंगावर घेता येते. शिवाय अभिव्यक्तीसाठी लागणारी विलक्षण प्रतिभा ज्यांच्याकडे असते तोच ती तीव्रता कलाकृतीतून सहीसही देऊ शकतो.
कविता-गझल अशी कुणालाही कवेत घेत नाही. कुणीतरी कवेत घेण्यासाठीची योग्यता यायला आयुष्याची किंमत मोजावी लागते.थोड्या थोडक्यावर हा सौदा होत नसतो. खरे तर इथे सौदाच होत नसतो. अनुभवात आकंठ बुडणे आणि बुडण्यातलं समर्पण हीच किंमत मोजून दुसर्याइच्या अंतःकरणाचे दरवाजे उघडता येतात. या समर्पणभावामुळे राऊतांवर गझल प्रसन्न असावी. कवेत घेण्यासाठी उत्सुक असावी.
जी जाळते मला ती माझीच आग आहे.
आता कवेत घेणे कवितेस भाग आहे.
(डाग पृष्ठ 50)
जळण्यात राख होण्याच्या शक्यता जशा गृहीत असतात;तशाच जळण्यात उजळण्याच्या संभावनाही निश्चित असतात. प्रतिभावंतांच्या अशा जळण्यातून त्यांच्या प्रज्ञेचं सोनं उजळतं. अशा प्रज्ञेच्या सोन्याचे अलंकार होतात.त्याच गझला असतात,कविता असतात.
तथागत गौतम बुद्धांना ज्या तीव्रतेने साक्षात्कार झाला त्यामुळेच त्यांना खर्याय अर्थाने दुःखाचे अन्वय कळू लागले. आणि दुःखाचे अनन्वयही उमगू लागले.त्यातूनच सिद्धार्थ गौतमाचे बुद्धत्व बहरले.मात्र त्याआधी त्यांना दुःखाचे समग्र दर्शन झाले. दुःख हेच ऐहिक जीवनाचे अंतिम सत्य आहे हे कळल्यामुळेच गौतमाची बुद्धत्वाची साधना सफल झाली. काळ बदलला तरी प्रतितीचा पोत बदलत नाही. बुद्धाला सापडलेलं दुःखाचं अंतिम सत्य राऊतांनी नेमके आपल्या गझलेत शब्दांच्या चिमटीत पकडले आहे.
रे दुःख माणसाचे अंतिम सत्य आहे;
बाकी मवाळ सार्या् आहेत जाहिराती.
(सत्य पृष्ठ 60)
एकदा का सत्याचं दर्शन झालं की,मग दुःखविषयक पूर्वग्रहांचा गढूळ तळ स्वच्छ होतो. अंतर्बाह्य सत्यच पारदर्शीपणे दिसू लागते. दुःखाच्या किंवा एकूणच सत्याच्या स्वीकाराची स्वागतशील भूमिका तयार होऊ लागते. ती अशी-
दुःख सोबती असे मला
एकटा न ह्या घरात मी
(सोबती पृष्ठ 15)
दुःखाला इतक्या मैत्रभावाने पाहणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. कवीला ती जगण्याच्याच पातळीवर साधल्यामुळे गझलेतून तिचा समर्थ उद्घोष करता आला. मंदिराची एक एक पायरी चढावी. शेवटच्या पायरीनंतर सभा मंडपाचे प्रशस्त आवार असावे नि पुढे गाभारा असावा जिथे मन स्थिर आणि शांत व्हावे. अशा क्रमयोगाने या कवीला दुःख विषयक आकलन, चिंतन आणि दुःखाचा स्वागतशील स्वीकार मैत्रभावाने कळत जातो. यामुळे वाचकाच्या मनातही दुःखाविषयीचा तिरस्कार कमी व्हायला मदत होते. ही निखळ सुंदर गोष्ट आहे. दुःखविषयक प्रगल्भ चिंतनाचा हा शेर कवीची अन्वयाची कलाच सांगत जातो.
हे दुःख झेलतांना झालो विराट इतका,
पृथ्वीस तोलतो मी आता खुशाल हाती.
(वसा, पृष्ठ 48)
क्या बात है ! अशी मुखातून सहज दाद यावी, इतक्या ताकदीचं हे जीवनदर्शन आहे. आकलन आहे. पृथ्वीच्या तोलाचं वजन उचलणार्या ला दुःखाच्या मोलाचं वजन उचलण्यात कसले कष्ट ? अत्यंत मौलिक जीवनविषयक चिंतन कवी मांडून जातो.पृथ्वीपासून जसे जसे लांब जावे तसतसे तिचे अस्तित्व अणुपरमाणूहून लहान होते.मात्र दुःखाचे असे नसते. त्याला सोडता येत नाही. त्याच्यापासून लांब जाता येत नाही. त्याला नाकारता येत नाही. भगवंताने व्यापून दशांगुळे उरावे इतकं ते विराट आहे. त्याच्यापासून सुटका नाही. टाळल्याने तर ते अधिकच पाठीशी लागते. अशा विराट दुःखाला नम्रपणे भिडणे आणि आपली स्वागतशीलता, आपला विवेक, इतका समजदार, दुःखाएवढा करता येणं जमलं तर मग 'बात बन गई।'
पाहणार्यागला दुःखी माणूस आणि दुःख यातील भावसंबंध समजतोच असे नाही. राऊतांना समजतो. म्हणूनच त्यांच्या गझलेत तो उमटतो. आशयाच्या प्रशस्त सभामंडपातून पुढे सरकल्यावर गाभार्याःतील देवाचे दर्शन व्हावे तसे या कवीला दुःखाचाच देव झाल्याचे देवदर्शन होते. कवीच्या दुःखाचा देव होतो. दुःखातच देवत्वाचा साक्षात्कार होणे हा दुःखविषयक चिंतनाचा परमोच्च कळस आहे. कवी म्हणतात -
दुःख माझे देव झाले, शब्द झाले प्रार्थना;
आरती जी गात आहे तीच माझी वेदना.
(दिंडी पृष्ठ 39)
नाही भिडभाड । तुका म्हणे सानथोर॥या तुकोबांच्या अभंगाप्रमाणे राऊतांची गझल ही स्पष्टवक्ती आहे. भिडस्तपणा हा राऊतांच्या गझलेचा स्वभाव नाही. दंभाचा स्फोट करणे हे त्यांच्या गझललेखनाच्या प्रयोजनांपैकी एक मुख्य प्रयोजन आहे. दंभस्फोट करतांना त्यांच्या गझलेला धार येते. कसलाही मुलाहिजा न ठेवता अतिशय सूचकतेने व्यंग आणि विसंगतीवर बोट ठेवण्याचा त्यांच्या गझलेचा स्व-भाव आहे. समाजातील तथाकथित सभ्य आणि सांस्कृतिक वर्तनाच्या तळाशी असलेला असंस्कृत पणाचा गाळ दाखवून देण्याचे धाडस व मूल्यशुद्धीचे एक आश्वासनच राऊतांच्या गझलेतून मिळते. ते लिहितात,
बाहेर एकमेका सौजन्य दाखवा रे;
आतून सज्ज सारा विश्वासघात आहे.
(झेंडा पृष्ठ 49)
संन्यास घेतल्याने बाहेर जिंकलो पण
आतून वासनांनी हळुवार चाल केली.
(रक्त पृष्ठ 32)
पिंडदानादी विधींनी घाण केली;
छान होता या नदीचा घाट राजा.
(राजा पृष्ठ 66)
तुकारामा, अरे यांना जरा तू हाण पैजारा;
मुखोटा लावुनी फिरती तुझ्या वेषात मंबाजी.
(मंबाजी पृष्ठ 74)
ज्यांना तहान त्यांना पाणी न पाजतो;
देवास घालतो पण अभिषेक भामटा.
(भामटा पृष्ठ 72)
सांजवेळी संगतीला एक नाही पाखरू;
तेरवीच्या पंगतीला खूप आली माणसे.
(तेरवी पृष्ठ 19)
सत्य थेट सांगणे आणि प्रसंगी सूचकतेने सांगणे ह्या दोन्ही गोष्टी राऊतांच्या गझलेला जमतात. अर्थवाही प्रतिमेतून सत्याचे प्रकट दर्शन वाचकाला त्यांची गझल जशी करून देते. तसेच अप्रत्यक्षपणे प्रत्ययकारी भावानुभव देण्याचं सामर्थ्य श्रीकृष्ण राऊतांच्या गझलेत आहे.
शोषण करणारी व्यवस्था बोक्यांसारखी असते. हे बोके मान्यताप्राप्त सांस्कृतिक व्यवस्थेने पाळलेले असतात. पोसलेले असतात. त्यांची दांडगाई नि उद्धटपणा अधोरेखीत करतांना कवी म्हणतात-
आहे तसा आणा काळा चहा गडे हो,
येथील दूध सारे बोके पिऊन गेले.
(बियाणे पृष्ठ 21)
स्त्री आणि तिचे व्यवस्थेतील स्थान हा सातत्याने विचारवंतांच्या चिंतनाचा विषय राहिला आहे. पुरोगामी विचारवंतांनी, आचारवंतांनी स्त्रियांना खरोखर न्याय व आदर देण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरी सामान्य पातळीवर स्त्रीची परवड आणि पीडा कमी झाली नाही. 'यादेवी...’ म्हणत प्राचीन ऋषीमुनींनी स्त्रीला शक्तिरूपा म्हटलं. पण प्रत्यक्ष काय ? उपरोधाच्या धारदार शस्त्रांनी कवी स्त्री विषयीच्या पारंपरिक आदरातील फोलपणा
दाखवतो-
क्षणाची ही कशी पत्नी ?अनंताची कशी माता ?
कसे सौभाग्य हे आहे ? दुधाचा कोळसा झाला!
(कोळसा पृष्ठ 26)
केली होती जरी परीक्षा गर्भजलाची
चौथ्यानेही मुलगी होऊन डसली चिंता.
(परीक्षा पृष्ठ 64)
पर्यावरणावर, पर्यावरण संतुलनावर, पर्यावरण बचावाच्या मुद्यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चिंतन, मंथन व चर्चा होताहेत. पण सगळं कसे ? मोले घातले रडाया । नाही आसू नाही माया ।। अशा प्रकारचेच आहे. पर्यावरणाच्या मुळावर उठलेल्यांना कसे दंडीत करावे, याचा रोखठोक, निर्भीड विचार मांडतांना कवी म्हणतात-
आहे विचार अमुचा झाडास भेट द्यावी
येथील माणसांची काढून साल हाती.
(वसा, पृष्ठ 48)
कुठलाही विषय वर्ज्य न मानता समग्रजीवनदर्शन घडविणारी आणि रोखठोक असे स्वतःचे तत्वज्ञान मांडणारी सशक्त गझल राऊतांनी मराठी भाषेला दिली. रचनेचे तंत्र आणि चिंतनाचा मंत्र या दोन्ही अंगांनी मराठी गझलेला श्रीमंत केले ते श्रीकृष्ण राऊतांनी एवढे मात्र नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा