२४ ऑक्टोबर, २०१२

डॉ. राजेश उमाळे : मराठी गझलगायकीची आशा व दिशा




मराठी गझल गायकीचे विश्लेषण करतांना या गझल गायकीचा थोडा इतिहास पाहणे आवश्यक वाटते आणि हा इतिहास पाहतांना हिंदी उर्दूच्या गझल गायकी व परंपरेच्या तुलनेत मराठी गझल गायकीचा कालखंड हा फार अल्पसा आहे असे वाटते. मराठी भावगीताची, चित्रपटाची ओळख रसिकांना असल्यामुळे गझलशैलीला नव्याने स्विकारून त्याचा विकास करणे यामध्ये अनेक कलाकारांचे योगदान खर्ची पडत असल्याचे दिसते. एखादी नवी शैली मांडण्यासाठी ती मांडणारा कलाकार हा फार सक्षम असावा लागतो तेव्हाच या शैलीला लोक स्विकारून त्याला मान्यता देतात. मात्र मराठीच्या ञ्ृष्टीने ही नवीन शैलीच आत्मसात करून ती परंपरा राखणार्‍या गुरू शिष्यांचे असे योगदान इथे लाभलेले दिसत नाही. कलाकारांनी सहभाग दिला मात्र त्यांच्या शैली स्वतंत्र होत्या. त्यांच्या शैलीचे अनुकरण झाले असेही पुढे म्हणता येत नाही. त्यामुळे एखाद्या कलावंताच्या वैशिष्ट्‌यपूर्ण शैलीचे अनुकरण मराठी गझल गायकीत झालेले दिसत नाही. गझल गायली गेली परंतु ती अभिव्यक्ती त्याच कलाकाराची होती. त्याचा अनुयायी कोणी तयार झालेला दिसत नाही असे असतांनाही मराठी गझल गायकीचे काही संकेत निर्माण झाल्याचे मात्र दिसते. प्रथम गझल गायकीच्या सादरीकरणात अन्य प्रकार मिसळू नयेत. इतकी खबरदारी असते.
या कार्यक्रमातून कलाकार होत असल्याचे दिसून आले. तसेच गझल गायन म्हणजे भावगीत नव्हे किंवा ते नाट्यगीत ही नव्हे यापेक्षा निराळा आयाम देणे गझल गायकीला आवश्यक आहे. हाही संकेत गझल गायकाने पाळला. मुक्त शेर सादर करता येतात ते गझलच्या मैफीलीतूनच तसेच रूबाई वगैरे गाण्याचा प्रकार गझल गायकांनी आपल्या मैफीलीतून आणला. विविध कवींच्या रचनांचा समावेश करूनही त्या रचना म्हणजे मराठी गझलच असाव्यात. याकडेही या गायकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिल्याचे दिसते. तसेच अभिजात संगीतातील काही रागांचा किंवा त्यांच्या प्रकृतीचा गझलच्या प्रकृतीशी समन्वय जोडून अशा रागांना गझलच्या शेर मधून व्यक्त केले किंवा प्रयत्न केला तो गझल गायकांनीच मराठी गझल गायकीतही विविध तालांचा व त्याच्या लयकाटरीचा आनंदी घेतला गेल्याचे दिसत आहे. सरगम, आलाप, मुर्कीतान खटका राग मिटणे, भारतीय वाद्यांबरोबर पाश्चात्य वाद्यांचा उपयोग लोकांचे चित्त वेधण्यासाठी निरनिराळ्या गझलांमधून केल्याचे मराठी गझल रचना मध्येही दिसते. अन्य नव्या गझलकारांचा रचना यासाठी तयार केल्या गेलेल्या नव्या धून व त्याचे ध्वनीमुद्रण करून लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य म्हणजेच मराठी गझल गायनाच्या क्षेत्रातील हे महत्वपूर्ण पाऊलच म्हणावे लागेल. भावकाव्यांनी निर्माण केलेले श्रोते मराठी गझलकडे आकृष्ट केले त्यात या मराठी गझल गायकीलाच महत्वाचा वाटा आहे.
प्रस्थापित शैलींना छेद देवून आपली अभिव्यक्ती करणे ही कसब या गायकांमध्ये असणे आवश्यकच असल्याचे उदाहरणावरून सांगता येईल. मराठी श्रोत्यांना एक उपशास्त्रीय संगीत समान निर्माण होत असलेली ही मराठी गायकीची शैली अभिनव पूर्ण म्हणावी लागते.


रेखाचित्र : प्रकाश बाल जोशी

काव्यामध्ये जशी गझल रचना ही वेगळी संबोधली जाते तशीच संगीताच्या शैलींमध्ये सुद्घा भावसंगीतापेक्षा वेगळी शैली ही या गझलची असल्यामुळे ही गझल गायकीही वेगळी संबोधली जाते. गझल आणि भावसंगीत याची सरमिसळ करणारे अनेक प्रयोग विविध गायक कलाकाराकडून किंवा संगीतकारांकडुन केले जातात. मात्र जाणकार व चोखंदळ रसिक या दोन्ही शैलीत भेद करतात. त्यामुळे बांधावर उभ्या असलेल्या कलाकारांना पाहिजे तितके यश संपादन करता आले नाही. असे या मराठी गझलच्या विश्लेषणावरून निर्देशास आले आहे . त्यामुळे शैलीदार गझल गायकांनाच गझल गायकीचे श्रेय द्यावे लागते. ही शैली निर्माण करण्यासाठी किंवा विकसित करण्यासाठी बराच काळ लागू शकतो हे सुद्घा तेवढेच खरे आहे. उर्दू हिंदी गझलची परंपरा ही प्राचीन तर आहेच परंतु के. एल. सहगल, मास्टर मदन, तलत महमूद, गोहरजान, बेगम अख्तर, फरीदा खानम, मुन्नी बेगम, मेहंदी हसन, गुलाम अली, अहमद हुसैन, महम्मद हुसैन, हुसैन बक्श, शोभा गुर्टे, पंकज उधास, हरिहरण, इत्यादी गायकांच्या सांगितीक योगदानातून ही गझल परंपरा समृद्घ झाली व तिने एक सन्मानाचे स्थान आपल्या स्वतंत्र गायन शैलीला मिळवून दिले. यात बर्‍याच चित्रपट व संगीतकारांचे ही योगदान दुर्लक्षित करता येत नाही यामध्ये मदन मोहन, सारखे गझलकार न्याय देणारे अनेक संगीतकार हिंदी चित्रपटाला लाभले त्यामुळे हे गझलचे दालन चिरकाल टिकले व लोकांच्या पसंतीस उतरले.
मात्र मराठी गझल गायकीच्या विकासाच्या ञ्ृष्टीने शोध घेतल्यास मराठी गझल गायकीला फार प्राचीन परंपरा नाही व त्यामुळे गझल लिखाणापासूनच नव्याने या क्षेत्रातील पायाभरणी करून काही कवींनी मराठी काव्यात हे धाडसी कार्य केले यामध्ये माधव ज्यूलियनांपासून अन्य कवींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले दिसतात. त्याञ्ृष्टीने बराच कालखंड गझल लिखाणाच्या ञ्ृष्टीने रिक्त राहिला आहे. मात्र पुढे सुरेश भटांसारख्या श्रेष्ठ कवींनीही मराठी गझल प्रस्थापित करण्यासाठी मौलिक योगदान दिले आहे. मराठी भाषेला प्रादेशिक बंधन असल्याने ती संपूर्ण भारतभर प्रचार प्रसारित होवू शकत नाही त्यामुळे हिंदी उर्दू गझला इतका विस्तार मराठीचा होणे संभव नाही. असे असतांनाही मराठी गझल साता समुद्रापलीकडे गेलेली आहे. प्रचार प्रसार महाराष्ट्रातच का होईना पण झपाट्याने झालेला आहे. मराठी गझल गायकीच्या ञ्ृष्टीनेही गायकाची परंपरा शोधल्यास ती फार प्राचीन नाही. विदर्भातील गायक सुधाकर कदम, मधुकर जांगजोळ, गझल नवाज भीमराव पांचाळे, मोरेश्वर निस्ताने, माधव भागवत इत्यादी गायक संगीतकारांनी सुरेश भटांसारख्या ज्येष्ठ कवींच्या रचनांचा मराठी गझल असा कार्यक्रम तयार करून मराठी गझल गायकीच्या क्षेत्रात आपले पदार्पण केले. या नव्या उमेदीच्या गायकांचे नव्याने केलेले पदार्पणाचे रसिकांनी मन भरून स्वागत केले. पुढे गझल लिहीणार्‍या कवींची संख्या वाढत गेली तसतसे मराठी गझलचे गायक ही नव्याने या गायकीचे समर्थन करून लागले. पुढे मराठी चित्रपटांमध्येही या गझलांना स्थान मिळाले व हा प्रकार खर्‍या अर्थाने लोकाभिमुख झाला इतकेच नव्हे तर निरनिराळ्या दिग्गज संगीतकारांनी या मराठी गझलेला संगीतबद्घ केले व अन्ये सुप्रसिद्घ गायकांनाही या ध्वनीमुद्रिकांसाठी निमंत्रीत करून त्यांच्याकडून या गझलांचे गायन केल्याने मराठी गझलेच्या ध्वनीमुद्रिकांना अनन्य महत्व मिळाले. एकीकडे छोटेखानी बैठकीमधून प्रचार करणारे गझलकार व गायक तर दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या गायकांच्या कलाकृती तसेच चित्रपट, दुरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे, मासिके, स्पर्धा, सम्मेलन, स्मरणीका, गौरवांक व सादरीकरण त्यातच गायकीत होणारे स्थित्यंतरे विविधता नाविण्य पूर्णतेचा शोध घेणारे नवे कलाकार या गझलच्या विकासात योगदान देण्यासाठी आल्याने आज मराठी गझल व मराठी गझलची गायकी व त्यांच्या स्वतंत्र बैठकी ही स्थिती आढळून येत आहे.
या सर्व चिंतन मंथनातून गायकीच्या विकासाच्या दृष्टीनेही काही बदल झालेच नाही असे म्हणता येत नाही प्रसार माध्यमे व प्रादेशिक मर्यादा या गोष्टी मात्र मराठीच्या गझलच्या भविष्यात अडसर ठरू नये ही अपेक्षा समर्थनिय वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: