२४ ऑक्टोबर, २०१२

सुरेशकुमार वैराळकर : तीन गझला




१.

प्रसन्न आसमंत,का उदास तू?
विचार हाच प्रश्न आरशास तू.

अजून गाव दूर वृक्ष ना कुठे;
अधेमधे उन्हात थांबलास तू.

कुठे न पालवी,कुठे न कोकिळा;
कुठे असा वसंत पाहिलास तू.

विकून आपली स्वता:च सावली;
उन्हाकडे गहाण राहिलास तू.

अजूनही कसा सुगंध दरवळे;
अजूनही इथेच आसपास तू.

कुठे,कधी,कुणास देव पावला
खुशाल दूध पाज पत्थरास तू.

२.

वेड्यापरी वागायचे;
हे राहिले सांगायचे.

वाटा फुलांच्या टाळुनी;
काट्यांस मी बिलगायचे.

करुनी सुखे सारी वजा;
दु:खास मग मागायचे.

गाणे तुझे-माझे जुने-
मीच एकट्याने गायचे.

कवटाळुनी घेऊ व्यथा;
मग रात्रभर जागायचे.

सारीच नाती बेगडी;
हे शेवटी उमगायचे.



रेखाचित्र : सदानंद बोरकर 
३.

आकांत फार झाला;
अश्रू फरार झाला.

काट्यांवरी फुलांचा
एकाधिकार झाला.

निद्रिस्त गस्तवाले;
कैदी पसार झाला.

गाफील तू तसा मी;
सौदा उधार झाला.

मी झुंजलोच नाही;
झोपेत वार झाला.

आयुष्य सोसुनी तो,
मस्तीत ठार झाला.

तो घाव आपुल्यांचा-
जो आरपार झाला.










1 टिप्पणी:

क्रांति म्हणाले...

अप्रतिम!!!!!!!!