१.
प्रश्न ना दुर्लक्षिल्याचा,
राग येतो ठेचल्याचा.
रक्त गोठू दे हवेतर,
त्रास होतो पेटल्याचा.
दु:ख होते, दु:ख आहे
दे पुरावा सोसल्याचा.
तू असा पाहू नको ना;
भास होतो संपल्याचा.
कोण पश्चाताप होतो!
जन्म सारा रेटल्याचा.
मांडला अन मोडलाही;
खेळ झाला भोंडल्याचा.
हारल्यावरती समजते;
गर्व नडतो जिंकल्याचा.
गझल साक्षात्कार आहे
जीवनाला भेटल्याचा.
२.
जीवना हे तुझे काय व्हावे असे;
चार-चौघात झाले फ़ुकाचे हसे.
शैशवाचा पुन्हा माग काढू कसा;
सौख्य ना सोडते पावलांचे ठसे.
नाव ना घेतले मी उखाण्यातही;
पाळले शब्द माझे जसेच्या तसे.
वेदनेने नशीबास कुरवाळले;
सख्य नाही सुखाशी तसे फारसे.
बोलते, चालते, वागते मी अशी;
सौख्य भरते घरी रोज पाणी जसे.
वास्तवाने असा जीव खंतावला;
आठवांनी धरावे पुन्हा बाळसे.
घोकल्याने कुठे दु:ख होते कमी?
ना सुगंधी, उगाळा किती कोळसे.
तृप्त व्हावी जशी चातकाची तृषा;
भेटण्याने तुझ्या वाटते हायसे.
पारदर्शीपणा आण शब्दांमधे;
शेर व्हावे मनाचे जणू आरसे.
रेखाचित्र : प्रकाश बाल जोशी
३.
जीवना रे कसा डाव जिंकायचा?
काफिला वेदनेचा न संपायचा.
हे न वाटे बरे, ते न वाटे खरे;
जीव एका ठिकाणी न गुंतायचा.
हाद-यांनी ह्र्दय रोज भेगाळते;
काळजाचा तडा रोज लिंपायचा.
स्वाभिमानीपणाला मुरड घालुनी;
समजुतीचा सडा रोज शिंपायचा.
गाडते मीच माझ्या मनाचे मढे;
प्रेत चाले पुढे, प्राण फुंकायचा.
कागदांना किती हे वजन लावले;
ऐनवेळी कुठे कोण शिंकायचा?
राजरस्ता कधी का विचारी कुणा;
कोण थुंकायचा? कोण भुंकायचा?
४.
नको जाणण्याचा खटाटोप आता;
करु यातनांचा समारोप आता.
तुला पाहता मी तुझी होत जाते;
जणू लाजही पावते लोप आता.
नजर-कैद अथवा उमर-कैद होवो;
तुझे मान्य सारेच आरोप आता.
सुन्या वर्तमानास गोंजारताना;
तुझ्या आठवांचा घडे कोप आता.
सुसंवाद कुठला?... विसंवाद नुसता;
कुशी पालटोनी उगा झोप आता.
असे माळ खडकाळ झाले मनाचे;
फ़ुलावे कसे प्रीतिचे रोप आता?
सख्या भेट ही शेवटाली ठरावी ...
तुझी सर्व दु:खे मला सोप आता
नको डाव मांडू पुन्हा तू नव्याने;
'प्रिया' वेळ झाली गं,.आटोप आता!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा