८ ऑक्टोबर, २००८

संपादकीय




गझलप्रेमी मित्रांनो केवळ कवितेसंबधी
आणि त्यातही विशेष काव्यप्रकारासंबधी
एखादा ब्लॉग नियमित लिहिणे किती जिकिरीचे आहे,
हे मराठी ब्लॉगविश्वाला एव्हाना चांगले परिचित आहे.
गझल
हया विशेष काव्यप्रकाराला वाहिलेला हा ब्लॉग ‘गझलकार’.
दिनांक १ मार्च २००८ ला
हया सुदर्शन फ़ाकिर यांच्या वरील लेखाने ‘गझलकार’ची सुरूवात झाली.
आणि अवघ्या सहा महिन्याच्या अल्पावधीत
त्याची साडे पाच हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचली गेली.
या प्रतिसादाने आमचा उत्साह आणि आत्मविश्वास अधिक दांडगा झाला.
अनेक गझलकार मित्रांच्या सहकार्याने
हया ब्लॉगचा विशेषांक काढण्याची कल्पना
आज मुर्तरूप घेत आहे. याचा आनंद हा सर्जनाचा आनंद आहे.

एखादी भट्टी छान जमावी
तसे अनेक कलावंत एकत्र आले
त्यात छायाचित्रकार अशोक वानखडे ‘प्रवीण’
यांचे योगदान फार मोलाचे आहे.
एखादी नितांत सुंदर कविता वाचताना
मनात अनेक भावतरंग उमटतात,
आशयाचे अनेक पदर आपल्या संज्ञेत उलगडतात
आणि त्या प्रतिमा आपल्या नेणीवेत कायम रेंगाळतात
तसे ‘प्रवीण’ यांचे छायाचित्र आहे.
सीमोल्लंघनाच्या अर्थाचे सौंदर्यात्मक संसूचन करणारे
छायाचित्र त्यांनी मुखपृष्ठासाठी उपलब्ध करून दिले.

श्रीधर अंभोरे, प्राजक्ता,उमेशा आणि अभि
या रेखाचित्रकारांच्या योगदानाला सजावट म्हणणं
हा त्यांच्या कलानिष्ठेचा उपमर्द होईल.
गझल आणि लेखांमधील आशय अधिक सघन करण्यासाठी
त्यांचा लाभलेला सहभाग सार्थआहे.
या सर्व दोस्त - मित्रांचे औपचारिक आभार मानणं
त्यांनाही आवडणार नाही
आणि आम्हालाही ते मानवणार नाही.
महागाई, बॉम्बस्फोट, भ्रष्टाचार अशा तिहेरी दहशतीने
सामान्य माणूस होरपळून निघत आहे,
त्याची जीवननिष्ठा डळमळीत झाली आहे.
आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रातला हा ‘कॉमन मॅन’
आमच्या कल्पनाचित्रात नाउमेद झालेला दिसतो आहे,
हताश वाटतो आहे.
‘सत्या-असत्याची’ ग्वाही देणारे
त्याचे मन विकल झाले आहे.
म्हणूनच मनोज सोनोने यांच्या गझलेत हे जनमानस अभिव्यक्त होते-

‘गांधी तुम्हीच सांगा मिळतात शस्त्र कोठे?
हिंसाच सत्य आहे, बकतात लोक सारे.
हिंसेने कोणतेही प्रश्न कधीही सुटत नाही
हेच खरे, बाकी सर्व ‘बकवास’ आहे.
अमावस्येच्या घनघोर अंधारात
एखादी इवली पणती
आपल्यापरीने प्रकाशदान करते.
तशी ही उमेद आहे.
ती कायम राहण्यासाठी
हया पणतीत आपल्या शुभेच्छांचा स्नेह घालणे
हेच कोणत्याही
चित्रकाराचे, छायाचित्रकाराचे, गझलकाराचे, कलावंताचे
इतिहासदत्त कर्तव्य आहे.
असे आम्ही मानतो.
आणि हया‘सीमोल्लंघनाच्या’ प्रकाशवाटेवर
आमच्या शुभेच्छांचा एक किरण अंथरतो-

‘इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार,
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.’

-संपादक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: