१३ मार्च, २००९

३. पादुका


तेव्हा सदेह स्वर्गी गेला जरी तुका
येथील भाविकांना भंडावती भुका

सांडोत जेवतांना ताटात आसवे
कोणीच घास अर्धा घेऊ नये सुका

सन्माननीय आता झाले तुझे गुन्हे
अक्षम्य मात्र माझ्या ह्या त्याच त्या चुका

हे खुन.. हे दरोडे.. ही लूट.. हे दंगे
हे देवते अता का फोटो तुझा मुका?

त्यांचाच देश ज्यांच्या ताब्यात भाकरी
त्यांचेच सत्य ज्यांच्या हातात बंदुका

चाटून पाय घ्या हो वेळीच नेमके
सोयीनुसार ठेवा पूजेत पादुका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: