रावसाहेब कुंवर
९८९०२८०५४०
१.निरगाठ
जगणेच क्षणाचे होते,पण तेच रणाचे होते;
मन मोरपिसाचे माझे अन् घाव घनाचे होते.
मी मजूर मातीमधला,मातीत मिसळणे माझे;
तू तारा लखलखणारा तुज वेड नभाचे होते.
समजू न कधी मज आला दुनियेचा गनिमी कावा;
तलवार कुणाची होती अन् वार कुणाचे होते.
मी एक कफल्लक ऐसा धनवान अचानक झालो;
उपहार तुझ्या नवतीच्या नाजूक धनाचे होते.
या अंधाराशी आहे निरगाठ अशी बसलेली;
त्या सूर्यालाही कारण मग काय भिण्याचे होते.
२.काळजाने
बंद मी आता सुखाला दार केले;
वेदनेला मी मनाचा यार केले.
देह होता घाव सारे सोसण्याला;
तू जिभेला का तरी तलवार केले.
सवय झाली सोस मजला सोसण्याची;
ह्या जगाने हे किती उपकार केले.
सांग ना माझा कसा हा प्राण जावा;
तू फुलांच्या कोयत्याने वार केले.
तू जरी असलीस राणी या धनाची;
मी कुठे तुजला कधी जोहार केले.
का कुणाला जीव लावा काळजाने;
जर पतंगाला दिव्याने ठार केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा