२७ सप्टेंबर, २००९

चार गझला : रवीप्रकाश


रवीप्रकाश

९९२१२९७२९७

१. तेजाब

उचलाल पाय जेव्हा ध्येयापुढे पळाया;
येतील ध्येय लाखो पायात घुतामलाया


मी पाळण्यात माझ्या दाही दिशा उडालो...
मी जन्मलोच जैसा हाती हवा धराया.

होईल का जगाचा व्यवहार पारदर्शी;
घेतात लाच ऐने आम्हास ओळखाया.

त्यांना सवाल कैसा तू टाकला कळेना?
ते लागलेत सारे मेंदूस विंचराया.

जीवन-मरण तुम्हाला असतील भोग छप्पन;
हा लागलो बघा मी श्वासाविना जगाया.

माझाच प्रार्थनेने तो देव होत गेला...
लागेल वेळ थोडा त्याचा दगड कराया.

जन्मास आग लागो बेदर्द पावसाच्या;
आला कसा बघाना तेजाब शिंपडाया!

२. नांगर

नुसत्याच कुंडल्या जर काढाल कॉम्प्यूटरवर;
पाहून माणसाला मागे फिरेल मांजर.

मजला जिवंत ठेवी माझी उपासमारी;
शोधात भाकरीच्या मेले किती सिकंदर.

बारूद खात होती गर्भार माय माझी;
सांगा नवल कशाचे मी आग ओकली तर.

कंगाल जन्मण्याची शिक्षा अशी अघोरी;
हर एक गोल वस्तू वाटे भुकेस भाकर.

जर वाटते तुम्हाला जन्मास धार यावी?
लावा खुशा खंजर अपुल्याच काळजावर.

राहोत सज्ज पुतळे आता विटंबनेला;
नांदो सुखात दंगल देवा तुझ्याच भूवर.

सांगू नको पिकांना नुसत्या ढगाळ गोष्टी;
पोटात तू ढगांच्या खुपसून टाक नांगर!

३.मशाल

अमुच्या पराभवाचा सत्कार काल होता;
आम्ही भल्याभल्यांचा पुसला गुलाल होता.

आली कणाकणाने डोळ्यात वाळवंटे;
पाणीच मागण्याचा साधा सवाल होता.

तेव्हाच काळजाची ही आग शांत झाली;
कापून सुर्य जेव्हा केला हलाल होता.

माझा लिलाव झाला येथे क्षणाक्षणाला;
एकेक श्वास जैसा साला दलाल होता.

मी चुंबिले तिला अन् उठली हजार बोटे;
का तो खुल्या गटाचा राखीव गाल होता.

गंगे तुझ्या कपाळी हे प्रश्नचिन्ह कैसे;
पाण्यात रक्त होते की रंग लाल होता?

शहरात सांत्वनाची कैसी प्रथा कळेना;
फोडून काल डोळे गेला रूमाल होता.

आजन्म मज मिळाली नाबाद सूर्यसत्ता;
जो भेटला मला तो झाला मशाल होता.

४. भाऊ

ज्यांना फुलाफुलांचा झाला अपाय भाऊ;
मरणाशिवाय नाही त्यांना उपाय भाऊ.

आम्हास का मिळावे पाणी तहानलेले;
पाण्यावरी कशी हो तुमच्याच साय भाऊ.

मी शिंपडू कशाला अत्तर कळयाफुलांवर;
अभिजात नाक माझे तितके कुठाय भाऊ?

गोरक्षणार्थ जमले खाटीक हे पुणेरी;
काढा विमा तिचाही जाणार गाय भाऊ.

संसर्ग माणसांचा झाला कसा ऋतुंना?
आली फुले कशी ही जातीनिहाय भाऊ!

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

nice gazal