९ ऑक्टोबर, २०११

सुप्रिया जाधव : नऊ गझला










१.



भासते जे मखमली, आयुष्य ते काट्यात जाते !



जमविता पुंजी जराशी, तीच घोटाळ्यात जाते...


फायद्याची वाटलेली गोष्ट मग तोट्यात जाते !



चंद्र-तारे, रान-वेली मोह यांचा टाळते,.....पण


माणसांवर भाळते अन नेमकी गोत्यात जाते !



शुध्द-ताजे रक्त अजुनी वाहती धमन्या,.... तरीही


भोगल्या अवहेलनेची वेदना ह्रदयात जाते !



ज्या हव्याश्या वाटती त्या आठवांना गाडते,......मग


ठरविते विसरायची ती, गोष्ट का डोक्यात जाते ?



कालच्या शपथा ख-या की, आजच्या थापा ख-या या...


उत्तरा खोळंबलेली जिंदगी धोक्यात जाते !



संशयाची एक ठिणगी वाटते साधी-सुधी,.....पण


खेळ होतो विस्तवाशी, आग पाचोळ्यात जाते!



लख्ख केला आरसा मी पाहण्या प्रतिबिंब 'त्याचे' ....


भावनांशी सख्य करता धूळ बघ डोळ्यात जाते !



वाट दोघे चाललेली सांग का नवखी ठरावी.....?


भासते जे मखमली, आयुष्य ते काट्यात जाते !




२.



शब्द.



भले शब्द होते, बुरे शब्द होते


कसा अर्थ लावू? खुजे शब्द होते !!



मधा घोळवूनी निघाले तरीही,


कडू कारल्यासम तुझे शब्द होते !!



कितीसे हवेसे, कितीसे नकोसे,


जिव्हारी खुपावे सुळेशब्द होते !!



कधी भावनांचा लपंडाव खासा,


कधी तप्तलाव्हा फ़ुटे!... शब्द होते !!



तुझ्या युक्तिवादा पुढे हारलेली,


कसा जाब मागू?... लुळे शब्द होते !!



लढाया जगाशी कधी खड्ग झाले,


कधी ढाल माझी, मुके शब्द होते !!






भिंती



उरल्यात चार भिंती...


खचल्यात पार भिंती



परजून आठवांना....


करतात वार भिंती



आकांत ऐकुनीही...


बहि-याच ठार भिंती



गाठून एकटीला...


छळतात फ़ार भिंती



सोसून पावसाळे...


पडती न 'गार' भिंती



पाहून आसवांना...


द्रवती न यारभिंती



ओसाडश्या घराला....


ठरतात भार भिंती






जराजरासा

तुझे नि माझे नकोच नाते, हवा दुरावा जराजरासा !


जणू पहाया सलज्ज तारे रवी झुरावा जराजरासा !!



लुभावण्याला कितीक फ़ुलती गुलाब, जाई नि मोगरेही,


तुझ्या स्मृतींचा सुगंध ताजा, इथे उरावा जराजरासा !!



झपाटलेला पिसाट वारा कडी-कपा-यात बंद केला,


तुझ्या नि माझ्या उसासण्याचा उरो पुरावा जराजरासा !!



कधी नकोसे कधी हवेसे, छ्ळून जाती रदीफ़ मिसरे,


नजाकतीचाच शेर ओठी, अता स्फ़ुरावा जराजरासा !!



कितीक आले लुटून गेले इथे लुटारु लुबाडणारे,


तुझा भरवसा, मुरे मुरंबा, तसा मुरावा जराजरासा !!



घडी भराची नकोच संगत करार व्हावा युगांतरीचा,


तुझ्याच श्वासात श्वास माझा, अता विरावा जराजरासा !!




५.



व्यर्थ जगणे



व्यर्थ जगणे जोडण्याला पुण्य काही, पाप काही


श्राध्द माझे घातले मी ठेवला ना व्याप काही



कोण माझे, कोण वैरी जाणते ना कैकवेळी


केवड्याच्या सोबतीने भृंग काही साप काही



'कर्म केले... सोडले ते ’, ज्ञात गीता सार आम्हा


गोड मी मानून घेते पूर्वजांचे शाप काही



काय देवू जाब आता मी न केलेल्या गुन्ह्यांचे


ऐनवेळी ठोकते मग आठवे ती थाप काही



भोगलेले मांडते रक्ताळलेल्या लेखणीने


सांडले भाळावरी जे प्राक्तनाचे माप काही



ये असा मरणा समोरी मानली मी हार नाही


उंबरा ओलांडण्याची ना सुखाची टाप काही



मी उरावे ना उरावे, शब्द व्हावे अमृताचे


गौणतेला अर्थ यावा, ध्यास ना अदयाप काही




६.



ही घडी दे !!!



चांदण्याचा दाहदायी ज्वर नको


दे मिठी दे.... वेंधळा जर-तर नको !!



रोमरोमी स्पर्श चंदन-केवडा


एक फ़ुंकर..... मोतियांची सर नको !!



धुंद तू ही , धुंद शेजी मोगरा


श्वास हळवे....बोलण्याची भर नको !!



रांगडा मल्हार तू छेडीत जा


मारवा वा.... आर्ततेचा स्वर नको !!



मीलनांती ना उरावी भिन्नता !!


एकरुपे......व्यर्थ मादी-नर नको !!



अढळ ऐसे स्थान सजणा स्पंदनी


ही घडी दे!... कोणताही वरनको !!





तुझा दोष नाही



जरी कुंकवाचीच अंतीम कक्षा, तुझा दोष नाही !


गळा पोत काळी रुळे हीच शिक्षा, तुझा दोष नाही !!



कुणी बोट दावी, कुणी बोलुनी होय नामानिराळा,


(
तुझ्या पावित्र्याचीच अग्नीपरिक्षा, तुझा दोष नाही !!)



कुठे राम-श्रावण, कधी सर्प जागे पिलेल्या दुधाला?


तुझ्या पाझराचा सदा भार वक्षा, तुझा दोष नाही !!



क्षणी पाठ दावी तुला पाठचाही, कुणी ना कुणाचा...

,
तुझी ना करे "दोर कच्चाचरक्षा, तुझा दोष नाही !!



भल्या कोण वाली ? इथे दुर्गुणांची घडे नित्य अर्चा,


तुझ्या सदगुणांचीच परखड समिक्षा, तुझा दोष नाही !!




८.



तुझा दोष नाही



तुझ्यासारखे बघ, मलाही सुखाने जगाया न आले, तुझा दोष नाही !


तुझी होत होता, कधीही सख्या मग कुणाची न झाले, तुझा दोष नाही !!



पहाटे पहाटे धुके दाटलेल्या सराईत वाटेवरी चालताना....


उरी ठेचकाळून, त्या वेदनेने उभीशी जळाले, तुझा दोष नाही !!



सुखा गोंजराया दहाही दिशांनी लवूनी हजेरी इथे लावलेली,


खड्या संकटांनी, सगे-सोयरेही निमीषी पळाले, तुझा दोष नाही !!



वसंतातल्या कोकिळेची मलाही, कितीदातरी साद घालून झाली,


तुझ्या आठवांच्या, सुगंधी क्षणांच्या ऋतूंनी नहाले, तुझा दोष नाही !!



तुझ्या मागुती चालले रे मुक्याने, नि म्हणशील त्याला मी 'मम' म्हणाले,


तुझे वागणे अन तुझे ते बहाणे, मला ना कळाले तुझा दोष नाही !!




९.



टाकली मी कात आता...


.
जन्म गेले सात आता,


पेटणे ना वात आता!



दुश्मनीने पेटलेले,


रक्त सांगे जात आता!



शब्द जैसे ओरखाडे,


आप्त कैसे?...घात आता!



डुंबणारी नाव माझी,


ना सख्याचा हात आता!



स्वप्न सारी भंगलेली,


मिट्ट काळी रात आता!



गोठलेल्या जाणिवांनी,


मोडले मी आत आता!



काजव्यांची साथ कोठे,


मीच केली मात आता!



गांव मागे आठवांचा,


टाकली मी कात आता!





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: