१.
जगून जावे..!
काळासोबतच्या बदलांचे प्रभाव का हो धुवून जावे...?
हरदासाच्या मूळपदावर पुन्हा काय मी फिरून जावे...?
हौस कुणाची भांडण उकरुन निष्कारणचा वाद घालणे,
शब्द वाढवित मी का त्याच्या मनासारखे करून जावे..?
फुले सुकूनी काळी पडता चुरगळ चोळा फेकुन देता,
मनी भावना जुन्या कधीच्या, कोमलपण का सरून जावे..?
नुसते तिरपे कटाक्ष टाकुन जिवास तळमळ कशी लावशी ?
असाच चालो खेळ तुझा हा, फक्त एकदा हसून जावे..
आवडणारी फुले शोधता काट्यांचेही भान असू द्या,
डोंगरवाटा तुडवित असता पायाखाली बघून जावे..
चिवचिव करुनी वाट पाहती, घास भरविण्या आई येइल,
जरा वाढता बळ पंखांचे, कसे पिलांनी उडून जावे..?
जगण्याचे सामान मिळविण्या मरमर मरुनी देह झिजविता,
’यती’ म्हणतसे निवान्त आता पुन्हा नव्याने जगून जावे..!
२.
होते घाई..
उगाच गर्दी रस्त्यावरती, बघायची होते घाई..
थांब म्हणाले कुणी कधी तर पळायची होते घाई..
जरा कुठे जगण्याचा कळला अर्थ मनाला कसाबसा,
गंमत जगण्याची ना घेता मरायची होते घाई...
निसर्गदृश्यामधे रमावे थंड हवेला निवान्तसे,
भोज्जा शिवला, पुढे चला हो, निघायची होते घाई..
कुठे कुणाची हृदयस्पर्शी घटना ऐकुन शान्तपणे,
विचार करुनी प्रतिक्रिया द्या, रडायची होते घाई..
प्रसंग बाका असे कुणावर, मदतीची तो आस धरे,
हात झटकुनी हळूच सटकुन निघायची होते घाई...
डोळस बनुनी तटस्थतेने जगा समजणे गरजेचे,
’यती’ म्हणतसे, जाण हरपुनी निजायची होते घाई..
रेखाचित्र : सदानंद बोरकर
३.कुणावाचुनी नडते का..?
घरात बसुनी गुलगुल गोष्टी करणे अवघड असते का..?
प्रसंग येता रस्त्यावरती उतरुन लढणे जमते का..?
इतरांसंगे तुलना करता अपुल्या उणिवांचे पाढे,
किती ओतले सान्त्वनपाणी, आग मनाची शमते का..?
’मीच बरोबर’ या हट्टाने मान ताठ ठेवाया धडपड,
कुठेतरी श्रद्धा वा आदर चुकून राखुन नमते का..?
मनात असते बरेच काही पाठवणी लेकीची करता,
ओथंबुन पापणी अचानक ’नको बोलणे’ म्हणते का..?
अवघड निर्णय घेत घराच्या उंबरठ्यावर पाय असे,
अपशकुनाची आशंका, मन अधीर बनुनी अडते का..?
का करणे हा आप्त इष्ट अन् कुणबा मित्रांचा सगळा ?
खरेच का हो, ’यती’ विचारे, कुणावाचुनी नडते का..?
४.
रमलो नाही...
ㅤ
ठेचा खाउन दमलो नाही,
व्यर्थ कुठेही झुकलो नाही...!
ㅤ
मनुष्य आहे, अपुरी क्षमता,
कसे म्हणू मी चुकलो नाही...?
ㅤ
छातीवर मी वार झेलले,
आड शिखंडी लपलो नाही...
ㅤ
वाममार्ग सोपे दिसणारे,
परन्तु ते मी शिकलो नाही...
ㅤ
कौतुक करण्याजोगे काही,
मुका बनूनी बसलो नाही...
ㅤ
भले कुणाचा शिरच्छेदही,
उरी जिव्हारी रुतलो नाही...
ㅤ
आकर्षक ही गर्दी भवती,
’यती’ एकटा, रमलो नाही...!
ㅤ
५.
कातरवेळी मळभ दाटता...
ㅤ
कातरवेळी मळभ दाटता मन गलबलते कधीतरी,
भंगुर जगती स्थैर्य शोधण्या का तळमळते कधीतरी...?
ㅤ
अपुले जगणे सुधारण्याचा प्रयत्न करणे गरजेचे,
दुसऱ्याचे यश बघुन उराशी का जळजळते कधीतरी...?
ㅤ
न्हाउन आल्या ओलेतीने केस झटकता हलक्याने,
कसे अचानक कस्तुरकेशर बघ दरवळते कधीतरी...
ㅤ
किती मिळाले, किती गमवले, हिशोब असता मनोमनी,
मुठीत ओला कागद, कविता का चुरगळते कधीतरी...?
ㅤ
शल्य मनीचे कळू न देण्या जगापासुनी लपवावे,
पापणझाकण बळे झुगारुन जणु विरघळते कधीतरी...
ㅤ
उलगडते ना गणित कशाचे, कारण न कळे कशातले,
दोष कुणाचा, कोण भोगतो, मन हळहळते कधीतरी...
ㅤ
वरुन चेहरा हसरा बनवुन प्रसन्नतेचा आव जरी,
मनात जपल्या आठवणीची जखम चिघळते कधीतरी...
ㅤ
लुडबुडणारे पिलू हाकला पायामधुनी पुन्हा पुन्हा,
मनासारखे लोचट तेही का घुटमळते कधीतरी...?
ㅤ
बघता बघता जगात फिरुनी कळले सगळे व्यर्थ असे
मनात ’यति’च्या विचार सुस्थिर, जरि थरथरते कधीतरी...!
ㅤ
1 टिप्पणी:
.
… अखंड निर्मळ गझल , स्वच्छ खळखळ निर्झर , असे या आपल्या गझल वाचल्यानंतर वाटते , जाणवते . आपल्या गझल वाचण्याची फार उत्सुकता
… होती ती पूर्ण झाली आणि फार आनंद झाला हे सांगितल्याशिवाय राहवत नाही. नमस्कार.
टिप्पणी पोस्ट करा