१.
जन्मभर तुझ्या जखमांची मी वेठबिगारी केली;
या गझलांचा झालो मालक पण लाचारी केली.
तू रोज नको कुरवाळू माझ्या कवितांचे कागद;
आज पुन्हा या शब्दांनी बघ मारामारी केली.
परतून दिली व्याजाने तू या स्वप्नांची मुद्दल;
डोळ्यांनी मग झोपेशी दररोज उधारी केली.
मी काल नव्याने लिहिले तळहातावर नाव तुझे;
फ़िर्याद जुन्या घावांनी मग बारी-बारी केली.
भेट तुझी नक्की होती,जर असता खोटा पत्ता;
केला नाही शोध तुझा ही एक हुशारी केली.
कातरवेळी येण्याची पाळत जा तू वेळ तुझी;
काल अचानक डोळ्यांनी आंघोळ दुपारी केली.
हो, नाही, बघुया, नंतर.. तू कुठलेही दे उत्तर;
हार, गुलाल, रुमाल, सुरा सगळी तैयारी केली.
लावून चुना ओठांनी चढला हा रंग विड्याला;
हिरव्या हिरव्या पानाची मी पानसुपारी केली.
ना लिहिले लिहिण्यापुरते हे आयुष्याचे गाणे;
मी जिवनाची यात्रा अन जगण्याची वारी केली.
२.
दे आणखी कितीसे देणार तू पुरे झाले;
दुःखातही कितीदा आनंद साजरे झाले!
नसतो कधीच माझा मी तोल सावरू शकलो;
पडक्या घरात माझ्या आलीस तू बरे झाले.
आता कसा धरावा देवा तुझा गळा आम्ही;
आत्ता मला कळाले का हात कापरे झाले.
का चालवू नको मी मेघा तुझ्यावरी नांगर?
धरतीवरी कशाने हे एवढे चरे झाले?
असते कधी कुठे का प्रेमातही खरे खोटे?
झाले हजार वेळा पण नेहमी खरे झाले.
डोळे मिटून खिडक्यांचे शहारल्या भिंती;
मी दार लावताना घर फ़ार लाजरे झाले.
इतका कसा बुडालो प्रेमात मी तुझ्या तेव्हा;
मग डोह काळजाचा डोळ्यात या झरे झाले.
का अंगणास माझ्या तू लावला लळा इतका;
आता गुलाबही बघ झाडास बोचरे झाले.
आत्ता कुठे जरासे मी टोक काढले होते;
इतक्यात लेखण्यांचे त्यांच्या बघा सुरे झाले.
रेखाचित्र : सदानंद बोरकर
३.सांगू नको कुणाला दोघे लपून भेटू;
शोधू नवीन वाटा, जागा बघून भेटू.
पाहू तुला कितीसे डोळ्यात साठवू मी?
येना मिठीत आता डोळे मिटून भेटू.
माझ्या तुझ्या घराला हे जोडतात रस्ते;
केव्हांतरी उगाचच रस्ता चुकून भेटू.
हे बांध माणसांचे तोडून पूर येतो;
अडवेल लाख दुनिया आपण अडून भेटू.
या धावत्या जगाला रस्ते कधी कळाले?
आले इथून जर ते आपण तिथून भेटू.
बांधून हात हाती येती कुठून लाटा;
चल सोड हा किनारा दोघे बुडून भेटू.
मोजून भेटलो मी केवळ हजार वेळा;
उरलेत जन्म बाकी तेव्हा अजून भेटू.
चोरून भेटणेही आता महाग झाले;
होतो खिसा रिकामा थोडे जपून भेटू.
असतो तुझा असाही स्वप्नात रोज वावर;
तू भेटशील तेव्हा मग कडकडून भेटू.
४.
कशाला हवे आरसे माणसांना कुणी ना इथे चेह-यासारखा
कुणाचा असे चेहरा पारदर्शी इथे आरशा रे तुझ्यासारखा?
( कुणाचा असे चेहरा पारदर्शी इथे सांग ना आरशासारखा?)
जरी धावलो रोज वा-यापरी मी कधी ना सुखा रे तुला गाठले;
दिसेना नखाची तुझ्या सावलीही तुला शोधतो मी उन्हासारखा.
पुन्हा लाट आली जुन्या आठवांची अता गाठ गुंता कसा सोडवू;
कसा दूर हा लोटला तू किनारा तुला मीच होतो हवा सारखा.
मुक्या जाहल्या आज भिंती घराच्या रकाने इथे आज माझे तुझे;
खरे सांगतो रोज माझ्या घरी मी, अता राहतो पाहुण्यासारखा!
उशाला असा रोज घेऊन वणवा कसा काय डोळा तुझा लागतो?
इथे राख होऊन विझतात वाती, कुणी जागतो काजव्यासारखा.
नको गोठवू पापण्यांनी धुके तू मला आज गाळून हो मोकळी;
नको रोज डोळ्यात वेडे अशी तू मला साठवू त्या नभासारखा.
कशाला उरी रोज सांभाळल्या मी, तुझ्या मोरपंखी व्यथा वेदना;
तसा वार होता तुझा जीवघेणा तरी घाव जपला फ़ुलासारखा.
नको रोज गझला नको रोज कविता मला वाच आता म्हणे एकदा;
किती रेखशी रंग खोटे खरे तू म्हणे भेटना कागदासारखा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा