Related Posts Plugin for WordPress, Blogger...

२४ ऑक्टोबर, २०१२

ममता : तीन गझला१.

कोण होते..काय झाले..एवढे केले बदल;
पाहिले ना एकदा तू घेतली नाही दखल.

टाळता आले कधी हे घोळके,गोंगाट हा;
ये जरा गर्दीत दोघांचीच काढूया सहल.

दूर तू जातोस जेंव्हा शब्द होती पोरके;
तू जवळ येतो जरा अन त्याक्षणी सुचते गझल.

दाटतो अंधार होते सावलीही पारखी;
मी कसे सोडू तुला ना एवढी माझी मजल.

गाठले मी टोक आता कापले मी दोर ही.
एकदा कवटाळ हृदयी मग भले खाली ढकल.

२.

विचारेन आता तुला भेटल्यावर-
“किती हक्क माझा तुझ्या काळजावर?'’

तुझे नाव प्रत्येक ओठावरी का?
कधी बोलले मी...न लिहिले कशावर.

कसे ओळखावे इथे मी कुणाला;
मला भेटते मी, तुला पाहिल्यावर.

कळाले कुठे तू...कुठे मी असावे;
पुन्हा एकदा अंतरे मोजल्यावर.

कधी घेतली बोल चाहूल माझी;
कधी भेटला सांग अंधारल्यावर.

नसे दोष काही तुझ्या फुंकरीचा;
इथे वादळे पेटती फुंकल्यावर.

मला कोंडले मी तुरुंगात माझ्या;
तरी लक्ष माझे तुझ्या उंबऱ्यावर.

तुला आठवावे,मला तू सुचावे;
तुझ्यावर लिहावे तुला वाचल्यावर.

कशाला चढू पायरी देवळाची;
तुला देव माझा इथे मानल्यावर.


रेखाचित्र : सदानंद बोरकर 
३.

भेट अथवा सांग वाट परतण्याच्या;
शक्यता सार्‍या मिटू दे एकदाच्या.

चमकत्या कळसावरी रोखून नजरा;
मोजल्या मी पायर्‍या त्या देवळाच्या.

डौल त्यांच्या चालण्याचा वेगळा पण
वेगळ्या माझ्या कहाण्या रांगण्याच्या.

मोकळ्या रानात भेटूया जरासे;
मग तिथे नसतील बेड्या बंधनाच्या.

मागण्या फेटाळताना बोलला "तो";
चांगल्या नसतात सवयी मागण्याच्या.

भेटतो "तू " तो भिजवतो त्याच वेळी;
काय सांगाव्या तर्‍हा या पावसाच्या.

उंबर्‍यावर पेरले काटे घराने;
मोगरा आडून हसतो कुंपणाच्या.

भेटला जो खेचले त्यानेच मागे;
घेतली मी झेप जोरावर कशाच्या?

न्याय देताना पुरावे,दाखले बघ;
बोल तू भाषेत आता कायद्याच्या.

ही कथा माझी तुझी नसते कधीही;
ह्या व्यथा लाखो करोडो काळजाच्या.

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ
सीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP