२४ ऑक्टोबर, २०१२

खलील मोमीन : चार गझला



१.

पूर्वज आणि आम्ही

पूर्वज साधे खरेच अमुचे भोळे होते ;
माणुसकीचे मनास त्यांच्या डोळे होते.

शब्द इथे सांडतोच आम्ही स्वार्थासाठी;
संयम,त्यांनी मुखात भरले बोळे होते.

कष्ट मुळी हे नकोत म्हणतो आम्ही तेव्हा-
घेत तयांच्या करात ते हिंदोळे होते.

एकविचारी मुळी न उरलो आम्ही कोठे;
संघटनेचे मधाळ ते हो पोळे होते.

सत्य विकाया उधार बसलो आम्ही जेथे-
फक्त दग्याचे करीत ते खांडोळे होते.

स्पर्श सुखाला करून कळले ,दु:खाचे ते-
साप असावा तसेच की वेटोळे होते.

अर्थ जिण्याचा मुळीच कळला नाही आम्हा;
भ्रष्ट निघालो म्हणून हे वाटोळे होते.

२.

ते दु:ख तरीही

हुसकावे दु:ख तरीही जगण्यात चराया येते;
संयमात सोशिकतेची माती उकराया येते.

वाळवून वाट फिरले की असतेच तिथे सामोरे;
टाळून पुढे जातांना स्मरणास धराया येते.

सुख पासंगासाठीही पुरणारे नसते तेव्हा-
ते झुकते माप व्यथांचे पारडे भराया येते.

संपले वाटते तेव्हा ते वाफ होउनी उडते ;
स्पर्शाने आठवणींच्या डोळ्यात झराया येते.

लोटून त्यास काठाशी त्या कालप्रवाही बुडता;
हलकेच लेखणीमधुनी अक्षरी तराया येते.

ते रमते,गमते,दमते सारेच शेवटी शमते;
ते दु:ख तरीही अंती मातीस वराया येते.



रेखाचित्र : सदानंद बोरकर 



३.

जिंकणे त्याला म्हणावे

लोभ ऐसे पात्र जे नाहीच भरण्यासारखे;
आळशाला काय आहे काम करण्यासारखे?

त्या सुखासाठीच धावाधाव सगळी चालते;
मात्र बोटांनीच ते पार्‍यास धरण्यासारखे.

संकटे येतात त्यांना तोंड असते द्यायचे;
जीवनी ही वेदना ना दु:ख सरण्यासारखे.

कस्तुरी कोठे मृगाला हाय कळली ना कधी;
शोधण्या ती धावणे वेडेच ठरण्यासारखे.

दाम घामाचा मिळावा मान्य असली मागणी;
लाच घेणे वाटते घाणीत चरण्यासारखे.

वाम मार्गाची कमाई भार ठरते या जगी-
फक्त सत्कर्मे,दया ते प्रेम तरण्यासारखे.

दुर्बलांना ठेवणे वेठीस कसले शौर्य ते;
जिंकणे त्याला म्हणावे युद्ध हरण्यासारखे.


४.

उधार

मुक्त तू जगात या,कुणास तार,मार तू;
फास हो गळ्यास वा दयेस घाल हार तू.

विकृती कशास ही कुणास त्रास द्यायची?
मोडल्यास जोड ते पुन्हा नवे उभार तू.

शूकरास शोभते मिळेल तेच चाखणे;
रे तसा जगू नको धरेस ओत भार तू.

मान्य,वेदनाच ही उन्हासमान पोळते;
ताप सोस,सावली बनून थंडगार तू.

सोडणेच भाग ते कमावलेस या जगी;
वाट गंध वाट तो, तसाच हो उदार तू.

ऐक या क्षणास तो हळूच काय बोलतो-
सांग, साक्ष तू तुला,स्वत:स हे त्रिवार तू.

फेडणे ऋणास त्या अशक्य,भान ठेव हे-
प्राण आणला जगी जगावया उधार तू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: