२७ सप्टेंबर, २००९

चार गझला : श्रीराम गिरी


श्रीराम गिरी
९७६३००४४९४

१.घना रे

ओठात पाखरांच्या आता उदास गाणी;
सोडून हया जगाला जावे कुण्या ठिकाणी.

होणार नाव माझे दाही दिशात नक्की;
असतील गाजलेली त्याची जरी घराणी.

घ्या खून जाहला हा सर्वासमोर येथे;
ठरवायचे अता हे द्यावी कुणी जबानी.

वाहून दैन्य जावे आता बरस असा तू;
देऊ नको घना रे हे थेंब थेंब पाणी.

दुष्काळग्रस्त गावी त्यांचे प्रचार दौरे;
अन् धन्य धन्य जनता पाहून हया कमानी.

उगणार सूर्य आहे थोडयाच अंतराने;
झालेच मोकळे बघ आकाश खानदानी.


२.ऐने

वाद न येथे कसला आता;
ओळखले मी मजला आता.

काटयांवरुनी जाता जाता;
देह फुलांनी सजला आता.

पडलो प्रेमात तुझ्या म्हणुनी;
लिहितो सुंदर गझला आता.

विजय हवा जर तुजला शाश्वत;
मार्ग नको मग मधला आता.

रक्ताने हा भरला पाया;
बांधा वरती मजला आता.

पालटले जग सर्वस्वी हे;
ऐने तुमचे बदला आता.

३.तारण

नाही उगाच जगलो मी,जगण्याला कारण होते;
डोळयात आसवांसंगे स्वप्नाचे तोरण होते.

होतेच काय मजजवळी विश्वासावाचून इथे;
पायात नव्हता जोडा अन् जुनकट पैरण होते.

गगनात झेप घेताना हया जमिनीवर पाय हवे;
पंखास शाप तुटण्याचा गर्वाचे हारण होते.

होतोच मी कधी माझा रे हसण्या-रडण्यासाठी;
आयुष्य ठेविले माझे तुजसाठी तारण होते.

मी झुंजलो खरा मजशी ना वैर कुणाशी कसले;
तुमचे लढायचे सुध्दा सामूहिक धोरण होते.

गेले घडून जे त्याचा करशील किती पस्तावा;
मी हे कशास केले अन् तेही निष्कारण होते.

४.आत्मा

मिथ्या परंपरांना अद्याप मान येथे;
साचून हया तळाशी अद्याप घाण येथे.

माणूस तेवढा जोडू माणसास आता;
विसरून रंग सारे होऊ समान येथे.

माझे कुणी न मित्रा, इतकेच जाणतो मी;
नेईल तारुनी मज माझे इमान येथे.

तू दु:ख आमचे हे, आतून जाण नेत्या;
आणू नको दयेचे लटके उधाण येथे.

होता न रोषणाईचा वारसा मला रे;
अंधार शोषण्याची होती तहान येथे.

हे शील, सत्व जपताना नामशेष झालो;
पण ठेवला कधी ना आत्मा गहाण येथे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: