बांधू हवेत किल्ला बाकाबुलंद यंदा
त्या क्रांतिकारकांचा आवाज बंद यंदा
प्रत्येक चेह-याचा मी आरसा तरीही
माझ्याच दर्शनाचा मी अर्जमंद यंदा
झालो महाग एका थेंबास मी परंतू
माझी चढे रिकाम्या पेल्यास धुंद यंदा
सध्या दिसे तसा हा त्रेतायुगात होता
झाला न धर्मयोध्दा हा लालबुंद यंदा
जो झुंजणार होता तो हा नसे रिसाला
ही फौज गाढवांची जी नालबंद यंदा
जे ऐकणार होते त्यांचेच कान गेले
काही न बोलण्याचा आम्हास छंद यंदा
सांगाच भाविकांनो माझे विमान कोठे?
संतासमान केले मी लंदफंद यंदा
त्यांच्या समर्थनांचे होते गुन्हे असे की,
माझे जुने गुन्हे मी केले पसंद यंदा
ह्या घोषणा तुझ्या अन् ह्यांना तुझीच शंका
हे प्रेषिता नवा दे नारा बुलंद यंदा
ते वेगळेच काटे होते इथे गुदस्ता
हे वेगळेच काटे खाती मरंद यंदा
गा जाळल्या घरांनो, गा कापल्या शिरांनो
त्वेषात गा, फुलांचा आवेश मंद यंदा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा