१३ मार्च, २००९

१०.निरोप



का म्हणून मी आता शब्द आवरू माझे?
या विराट सत्याशी बोलणे सुरू माझे

गुणगुणावया आता वेळ राहिला नाही..
कोणत्या रित्या देही सूर मी भरू माझे?

मी उडून जाणारा सैरभैर पाचोळा
कोणते जपायाला पान मी धरू माझे?

एक रान वासांचे... एक रान भासांचे
भिरभिरे कुण्या रानी विद्ध पाखरू माझे?

मैफलीत केव्हाची पैंजणे मुकी झाली...
गालिच्यावरी वाजे एक घुंगरू माझे

ह्या धुळीवरी माझ्या राहिल्या न रेघोट्या...
का पुसून गेलेले नाव मी स्मरू माझे?

बंद का घरे सारी? माणसे कुठे गेली?
अंगणात कोणाच्या प्राण अंथरू माझे?

मी निरोपही साधा घेतला न स्वप्नांचा...
काय मी करू त्यांचे? काय मी करू माझे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: