२७ सप्टेंबर, २००९

इंटरनेटवर मराठी गझलेचे 'सीमोल्लंघन'

इंटरनेटवर मराठी गझलेचे 'सीमोल्लंघन'
सकाळ वृत्तसेवा
Saturday, October 23, 2010 AT 12:00 AM (IST)

अमरावती - 'गझल आणि गझलकारांसंबंधी सबकुछ' हे ब्रीद घेऊन खासकरून मराठी गझलेचा संदर्भ जगाच्या पाठीवर कुठेही सापडावा, म्हणून इंटरनेटवर कार्यरत असलेल्या "गझलकार'या मराठी ब्लॉगचा "सीमोल्लंघन-2010' विशेषांक नुकताच झळकला आहे.

अकोला येथील ज्येष्ठ गझलकार प्रा. श्रीकृष्ण राऊत यांनी या ब्लॉगची निर्मिती केली आहे. मराठी गझलकार आणि गझलरसिकांच्या खास पसंतीला उतरलेल्या या ब्लॉगवरील "सीमोल्लंघन' विशेषांकाचे हे तिसरे वर्ष आहे. "सिने मे जलन आँखो मे तुफानसा क्‍यों है' यासारखी अर्थपूर्ण गझल लिहिणारे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त उर्दू शायर "शहरयार' यांना समर्पित असलेला हा विशेषांक मराठी गझल, गझलेचा भाव, गझलगायकांच्या मुलाखती तसेच काही निवडक मराठी गझलकारांच्या रचनांनी सजलेला आहे.

मराठी गझलेबद्दल हुकुमी लेखन करणारे प्रा. श्रीकृष्ण राऊत, वसंत केशव पाटील यांच्यासह श्रद्धा पाटील, लोकनाथ यशवंत आणि अशोक रानडे यांचे माहितीपूर्ण लेख यात आहेत. याशिवाय मराठी गझलगायकीत स्वतःचा वेगळा ठसा उमटविलेले अमरावतीचे गझलगायक राजेश उमाळे व मुंबईचे मदन काजळे यांच्या कारकिर्दीचा सारीपाट मांडणाऱ्या मुलाखती हे या अंकाचे खास वैशिष्ट्य म्हणाले लागेल. ज्येष्ठ गझल अभ्यासक डॉ. राम पंडित आणि गझलरसिक नाना लोडम यांनी या गात्या गळ्याच्या कलावंतांना आपल्या शब्दसामर्थ्यातून बोलके केले आहे. राजेश उमाळे यांनी गायलेल्या सुरेश भट यांच्याहेही असेच होते...तेही तसेच होते' या गझलेची व्हिडिओक्‍लिप, तर मदन काजळे
यांनी गायलेल्या
श्रीकृष्ण राऊत
यांच्या तुझ्या हासण्याचे दिवाणे किती' या गझलेच्या श्रवणीय ऑडिओक्‍लिपचाही यात समावेश आहे. याशिवाय गझलांच्या विभागात वंदना पाटील, खलील मोमीन, सुधीर राऊत, नितीन भट, श्रीराम गिरी, वीरेंद्र बेंडसे, रविप्रकाश, कमलाकर देसले, जयवंत इंगळे, कैलाश गायकवाड व गंगाधर मुटे यांच्या भरपूर गझला वाचायला मिळतात. www.gazalakar.blogspot.com या पत्त्यावर एका क्‍लिकसरशी गझलरसिकांकरिता मराठी गझलेचा हा खजिना खुला आहे.


*******************************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: