‘जीवनाचा रियाज असल्याखेरीज कलेचा साज गवसत नसतो. मानवी जीवन केंद्रस्थानी असलेले साहित्य कालातीत असते. सुरेश भट यांच्या अनेक रचना आजही वर्तमानाचे पदर घेऊन उलगडत राहते. कदम यांनी शब्दांना असणारे अंगभूत संगीत जाणून घेऊन सहजपणे अर्थ प्रवाहित केला. छोटा गंधर्व,पंडित जितेंद्र अभिषेकी यासारख्या कलावंतांचा सहवास त्यांना लाभला.गझल मांडताना संगीताची अनुरूपता अर्थाशी इमानदार ठेवावी लागते. कदम यांनी हे व्रत चांगले निभावले.’
लोकमत
१७ मार्च २००९
संपादकीय
भाष्य
गझलगंधर्व कदम
तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही
तिथेच जाऊन वेच तारे अजून काही
थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हेका
अजून गारे... अजून गारे... अजून काही
विझून माझी चिता युगे लोटली तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही...
कविश्रेष्ठ आणि मराठी गझलचे अग्रदूत सुरेश भट यांच्या मृत्युला १४ मार्चला ६ वर्षे झाली. तरीही येथे उधृत केलेल्या असंख्य ओळी आजही रसिकांशी टवटवीत ऋणानुबंध बांधून उभ्या आहेत. पुण्यात बांधण जनप्रतिष्ठान आणि अभिजात गझल या संस्थेच्या वतीने सुरेश भट यांचा स्मृतीदिन झाला. यावेळी जेष्ठ गझलगायक सुधाकर कदम यांना गझलगंधर्व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मराठीतील काही गझलकारांनी एकेक गझल यावेळी सादर केली. गेली ४० वर्षे कदम यांनी मराठी गझलेची निरपेक्ष सेवा केली आहे. अशी गावी मराठी गझल या स्वरूपाचे कार्यक्रम कदम यांनी महाराष्ट्रात गावोगावी केले आहेत. गझल गाताना शब्दप्रधान गायकीला महत्त्व असते. सांगितिक रचनेत शब्दांचे अर्थ उलगडून सांगणारी कदम यांची शैली लोकप्रिय आहे. त्यामागे त्यांचे चिंतन आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील साधा शिक्षक माणूस साहित्याची आणि रसिकांची कशी सेवा करतो याचा आदर्श कदम यांनी उभा केला आहे. खुद्द सुरेश भट यांनी कदम यांना मराठीतील मेहंदी हसन असे म्हटले होते. कदम यांच्या काही कार्यक्रमांचे निरुपणही भट यांनी केले होते. प्रा. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी प्रारंभीच्या काळात पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत कदम यांचे कार्यक्रम करण्यात पुढाकार घेतला होता. सुरेश भट यांच्या रचना कदम यांनी स्वतंत्रपणे संगीतबद्ध करून सादर केल्या. अनेकदा खुद्द भट वेगळ्या शैलीत गझल सादर करीत तर कदम यांची पद्धत वेगळी असे. परंतु गझलकाराच्या आशयाशी प्रामाणिक राहून सादरीकरण करण्यावर त्यांचा भर असे. त्यासाठी त्यांनी संगीताचा आणि साहित्याचा रियाज केला. जीवनाचा रियाज असल्याखेरीज कलेचा साज गवसत नसतो. मानवी जीवन केंद्रस्थानी असलेले साहित्य कालातीत असते. सुरेश भट यांच्या अनेक रचना आजही वर्तमानाचे पदर घेऊन उलगडत राहते. कदम यांनी शब्दांना असणारे अंगभूत संगीत जाणून घेऊन सहजपणे अर्थ प्रवाहित केला. छोटा गंधर्व,पंडित जितेंद्र अभिषेकी यासारख्या कलावंतांचा सहवास त्यांना लाभला.गझल मांडताना संगीताची अनुरूपता अर्थाशी इमानदार ठेवावी लागते. कदम यांनी हे व्रत चांगले निभावले.
(लोकमत,१७ मार्च २००९ वरून साभार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा