असेना जिंदगी खडतर, जगायाचे सरावाने;
असेना वाट वळणांची, वळायाचे सरावाने.
पुन्हा ती शक्यता नाही,नसे मज ती अपेक्षाही;
तरीही भेट झाली तर हसायाचे सरावाने.
तुझी केली प्रतीक्षा,पण कुठेही थांबलो नाही;
उन्हातान्हातही आता रमायाचे सरावाने.
जरी हे बेभरवशाचे ऋतूंचे वागणे आहे;
कळ्यांनी मात्र वेळेवर फुलायाचे सरावाने.
कुणाच्या राग लोभाची कशाला मी करू पर्वा;
मला जे भावले, ते ते लिहायाचे सरावाने.
जरी आम्ही दिल्या होत्या शिव्याही एकमेकांना,
तरी सत्तेत जोडीने बसायाचे सरावाने.
सदा यांच्या दिवाळीला कुणाची झोपडी जळते;
गरीबांनी कशासाठी जळायाचे सरावाने.
- डी.एन.गांगण
९३२३७९५९९६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा