खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते;
दिसणार नाही इतके पुसट डोळ्यांमध्ये दंव तरळते.
फाटकामधून निरोपादाखल हात तिचा हलत राहतो;
आणि एकाएकी मग वाटेलाच वळण येते.
चालत असतात पाय निमूट डोळ्यांनाही दिसते पुढचे;
अंतर्यामी खोलवर आभाळ एक अंधारून येते.
चिरपरिचित असून झाडे साधी ओळख देत नाहीत;
तिर्हाईत उन्हापाशी सावली सावली गहाण पडते.
खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते;
कशी अवेळी डोळ्यांमधून आश्लेषाची सर येते.
- उ.रा.गिरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा