२४ ऑक्टोबर, २०१२

प्राजु : पाच गझला




१.

हारलेल्या जणू नायकासारखा

हारलेल्या जणू नायकासारखा;
जन्म गेला उभा नाटकासारखा.

चार भिंतीत मी राहिलो नेहमी;
एक डबक्यातल्या बेडकासारखा.

हो म्हणावे तुला की म्हणावे नको;
वागतो मी असा लंबकासारखा.

दास होउन तुझा राहिलो जीवना;
वागुदेना मला मालकासारखा!

मेघ येथे कधी मेघ तेथे कधी;
पावसा शोधतो चातकासारखा.

जीव यांत्रीक झाला कधी ठाव ना;
चालतो, बोलतो कोष्टकासारखा.

पुण्य आहे कुठे? ते कसे लाभते?
जन्मलो वाढलो पातकासारखा.

गोजिरे साजिरे सौख्य आले तरी;
त्यासवे वागलो खाटकासारखा.

'रंगलेला दगड' हीच किंमत म्हणे;
ना कुणा वाटलो माणकासारखा!

२.

बेइमानी जीवनाची काय मी सांगू कहाणी

बेइमानी जीवनाची काय मी सांगू कहाणी;
जायचे होते कुठे ते पोचले कुठल्या ठिकाणी.

एकटी रडता कधी मी  तीच येते सांत्वनाला;
काय सांगू वेदना माझी किती आहे शहाणी!

मांडती सार्‍या मुलींना लग्न-बाजारी कशाला?
'लोक म्हणती वाजवूनी घ्यायची असतात नाणी!'

आठवांच्या धुसरलेल्या दर्पणी डोकावताना;
ओळखीचा चेहरा वा ना दिसे कसली निशाणी!

कोवळी होती कथा झाली पुरी ना ती कधीही;
बेगडी वचनास राजाच्या पुन्हा भुललीच राणी!

सप्तरंगी सोहळ्यातच रंगले आयुष्य आता;
'ऊन्ह' जिणे रोजचे अन दाटते डोळ्यात पाणी.

सांज होता तोल डळमळतो असा माझ्या मनाचा;
परवचा गाता कुणी मज भासते तीही विराणी.



रेखाचित्र : सदानंद बोरकर 


३.

जणू वेदना जात्यावरती दळते आहे

कसे म्हणावे नशीब हे फ़ळफ़ळते आहे;
उथळ सुखांच्यासवे जरा खळखळते आहे!

नव्हते ठरले कधी आपुले भेटायाचे;
कशास मी त्या पाराशी घुटमळते आहे?

थुंकुन देता आयुष्याला नशिबावरती;
हळू हळू ते आता थोडे कळते आहे

मन्मानीला लगाम त्यांच्या घालू जाता;
नात्यांमधली गोडी का साकळते आहे?

पुरुषासाठी जन्म पणाला नारी लावे;
येत तटाशी लाट सुधा आदळते आहे!

आज-उद्याला अथवा परवा येशिल तू रे;
पावसा बघ वेधशाळा गोंधळते आहे!

आयुष्याची भुकटी भुकटी होउन गेली;
जणू वेदना जात्यावरती दळते आहे.

'प्राजू' का ना कधीच धरली खपली त्यावर?
जखम कधीची अजूनही भळभळते आहे!

४.

आहेस तू जगी हे दाखव कधी कधी

आहेस तू जगी हे दाखव कधी कधी;
दगडास अंतरीच्या जागव कधी कधी.

होतो जरा सुखाचा वर्षाव अन पुन्हा;
वठल्या मनास होते पालव कधी कधी.

नुसत्या हताशतेला गोंजारसी किती?
अंगार अंतरीचा पेटव कधी कधी.

का बोलणे तुझे हे 'आज्ञाच' भासती;
तूही करून बघ ना आर्जव कधी कधी.

स्वप्नांत रंगताना, पडला विसर असा;
बघते सहल म्हणुन मी, वास्तव कधी कधी.

मी एरवी तशीही, असतेच शांत पण
नसते विचार करती, तांडव कधी कधी!

आतूर मीच होते तुज पाहण्यास का?
आतूरतोस तूही, भासव कधी कधी!

ध्यानात ठेव 'प्राजू' हरलीस तू जरी;
जेत्यापरी स्वत:ला वागव कधी कधी.

५.

मनाचे असे वागणे का विसंगत

मनाचे असे वागणे का विसंगत?
हरुनी कसे राहते सांग झुंजत!

कितीही तळाशी बुडवले तरीही;
तुझे बोचरे भास फ़िरती तरंगत.

तुझा गाव ना शोधला मी तरीही;
तुझा ठाव सांगेल वाराच गंधत.

तुझे स्वप्न येते कधी मध्य रात्री;
तशी जागते मग उणी रात झिंगत.

कसे एकटे मन नभाशी झुरूनी;
फ़िरे आठवांचाच कापूस पिंजत.

इथे वाळवंटी फ़िरे तप्त वारा;
कसे मेघ आले सडे आज शिंपत?

क्षणांची उधारी कशी काय चुकवू?
इथे श्वास माझेच आलेत संपत.

चिता पेटताना इथे आज माझी;
कशा चौकटी सांग आलीस लंघत?



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: