१.
पुन्हा तिथून शोधते जिथून भेटलास तू;
वळून पाहते जरी अजून भास-ध्यास तू.
शहारले किती ऋतू दवात नाहल्या परी;
तरंग दाटले मनी नसून आसपास तू.
जळून वेदना व्यथा, सुखावले मनात मी;
सरावल्या उन्हातही फुलून चैत्र-मास तू.
तुझ्या खुणा जिथे जिथे,तिथेच राहते उभी;
अजूनही वळेन मी, करून बघ प्रयास तू.
जिथे थकून संपते तिथून तू सुरू पुन्हा;
तुझ्यात गुंतते पुन्हा, सुटून गुंतलास तू.
अथांग सागरापरी उधाण दे तुझ्यातले;
भरात ओसरून घे, जपून चार श्वास तू.
निघायचे जरी कधी इथून पाहुण्यापरी;
तुझ्यात जीव गुंतला, म्हणून हा प्रवास तू.
२.
करून झाले हिशेब सारे, जुनी उधारी शिल्लक नाही;
बरीच मोठी लिहून यादी, वही बिचारी शिल्लक नाही.
खुशाल गातो तुझीच भजने, तुझेच मंदिर लुटून जातो;
भरून घेतो खुली तिजोरी, खरा पुजारी शिल्लक नाही.
नवीन गाडी,महाल मोठा, सुखास नाही कुठेच तोटा;
घरी तिजो-या कीती भराव्या, म्हणे भिकारी शिल्लक नाही.
जिथे पहावी तिथे सलामी, करा गुलामी उभ्या जगाची;
थकून गेलो तरी हजेरी,रजा पगारी शिल्लक नाही.
वजन नसावे तिथे कुणाचे, खर्या यशाची हवी परीक्षा;
इथे ख-याने निकाल द्यावे अशी हुशारी शिल्लक नाही.
खिशात असती बर्याच नोटा, मतांपुढे ना कुणी शहाणा;
जनात आता ठरेल मोठा असा पुढारी शिल्लक नाही.
भरून डोळे कुणा पहावे, कधी बुडावे कधी तरावे;
खुळया मनाचे खुळे इरादे, नजर करारी शिल्लक नाही.
उगाच खेळू नका कुणाशी, हरायचे ते उगा कशाला;
हरून सारे लुटेल बाजी, असा जुगारी शिल्लक नाही.
रेखाचित्र : सदानंद बोरकर
३.
सुचेल ते मला इथे लिहायला हवे;
मुळात वेगळे मला सुचायला हवे.
मिटून ओठ साठवू असे किती कहर;
मनातले कधीतरी वदायला हवे.
झुकायचे कशास या जगापुढे असे;
कट्यार घेउनी मला लढायला हवे.
तमास जाळण्या नभात दीप लागतो;
मनातले कटू तसे जळायला हवे.
युगंधरास जन्मणे जमायचे कधी?
नवे कुणी कलीयुगात यायला हवे.
तळ्यात राहुनी कुणा प्रशांत भेटला?
ठिकाण वेगळे मला पहायला हवे.
मुकाट बंधनात या रहायचे किती?
नभात मोकळ्या अता फिरायला हवे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा