८ ऑक्टोबर, २००८

वनवास : डॉ.श्रीकृष्ण राऊत

कमी झाला झमेल्यांचा जिवाला त्रास थोडासा;
घडीभर लाभला जेव्हा तुझा सहवास थोडासा.

दिवसभर रोज मरताना तुला येईल तो कामी;
सकाळी ठेव जगण्याचा मनी उल्हास थोडासा.

पुन्हा झाली चुकी माझी, पुन्हा मी फसवल्या गेलो;
पुन्हा झाला जिव्हाळ्याचा मला आभास थोडासा.

कुणाला शोधते भिरभिर नजर ओली असोशीने;
कुणाची वाट पाहे हा अखेरी श्वास थोडासा.

नको वाचू कधी पोथी,नको जाऊस तीर्थाला;
उपाशी लेकराना तू तुझा दे घास थोडासा.

कुणाला वेढले नाही इथे तू सांग लोच्यांनी;
निमित्ते शोधुनी मित्रा,जरा तू हास थोडासा.

परीक्षा संपली कोठे अरे अद्याप सीतेची;
मला सांगू नको रामा तुझा वनवास थोडासा.

1 टिप्पणी:

Sameer म्हणाले...

dusra sher khoopch sundar