फाटके संसार ज्यांचे... मोडकी ज्यांची घरे..
त्याच लोकांना उद्याची मागतो मी उत्तरे
काय हे जातील वाया खापराचे हुंदके?
पाडले जातील केव्हा काचपात्रांना चरे?
माझिया हाती जगाने दीप दु:खाचा दिला...
ओळखू येतात आता चोरलेले चेहरे
गोजिरे हे शब्द ह्यांचे देखणे देती दगे
ही कशाची माणसे? हे बोलणारे पिंजरे
शोधतो ज्या अंबराला दूर ते अद्यापही
माझियामागून येती नेहमीची अंबरे
हाच का तो ‘हात’ ज्याने कापला माझा गळा?
ह्याच हातातून ताजे रक्त माझे पाझरे
कालचे सारे लफंगे बैसले सिंहासनी
ढाळतो आम्ही भिकारी लक्तरांची चामरे
लोक हो, आकाशवाणी देत नाही भाकरी
देव केव्हा माणसांशी बोलला आहे खरे?
1 टिप्पणी:
झणझणीत.
टिप्पणी पोस्ट करा