मराठी गझल गायकीच्या उण्यापु-या पाचेक दशकांच्या इतिहासात जे नाव सर्वाधिक ठळकपणे पुढे येते ते सुधाकर कदम यांचे. स्व. सुरेश भटांनी मराठी साहित्याला गझल प्रदान केली तर कदमांनी मराठी संगीताला गझल गायकी. गझल संगीतबद्ध करणे आणि गझल गाणे या दोन्ही गोष्टी गीत गायन, अभंग किंवा चित्रपटसंगीताहून भिन्न व स्वतंत्र आहेत. सुधाकर कदमांनी मराठी गझल गायकीला एक स्वतंत्र व पृथगात्म स्वरूप प्राप्त करून दिले आहे. मी संगीताचा अभ्यासक नसलो तरी माझ्या वाचनात आलेल्या माहितीनुसार गझल गायकीचे स्वतंत्र कार्यक्रम घेणारे पहिले कलाकार म्हणून कदमांचाच उल्लेख करावा लागेल.
आयुष्यभर एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी चालत राहणा-या कुठल्याही मनस्वी व्यक्तीसारखे भासणारे कदम, गझल गायकी हेच आपल्या जीवनाचे सार्थक मानत आले आहेत. ही निष्ठा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून सातत्याने जाणवत राहते. गझलचा विषय निघताच, आठवणींमध्ये रमणारे कदम, आपली कला, अनुभव, प्रयोग आणि आपल्या लोकांबद्दल भरभरून बोलू लागतात. हा आपलेपणा, हे माणसांबद्दलचे निर्व्याज प्रेम हे त्यांच्यातील मोठ्या कलावंताचे स्थायी लक्षण आहे. गझल ही मनुष्याच्या आयुष्याचा, त्याच्या सुखदु:खाचा तळ शोधणारी आत्मधून आहे. मनामध्ये प्रेम, आस्था आणि सांवेदनिक जिवंतपणा असल्याशिवाय गझल लिहिणे अथवा गाणे शक्य नाही. हा जिवंतपणा कदमांना इतर कलावंतापासून कितीतरी वेगळे आणि श्रेष्ठ ठरवितो. कलेसाठी कलोपासकाच्या छातीत इमानी हृदय असणे आवश्यक आहे. बेईमान आणि धूर्त लोकांसाठी हे क्षेत्र, हा प्रदेश निषिद्ध आहे. गझल, स्वत: आणि स्वत:ची गायकी याबद्दलची निर्मळ निष्ठा हीच कदमांच्या एकंदरीत जीवनप्रवासाची सोनेरी किनार बनून राहिलेली आहे.
सुधाकर कदम यांनी पाकिस्तानी आणि भारतीय उर्दू गझल गायकांच्या अनेकविध शैलींचा अभ्यास करून, मराठी गझल गायकीची स्वतंत्र अशी विकसित शैली निर्माण केली. ध्वनिमुद्रिका हा या श्रवणभक्तीचा स्त्रोत होता. ज्याप्रमाणे लिहिणा-यासाठी पूर्वसूरी आणि समकालीन प्रतिभावंतांचे लेखन वाचणे हा एक प्रकारचा तंत्राभ्यास असतो, तसाच महान गायकांच्या रचना सतत ऐकून त्यातल्या बारीकसारीक अंगभूत वैशिष्ट्यांसह, गायकीचे तंत्र आत्मसात करणे हा गायकांसाठी एक प्रकारचा रियाजच असतो. प्रत्येक गायकाची गायनशैली, चाली बांधण्याची विशिष्ट ढब, शब्दांचे भावानुसार प्रकटीकरण आणि शेर सादर करण्याची पद्धत वेगवेगळी असते. या सर्वांचे सार समजून उमजून आपल्या सर्जनाच्या साच्यात ओतण्याचे काम, ही एक प्रदीर्घ आणि निरंतर प्रक्रिया आहे. वडील पांडुरंग कदमांकडून मिळालेला वारकरी संप्रदायाचा वारसा, पंडित जितेंद्र अभिषेकी व छोटा गंधर्व यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि अनेक वर्षांची प्रचंड साधना या सर्वांचे प्रतिबिंब कदमांच्या गायकीत उमटत राहते. विदर्भाच्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या कदमांनी संतूर, सरोद, एकॉर्डिएन विविध वाद्यांमध्ये प्राविण्य मिळवून स्वतंत्र वादनाचे (सोलो) देखील कार्यक्रम केले आहेत. कदमांच्या सांगीतिक साधनेचा हा विस्तार थक्क करून सोडणारा आहे. संगीताच्या विविध पातळ्यांवर अनेक प्रयोग करणा-या प्रतिभावंतांची गझल गायकी समृद्ध असणे साहजिकच होते. गझलचा गझलचा स्वभाव, तिचा लयाधारित घाट आणि अर्थानुसार व्यापकता कायम लक्षात ठेवून कवीच्या भावनिक प्रतलाशी समकक्षता साधून गझल संगीतबद्ध करण्याची कठीण कला कदमांनी कमालीची साधली आहे. पत्रकारितेत काढलेली अनेक वर्षे विविध मासिकांतून केलेले स्फुट लेखन, ‘सरगम‘ आणि ‘फळे मधुर खावया‘ या दोन पुस्तकांची निर्मिती लक्षात घेता कदमांची साहित्यातील डूब लक्षात येते. शिवाय सुरेश भटांच्या प्रदीर्घ सहवासाचाही गझलची अंगभूत वैशिष्ट्ये समजून घेण्यात लाभ झाला असावा असे वाटते. आर्केस्ट्रात काम करीत असताना तासन्तास रियाज करणा-या कदमांनी पुढे आकाशवाणी नागपूरची स्वरपरीक्षा देऊन आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलावंताचा दर्जा मिळविला. मला वाटते या सर्व घडामोडींमधून कदमांच्या गझल गायकीचे रंगरूप आकार घेत गेले असावे. १९७५ साली नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उदघाटनाचे वेळी कदमांच्या गायनाचा कार्यक्रमझाला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्व. सुरेश भट होते. त्यांनी आपल्या काही गझला कदमांना संगीतबद्ध करण्यासाठी दिल्या. पुढे १९८० पासून या दोघांनी एकत्र कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. या कार्यमातूनच पुढे, ‘अशी गावी मराठी गझल‘ हा संपूर्णपणे गझल गायनास समर्पित असा कार्यक्रम सुरू झाला.
तेव्हापासून कदमांनी गझल गायनाचे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर मिळून सुमारे हजारएक कार्यक्रम केले आहेत. सुरेश भटांशिवाय श्रीकृष्ण राऊत, उ. रा. गिरी, ललीत सोनोने, अनिल पाटील, शिवाजी जवरे, अनंत ढवळे तसेच चित्तरंजन भट, समीर चव्हाण, प्रमोद खराडे, दिलीप पांढरपट्टे, ए. के. शेख, संगीता जोशी, म. भा. चव्हाण, दीपक करंदीकर, रमण रणदिवे अशा अनेक गझलनवाजांच्या गझला संगीतबद्ध केल्या आहेत. अलीकडे पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेले कदम स्वत: गायन फारसे करीत नाहीत परंतु गझल संगीतबद्ध करण्याचा उपक्रम मात्र अव्याहत सुरू आहे. सौ. रेणु चव्हाण व कु. भैरवी कदम या दोन्ही कन्यांच्या स्वरमाधुर्यातून त्यांनी परिश्रमपूर्वक घडविलेली गझल ऐकताना त्यांच्या चेह-यावरील समाधान लपत नाही. अलीकडे कदमांच्या प्रोत्साहनातून सुरू झालेला ‘गझलकट्टा’ या मासिक कार्यक्रमाला पुण्यात ब-यापैकी बाळसे धरू लागले आहे.
तेव्हापासून कदमांनी गझल गायनाचे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर मिळून सुमारे हजारएक कार्यक्रम केले आहेत. सुरेश भटांशिवाय श्रीकृष्ण राऊत, उ. रा. गिरी, ललीत सोनोने, अनिल पाटील, शिवाजी जवरे, अनंत ढवळे तसेच चित्तरंजन भट, समीर चव्हाण, प्रमोद खराडे, दिलीप पांढरपट्टे, ए. के. शेख, संगीता जोशी, म. भा. चव्हाण, दीपक करंदीकर, रमण रणदिवे अशा अनेक गझलनवाजांच्या गझला संगीतबद्ध केल्या आहेत. अलीकडे पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेले कदम स्वत: गायन फारसे करीत नाहीत परंतु गझल संगीतबद्ध करण्याचा उपक्रम मात्र अव्याहत सुरू आहे. सौ. रेणु चव्हाण व कु. भैरवी कदम या दोन्ही कन्यांच्या स्वरमाधुर्यातून त्यांनी परिश्रमपूर्वक घडविलेली गझल ऐकताना त्यांच्या चेह-यावरील समाधान लपत नाही. अलीकडे कदमांच्या प्रोत्साहनातून सुरू झालेला ‘गझलकट्टा’ या मासिक कार्यक्रमाला पुण्यात ब-यापैकी बाळसे धरू लागले आहे.
भारतीय समाज आपल्या आतिथ्यशीलता आणि गुणीजनगौरवाच्या गुणांसाठी ओळखला जातो. पण या बाबतीत मराठी समाजात मात्र विपरीत चित्र दिसते. हिंदी चित्रपटातील गल्लाभरू, सुमार दर्जाचे अभिनेते आणि टाळ्यामिळवू, तिस-या दर्जाच्या गझल सादर करणा-या पाकिस्तानी गझल गायकांना डोक्यावर घेणारा मराठी समाज, आपल्या मातीतील कलावंतांच्या बाबतीत मात्र प्रचंड उदासीन आहे. सुधाकर कदमांसारख्या अस्सल प्रतिभावंतांची झालेली उपेक्षा दु:खदायी तर आहेच, परंतु उद्वेगजनकसुद्धा आहे. आजकाल मराठी गझल विश्वात झालेली उथळ कवी आणि अजाण गझलगायक पोराटोरांची भरती पाहून, मराठी गझल नेमकी कुठे जात आहे, असा प्रश्न पडतो. मराठी गझलांच्या लहानशा वर्तुळात गेल्या सात-आठ वर्षात सुरू असलेली ही सांठमारी पाहून कदम अनेकदा व्यथित होतात. गावोगाव गझलांचे कार्यक्रम झोडत फिरण-या मंडळींचे अर्थकारण आणि लोकप्रयितेचा हव्यास पाहून गेली काही वर्षे कदम या सर्वांपासून दूर राहणेच श्रेयस्कर, असा विचार करून काहीसे विलगच राहत आले आहेत.
सुधाकर कदमांनी मराठी गझल गायकीची मुहूर्तमेढ रोवली. या गायकीला स्वत:चे असे एक परिमाण देऊन तिची जोपासना केली. कदमांचा हा वारसा आज त्यांच्या दोन्ही मुली आणि मुलगा (निषाद कदम) नेटाने चालवत आहेत. आर्णीतील आपल्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन गेली काही वर्षे कदम पुण्यात स्थायिक झाले आहेत. वारज्यातील कदमांची सदनिका म्हणजे पुणे शहराचे ‘गझल केंद्र’च बनले आहे. कदमांच्या घरी रंगलेल्या गझल वाचन व गायनाच्या अनेक मैफली माझ्या अनेक कवीमित्रांच्या आठवणीतील अनमोल ठेवाच आहेत. आपले संपूर्ण आयुष्य गझल गायकीला समर्पित करणारे सुधाकर कदम, या उतारवयातही पूर्वीसारखेच कार्यरत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. नव्या दमाच्या आणि नव्या वळणाच्या मराठी गझलांचा कार्यक्रम बसवून तो पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोचविण्याचा कदमांचा मनसुबा आहे.
या प्रस्तावित उपक्रमासाठी मराठीतल्या बहुतेक गझल लिहिणा-या कवींच्या आणि महाराष्ट्रभर विखुरलेल्या गझल रसिकांच्या शुभेच्छा आहेत. अशा एखाद्या कार्यक्रमाने मराठी गझल गायकीला चैतन्य मिळणे खरे तर कालसंगतच ठरेल. प्रयोगशीलता ही कुठल्याही प्रतिभावंताच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सुधाकर कदमांचीही सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती, त्यांच्या संगीतास अद्याप ताजेतवानं ठेऊन आहे. आजवर प्रकाशित झालेल्या ‘भरारी’, ‘भजन सुधा’, ‘अक्षर गाणी’, ‘झुला’, ‘अशी गावी कविता’, ‘समुहगान’, ‘अर्चना’, ‘खूप मजा करू‘ या ध्वनीफितींच्या माध्यमातून हे निरनिराळे प्रयोग जनपटलावर वेळोवेळी उमटत राहिले आहेत. कदमांच्या या प्रदीर्घ वाटचालीबद्दल लिहिण्या-बोलण्यासारखे आणखी बरेच काही आहे, पण मनाच्या प्रचंड पसा-यात पसरलेल्या हजारो गोष्टींचा उल्लेख दरवेळी सविस्तर करणे कठीण असते. तूर्तास मीर तकी़ मीरने आपल्या कलेला समर्पित केलेला हा शेर कदमांना समर्पित करून हा लेख संपवित आहे.
किया था रेख्तां पर्दासुखन का
यही आखिर को ठहरा फन हमारा...
**************************************************************************************
डॉ.अनंत ढवळे
वडगांव, पुणे
मो.९८२३०८९६७४
***************************************************************************************
‘शब्द्सृष्टी’भारतीय ग़ज़ल विशेषांकातून साभार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा