कोणीतरी मनाशी घरटे करून गेले;
आकाश तारकांचे मज पांघरून गेले.
सांजावल्या मनाचे एकाक चालताना;
निबिडात काळजाच्या मन बावरून गेले.
झाली कशी कळेना रक्ताळ पावले ही;
वाटेत कोण माझ्या सल अंथरून गेले.
आले थव्याथव्याने पक्षी तुझ्या सयींचे;
राखेवरी फुलांचे कशिदे भरून गेले.
केसातल्या जुईचा स्वप्नात भास झाला;
गंधाळल्या पहाटे मन मंतरून गेले.
मागू नकोस आता जपले जिवापरी मी;
माझ्या कुशीमध्ये जे क्षण मोहरून गेले.
नाही कसे म्हणू मी कुंकूच भाग्यशाली;
सरणापुढून अंती मज सावरून गेले.
-अनंत भीमनवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा