शोधून सापडेना साधे निशाण माझे;
बेवारशाप्रमाणे हे वर्तमान माझे.
पुतळे उभारले अन् केल्यात फक्त चर्चा;
तुम्ही विचार कोठे केले महान माझे?
कर्तव्यदक्षतेचा अहवाल सांगतो की
अद्यापही सुरक्षित आहे मकान माझे.
तेजीत जीवनाचा बाजारभाव यंदा;
मी काढले विकाया सारे इमान माझे.
मी वारसा जगाच्या आदीम प्रेरणेचा;
प्रत्येक माणसाच्या हृदयात स्थान माझे.
माझ्या मताप्रमाणे केव्हाच वारलो मी;
आता जिवंत आहे येथे स्मशान माझे.
- रुपेश देशमुख
९९२३०७५७४३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा