गजल गायन हे गायन क्षेत्रातील वेगळे दालन आहे. हे निश्चित. मात्र अनेक जाणकार देखील गजल गायनाला शास्त्रोक्त गायनाच्या दर्जाचा मान देण्यास तयार नसतात. दादरा तराना, टप्पा, ठुमरी किंवा भावगीत यांच्या श्रेणीत या गायनकलेचा अंतर्भाव करण्याची पूर्वापार पद्घती आहे. गजल गायन ही एक स्वतंत्र फैकल्टी आहे, खयाल गायकीत, दादरा टप्पा, तराना यात रागाचे अनन्यसाधारण स्थान आहे. त्याशिवाय हे गायन प्रकार संभवत नाहीत. पण त्याच बरोबर यांत शब्दांना अत्यंत गौण स्थान आहे. किंबहुना शब्द येथे नगण्य मानले जातात. स्वरांच्यासाठी शब्द आधार मात्र असतात. श्रोत्यांनाच तर त्या शब्दांचे अर्थाकलन होत नाही अशी स्थिती आहे. या उलट गजल गायनात रागाचे तर अधिष्ठान असतेच असते पण शब्द हे प्रधान असतात तेथे स्वरांच्या सौंदर्य दिग्दर्शनासाठी शब्द आधार बनतात. पण स्वरांनाअत्याधिक गौणत्व नसतं, रागांच्या माध्यमातून शब्द संप्रेषित करताना, शास्त्रोक्त बैठक न सोडता गजल गाय् ाक गजलेची अर्थहानी होणार नाही, यांची ही खबरदारी घेत असतो, एवढच नव्हे तर स्वर लालित्याने शब्दातील भान जास्तीतजास्त अचूक पणे श्रोत्यांच्या हृदय व बुद्घीत शिरावे हाच त्याचा प्रयत्न असतो, अर्थात काही अंशी ही बाब ठुमरीला लागू अवश्य पडते पण तरीही गजल गायन ही शब्द प्रधान गायकी आहे. गीत गायन हे देखील शब्दप्रधान आहे.
गीत अथवा गजल गायन यांचा आधार राग असावा असे काही निर्बंध नाहीत. हे गायन राग विरहितदेखील असते, पण दर्जेदार गायक गजलांच्या चाली बहुतांशी रागाधारे बांधतात यामुळे गजल गायन हे शास्त्रोक्त गायन कलेचे एक दालन आहे. हे मान्य करणे उचित ठरते.
गजल गायक हा गजल या काव्य प्रकाराचा सर्वांगिण अभ्यासक असेल असे नाही. त्यामुळे छंदशास्त्रीय अभ्यासाची त्याच्याकडून अपेक्षा करणे फोल ठरते. पण त्यांस लय व तालाचे ज्ञान असल्याने तो गेय छंदांची पारख करू शकतो. आनंदकंद-रसना, मेनका, देवप्रिया, हिरण्यकेशी, कलिंदनंदिनी, व्योमगंगा असे तीस-चाळीस छंद तर अतिप्रचिलीत सदरात मोडतात त्यामुळे त्यांना परंपरेहून भिन्न नवी चाल लावणे म्हटले तरी तारेवरची कसरत आहे. काही प्रथितयश गजलकारानी जुन्या जनमान्य गजलांना जरी नवीन चाली लावल्या तरी त्या श्रोत्यांना ग्राह्य होत नाही. उदा. मीरची देख तो दिल के जाँ से ही मेहंदी हसनने गायलेली गजल आपल्या कानांना का अन्य चालीत भावत नाही? अनेकदा नव्या चाली आकर्षक असतात ही.
गजल गायक बहुधा संगीतकार स्वत: असतो संगीत दिग्दर्शक हे ही स्वतंत्र कला-शास्त्र आहे. गजल बाबत पाहिले तर मदन मोहन एवढ्या सुरेख चाली (गजलांच्या तरी संदर्भात) इतरांना तितक्या स्तराच्या जमल्या नाहीत असे मानले जाते. कारण गजलेची विधा त्यांना इतरांहून थोडी अधिक ज्ञात होती, असे म्हणता येईल गजलला चाल बांधणे हे वाटते तेवढे सोपे ही नाही. कारण तिच्या सादरीकरणाची (गीतांपेक्षा भिन्न) सुसंगतता ठेवणे कर्मकठीण न जमल्यास रसोभंग होण्याचीच शक्यता अधिक. गजलेच्या शेरात विरोधाभास, चमत्कृती, प्रतीकात्मकता व व्यंग असतात. ते स्वरोच्चारांनी नेमके श्रोत्यांना संप्रेषित करावे लागतात तरच दाद मिळते. रदीफ व काफियांचे महत्त्व तर गजल गायनात अनन्यसाधारण आहे. मतल्यावरून रदीफ कळतोच पण काफिया कळल्यावर अन्य शेरातील काफिया गायकांअगोदरच श्रोत्यांनीच उचलून धरला म्हणजे उच्चारला तर ती खुबी गजलकारा एवढीच गजलगायकाचीदेखील गणावी लागेल.
खरे तर गजल गायकाला वाङ्मयीन जाण असणे अत्यंत गरजेचे आहे. मेंहदी हसन, गुलाम अली यांना ती आहे. पण सार्यांनाच आहे असे म्हणता येत नाही. गजल दोन प्रकारची इथे मानता येईल एक स्तरीय साहित्यिक स्वरूपाची व दुसरी मुशायरा स्तराची. पहिली गजल केवळ श्रवणाद्बारे संप्रोषित होणे थोडे दुरापास्त, तर दुसरी जनसामान्यांना सहज आकलन होणारी असते. इक्बाल, गालिब, यगाना, असगर, इफ्तखार, अरिफ, बानी यांच्या गजला प्रथम वर्गात मोडतात तर इबे इंशा, निदा फाजली, नासिर, काजमी यांच्या गजल दुसर्या श्रेणीत बसतात. वाङ्मयीन मूल्ये दोन्हीतही असून ट्रान्समिशन मध्ये फरक आहे. गायक हा व्यावसायिक असतो त्यास दादलेवा शेर हवे असतात मग कॅची शेर ज्यात आहे अशा मुशायरोबाज शायरांच्या गजला गायनासाठी तो निवडतो. विरोधाभास, चमत्कृतीजन्य शेराची गजल दाद त्वरित घेते व ती दाद गजलकार व गायक दोघांनाही असते.
साहित्यिक स्तरांची उच्चभ्रू गजलाला दाद मिळाली तर समजावे एक तर गायक खरोखर उत्तम गातोय किंवा श्रोत्यांची जाण व अभिरूची खरोखरच वाखाणण्याजोगी असावी. गालिबच्या पहिल्याच गजलेला (नवशे फरियादी है किस शोखी-ए-तह रीर का) गाणार्या गायकाला दाद मिळाली तर ते गायक व गालिबचे आहोभाग्यच म्हणता येईल.
उच्च वाङ्मयीन स्तराची गजल डोळ्यानेच संप्रेषित होते व अल्प वाङ्मयीन दादलेवा गजल श्रवणाने संप्रेषित होते असा सर्वसाधारण अनुभव आहे. गायकाची भूमिका (गजल निवडीबाबत) चुकीची असते असेदेखील म्हणणे अयोग्य ठरते; त्याला महफिल जिंकायची असते. रसिक श्रोत्यांना रिझवणे हेदेखील त्याच्या कलेचे एक अंग असतेच स्वरयुक्त गजलच श्रोत्यांना भावणार हे तद्अनुषंगानेच असत. मेहदी हसन, गुलाम अली आदी मातब्बरांना ऐकण्यासाठीच जिथे लोक जमतात तिथे त्यांची गजल निवड गौण ठरते. त्यामुळे त्यांना फैज, गालिब अशांच्या किंचित प्रतीकात्मक निवडणे ही परवडू शकते.
ज्या गजल गायकांनी दादलेवा अशा कॅची शेरांची निवड असते त्यांना मुशायर्यातील साहिबे. दिवान नसलेले पण मुशायरा लुटणारे असे शायरच भावतात. विशेषत: निम्न शिक्षित वर्गाच्या श्रोत्यात, ग्रामीण परिसरातील मुशायरा महफिलीत अशाच गजला चालतात, गजल गायक ह्या गोष्टींचे अवधान ठेवून जेव्हा आपल्या निवडीतील गजला सादर करतो सदा यशस्वी ठरतो.
गजल गायकाने श्रोतृवृंदास मायबाप मानावे. गजल वाचक प्रेमींना नव्हे. गजलकारांसाठी गजलवाचक महत्त्वाचे, मात्र त्याने गजलगायकाने गावी म्हणून चालीवर गजल रचू नये अथवा लोकप्रिय गजलेच्या अनुकरणार्थ त्याच रदीफ काफियात गजल रचना करण्याचा हेतू पुरस्सर प्रयत्न करू नये.
एखादी गजल लोकप्रिय होण्यास गायकाचा पन्नास टक्के वाटा असतोच गजलकाराचा पन्नास टक्के लोक मात्र तेव्हाच मानता येईल जर त्याने ती गजल, गायकाने दिलेल्या चाली छंदावर बेतली नसेल. फर्माइशी गजल लेखकाने लोकप्रिय झालेल्या गजलचे श्रेय अशा वेळी सर्वसाधारणपणे गायक व संगीतकाराचेच मानले जाते. साहिर अथवा शहरयार अशी असामान्य प्रतिभेचे शायर अर्थात ह्यांस अपवाद म्हणावे लागतील. या लोकांनी चालीवर देखील अप्रतीम रचनाच अनेक संगीतकारांनी चाली लावल्या आहेत. अन् साहिरने देखील संगीतकाराच्या चालीवर रचलेल्या आपल्या अनेक उत्तमोत्तम रचनांना आपल्या काव्यसंग्रहात स्थान दिले नाही.
रेखाचित्र : प्रकाश बाल जोशी
खरं तर गजल हा एक काव्यप्रकार मात्र आहे. काव्य सृजनाचं अभिव्यक्ती माध्यम. ओवी, अभंग, दोहे, सुनीत, हायकू हीदेखील अभिव्यक्तीची माध्यमं आहेत. गजलचीदेखील अभिव्यक्तीची, सादरीकरणाची कविता गीत यांच्यापेक्षा भिन्न अशी शैली आहे. मी दोन प्रकारची गजल मानतो एक जी डोळ्यांवाटे मन व बुद्घीत दाखल होते व दुसरी जी कानांद्बारे शिरून मनाला तदाकार करते. पहिली साहित्यिक वा वाङ्मयीन दाखिली गजल होय व दुसरी मुशायर्यात वाचली जाणारी विरोधाभास व कॅची शेरांनी परिपूर्ण खारिजी गजल. गायक मंडळीना सहसा दुसर्या श्रेणीचीच गजल निवडणे भाग ठरते कारण बहुसंख्य श्रोत्यांपुढे ती सादर करावी लागते. दाखिली गजलेतील सांकेतिकता, प्रतीकात्मकता, उपमा इ. काही वेळा विद्बज्जड होण्याची शक्यता असते, स्वरांच्याद्बारे त्यातील मथितार्थ श्रोत्यांपर्यंत संप्रेषित करता येतोच असे नाही त्यामुळे गजलगायकांना गजलचे सौंदर्य, शब्दातील आशय, शैलीचे वेगळेपण, रागाची बैठक न मोडता स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणासवे गजल गायची असे अष्टावधान पाळावे लागते.
गजलवाचन ही एक कला आहे. काहीना ती उपजत असते तर काही ती प्राप्त करतात इथे माझे शायर मित्र इर्तजा निशात याची एक ओळ
शायरी अच्छी है तो फिर गाके सुनाता क्या है
आकर्षक आवाज असेल तरच तरन्नुममध्ये गजल वाचावी. नाहीतर गजल चांगली असूनही हसं होत दमदार सकस गजल तरन्नुमशिवाय ही छान वाचली जाऊ शकते व आपला प्रभावही पाडते फ ैज हे विश्व विख्यात शायर गजल वाचन मात्र अत्यंत वाईट करीत असत. तरीही त्यांच्या गजला अत्याधिक लोकप्रिय आहेत हेच उदाहरणे पुरेसे आहे.
गजलकाराने आपल्या प्रकाशित गजलेद्बारे आपली ख्याती व्हावी आपल्या गायल्या गेलेल्या गजलेद्बारे होऊ नये, अशी इच्छा बाळगणे जास्त चांगले. माझे स्नेही मुम्ताज राशीद यांची गजल पंकज उधासने वाचली अन् तो त्यांची अनुमती घेण्यासाठी स्वत: माहिम येथे त्यांच्या घरी अवेळी गेला. आज कोणताही गायक ही गजल मुम्ताज राशिद यांची आहे. असे ऑडियन्सला माइकवरून सांगताच टाळ्यांचा कडकडाट होतो. पहिले शायर दाद घेतो नंतर गायक पण अशी उदाहरणे विरळीच बहुदा गायकाच्याच नावाने गजल विख्यात होते. श्रोत्यांना बरेचदा गजलकाराचे नावदेखील ठाऊक नसते. सद्सद्विवेक बुद्घी ज्यांची शाबूत आहे, असे गायक मात्र निवेदकालाच किंवा स्वत: शायराचे नाव गजल गाण्यापूर्वी श्रोत्यांना खरं तर असं केल्याने त्यांच्या कलेला कुठेच उणेपणा येत नाही. दत्ताबाळ सराफ मैफलीत गजलकाराचे नावच नाही तर संक्षिप्त असा आकर्षक परिचय ही पेश करीत असत.
नवोदित गजलकारांनी एवढे लक्षात ठेवावे की, एखाद्या जर उत्तम चालीमुळे व गायकाच्या आवाजामुळे गाजली तर तुमच्यापेक्षा गायकीची लोकप्रियता वाढेल मात्र त्या गायकाने तुमची गजल गाण्याने तुमची साहित्यिक मान्यता जनमानसात उंचावेल असे मुळीच नाही अन्यथा साहिर, मजरूह, कैफी, शैलेंद्र हे फैज, फिराक, फराज यांच्यापेक्षा मोठे शायर गणले गेले असते. दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा आजही आपल्या देशात शायर/कवी पेक्षा संगीतकार व गवय्ये यांना मान्यता अधिक आहे. एकेकाळची उपेक्षित गायन वादन कला प्रतिष्ठीत बनली आहे व प्रतिष्ठीत काव्यरचना या कलेच्या भाळी उपेक्षा आली आहे. कालाय तस्मै नम:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा